Popular Posts

Saturday, January 18, 2014

रेंज येईना राया (लावणी)

          रेंज येईना राया  (लावणी)

कुठं तुम्ही गेला होता, जीव राहिना
दाबून धरलं बटण, राया रिंग वाजना
फोन लागेना राया, तुझी रेंज येईना   ।।धृ।।

कोण होती सोबतीला छान छान परी
कशी होती झुल्प तिची माझ्याहून बरी
छळतोया मला तुझ्या रुपाचा आईना   ।।१।।

कधी पण होतो तुमचा मोबाईल बंद
जडला का तुम्हा कोण्या राणीचा छंद
माझ्या मनातून शंका कशी जाईना ।।२।।

बदलता सीम तुम्ही जणू राञंदिन
मँसेज वाचता जाते कसे हरपून भान
तुमचा बँलन्स कसा शिल्लक राहिना   ।।३।।

चुकूनच लागली रेंज, कोण होती मैना
हँलो हँलो केले तरी ती काहो बोलेना
उतरली माझी बँटरी, अहो मन राहिना   ।।४।।



        वेळीच घाला आवर राया  (लावणी)

खासगीकरणाचा पेलना भार
शेतकरी लागलाय वाकायला
वेळीच घाला आवर राया
सहकार लागेल विकायला ।।धृ।।

महागाई झाली मिळत नाही
रास्त भाव आता कष्टाला
औषध खताचा सोसना डोस
वास करजाचा येतोय पिकाला ।।१।।

टाटा बाटा कसतील शेती
भूमिपूञ जाईल कामाला
ऊसमळे अन हे दुधसंघ
भांडवलदाराच्या दावणीला ।।२।।

कडू झाली साखर आता
वास येऊ लागला दुधाला
कष्टक-यांची चिपाडे जातील
राजकारण्यांच्य त्या चुलीला ।।३।।

सावकाराने घेतल्या सोसायट्या
इज्ज्त अब्रु आता लुटायला
जमीन,घर ठेवुनी घाण
बसलाया करज वाटायला ।।४।।


दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१



------------------------------
-------


     वय झालं सोळा (लावणी)

चालताना झोल माझा जातोया तोल
मला कीती मी सावरायंच
वय झालं सोळा माझा लवतो डावा डोळा
मन कसं मी आवरायचं             ।।धृ।।


स्वप्न मला गं पडत्यात भारी
सनई चौघडा वाजतोया दारी
येईल म्हणून सख्याची स्वारी
रात जागून काढलीया सारी
कीती वाट पाहू, अन उपाशी मी राहू
सांगा कुठवर झुरायंच......      ।।१।।

माझ्या मनाला पडलंय भ्याव
चिंचा बोरं वाटत्यात खावं
सख्या अचूक पडलाय डाव
सांगा लपून किती दिन राहावं
नको वेळ लावू, राया निणय घेवू
आपलं लगीन करायचं            ।।२।।

कळी फुललीया गाली आज
कशी झाकू मी नवतीची शेज
उघडी करुन रातीची लाज
किती शृंगार चढवला साज
ओठाची गं लाली, पुसट ही झाली
भाळी चांदणं पसरायचं           ।।३।।


दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१







Friday, January 17, 2014

साहित्यिकांची खाण
---------------
क-हाकाठचा साहित्यिक वारसा
(लेखक- दशरथ यादव)
----------------------------
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. ३,४,५ जानेवारी २०१४ रोजी सासवड (ता.पुरंदर) येथे होत आहे. साहित्यक्षेत्रातील मराठी भाषेचा हा महत्वाचा साहित्य सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारे आणि मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, साहित्य निर्मीतीची ज्योत तेवत ठेवणारे क-हाकाठावर प्राचीन काळापासून अनेक साहित्यरत्न जन्माला आली. रामायणकार महर्षी वाल्मिकी, संत सोपानदेव, पुरंदरदास, श्रीधरपंत, संभाजीमहाराज, महात्मा फुले, शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा, कृ.वा.पुरंदरे, आचार्य अत्रे, साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत अशा साहित्यरत्नांचा वारसा क-हाकाठाला आहे. बुधभूषण चा मराठी अनूवाद करणारे प्रा.प्रभाकर ताकवले, खरा संभाजी व शिवराय लिहिणारे नामदेवराव जाधव यांच्या पर्यंत मोठा वारसा पुरंदरला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून पुरंदर




छत्रपती शिवाजी

छत्रपती संभाजीराजे  
----------------
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला. बालपणीच दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. क-हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती गुणकारी आहे. पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळयांचा मुलासोबत शंभुराजांचे बालपण गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा व शौर्याने संभाजीराजांची राजकारण, साहित्य, समाजकारण याविषयीची दृष्टी अधिक दृढ होत गेली. राजकारणांचे डावपेच ते बालपणीच शिवरायांकडून शिकले. सुरवातीला त्यांची सावत्रआई सोयराबाई यांनीही खूप माया केली.
शंभुराजे देखणे व शूर होते. राजकारणातील बारकावे भराभर शिकून घेतले. मोगल दरबारातील घडामोडी व राजकारण त्यांना लहान वयात कळाले. वयाच्या ९ व्या वर्षीच शिवरायांनी त्यांना जाणीपूर्वक आग्रा येथे आरंगाजेबाच्या भेटीवेळी नेले होते. .
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तोपर्य़ंत संभाजीराजे बारकावे व रणांगणातील डावपेचात तरबेज झाले होते.
साहित्य लेखन

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे.

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास

तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥

अण्णाजी दतो मारला
१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले )

श्री सखी राज्ञी जयति - छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

सरसेनापती - हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) - कवी कलश (कलुषा)
पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
चिटणीस - बाळाजी आवजी
सुरनीस - आबाजी सोनदेव
डबीर - जनार्दनपंत
मुजुमदार - अण्णाजी दत्तो
वाकेनवीस - दत्ताजीपंत


दख्खन मोहीम

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते. त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती, की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की, तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.


दगाफटका
इ.स. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

त्यानंतर संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले.  औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक धिंड काढली.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. राजांची हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे करण्यात आली. संभाजी राजांना पाच हजारी मनसब, पाच हजार स्वार, ज्यांची दोन घोडी असावीत, त्याप्रमाणे देऊन पोशाख आणि पंजाच्या शिक्क्यासह हा फर्मान पाठवला आहे. संभाजी राजे वयाच्या आठव्या वर्षीच मुगल मनसबदार झाले.  शिवाजी महाराजांनी औरंगजेबास विरोध दर्शवला त्याची दखल संपूर्ण भारताने घेतली, ह्या घटनेचे साक्षीदार संभाजी राजे होते.  ह्याच औरंगजेबासोबत शिवाजी महाराजांच्या कैलासवासानंतर सतत ९ वर्षे लढा संभाजीराजांनी दिला.

इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली
टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही. तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.
याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला. भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.
रामदास स्वामीचा शिष्य रंगास्वामीने महाराजांना औरंगाजेबाच्या तावडीत पकडून देण्यास छुपी मदत केली.
संभाजीचे चारित्र्य हनन करण्याचे काम बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच.
अन महारानी अंतिम विधी केला.
संभाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे मराठी साहित्यिकांची मेजवानी. त्यावर कित्येक मराठी साहित्यिकानी विस्तॄत लिखान केलं. त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगानीतर उभा महाराष्ट्र थरथरतो असे लिखाण साहित्यिकानी उतरवून ठेवले. यातील खरं किती खोटं किती माहीत नाही. पण औरंगजेबानी त्यांचे हाल हाल करुन अत्य़ंत क्रूरपणे जीव घेतला हे सर्वमान्य आहे. यावरुन काहिनी त्याना चक्क धर्मवीर ठरवून टाकले तर काहिनी मृत्य़ूशी लढणारा वीर. एकंदरीत संभाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा, धोरणात्मक वृत्ती अन लहान वयातच लिलया पेलणारं सेनापती पद या सर्व गोष्टींपेक्षा सर्वात जास्त चर्चेत राहिलेली गोष्ट कुठली तर त्यांचं मृत्यू. याला कारणीभूत कोण तर या मृत्य़ूला रंगविणारे  लेखक-कादंबरीकार. ते औरंगजेबाच्या पुढे पेश केल्या नंतर कसे स्वाभिमानाने बोलले, मग औरंग्यानी त्याना कसे मारले या सर्व गोष्टी ईतक्या ईतक्या रंगविण्यात आल्या की मराठी मातीतील शेंबडया पोरालाही संभाजीचा मृत्यू माहित आहे. पण हे सर्व करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट जाणिवपूर्व अनफोकस ठेवण्यात आली.
ती म्हणजे संभाजीच्या मृत्यू नंतर त्यांची उत्तरक्रिया महार समाजानी केली. संभाजी व कवी कलशची समाधी वढू गावातील महार वाड्याला लागून आहे. औरंग्याच्या दहशतीला न जुमानता आपल्या प्रिय राजाचा अंतिम संस्कार पार पाडणा-या धीरोदात्त अशा महार समाजाचं कर्तूत्व मोठे आहे. मनुस्मृतीनुसार राजांची हत्या पंडितानी केली.  त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करुन वढू गावाच्या शेजारी फेकण्यात आले. त्या नंतर अशी दवंडी पिटण्यात येते की जो कोणी संभाजी वा कवी कलशाची अंतिम क्रिया करेल त्याची धडगत होणार नाही. औरंग्याच्या या धमकीला न घाबरता येथील महारांनी अंतिम विधी केला.  


१) होनाजी बाळा
---------------------------------

वंशपरंपरागत शाहिरी ः  होनाजी हा क-हाकाठावरील सासवडमधील गवळी समाजात जन्माला आला. तो त्याच्या घराण्याचा दुधाचा व्यवसाय करीत असे. पेशव्यांच्या वाड्यावर दुधाचा रतीब घालणे व सांयकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी मनोरंजन करीत. त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसा शाहिरीचा पण व्यवसाय वंशपरंपरागत होता. होनाजीचे आजोबा साताप्पा किंवा शाताप्पा हे व त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. विशेषःता होनाजीचा चुलता बाळा हा लावणीकार होता. तो बाळा बहिरु या नावाने शाहिरी क्षेत्रात प्रसिद्ध होता. बहिरु नावाचा रंगारी हा बाळाचा मित्र होता. ते दोघे बाळा बहिरु नावाने तमाशाचा फड चालवीत होते. बाळाजीची हीच परंपरा पुढे होनाजीने चालविली. होनाजीचा साथीदार आणि मित्र बाळा करंजकर हा सासवडच्या शिंपी समाजातील होता. त्याच्या जोडीने होनाजीने आपला तमाशा गाजविला. त्याने होनाजी बाळा हे जोडनाव रुढ केले.
होनाजी बाळा (इ.स.१७५४-इ.स.१८४४) मुळचा सासवडचा होता. नंतरच्या काळात तो पुणे येथे राहत होता. होनाजीचे आजोबा सातप्पा शिलारखाने हा पेशव्यांचा आश्रित व नावाजलेला तमासगीर होता. होनाजीने रागदारीवर अनेक लावण्या लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचना त्यांनी केली. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या लावणीला आज भूपाळीचे महत्व प्राप्त झाले. होनाजी काव्य करायचा व बाळा गायन करीत होता. म्हणून त्यांच्या फ़डाला होनाजी बाळाचा फड असे म्हणत.

पोवाड्याची रचना
--------------------
लावणीचे शब्दसामर्थ्य आकर्षक होते. शब्दरचना बांधीव मुलायम होती. सहजता व शृंगाररसाचा अदभुत प्याला होनाजीने रसिकांसमोर ठेवला. इतकेच नाही तर विरहाची लावणी, गरोदर स्त्रीच्या दुःखाची लावणी, वांझेची लावणी अशा विविध लावणीतून स्त्रीमनाचे दर्शन त्यांनी घडविले. होनाजीनी काही पोवाडे रचले आहेत. खड्र्याची लढाई, रंगपंचमीचा पोवाडा, दुस-या बाजीरावाचा पोवाडा, असे अनेक पोवाडे रचले. शिमग्याचे पाच दिवस ते सरकारवाड्यापुढे तमाशा सादर करीत. होनाजीला सालीना तीनशे रुपये वर्षासन मिळत होते. पेशवाई बुडाल्यानंतर बुडाल्यानंतर बडोदेसरकारकडून त्यांना वर्षासन मिळे. पेशवाई गेल्यानंतर होनाजीने लिहिलेला पोवाडा अतिशय ह्दयद्रावक आहे. होनाजीने पेशवाईतील रंगढंग मोठया कलात्मकतेने व यथेच्छपणे रंगविले आहेत. होनाजीने रचलेल्या लावण्यात अंतरीक प्रेम, जिव्हाळा, सामाजिक नीती याची कदर इतर शाहिरांपेक्षा जास्त आहे. लावणीरचना सरळ, ओघवती, शब्दलालित्याने नटलेली आहे. होनाजी स्वतःच्या लावण्याबरोबर बाळा करंजकर यांच्याही लावण्यात गात असत. सासवडही होनाजीची अजोळभूमी सासवड. काव्याची पुष्पाची पहिली पाकळी त्यांनी येथील काळभैरवनाथाच्या चरणी अर्पिली आहे. धनाने दारिद्रयात असलेला हा शाहीर सासवडला धान्यबाजारपेठेत हल्लीच्या शेडगे यांच्या दुकानाच्याजवळ राहत होता. त्याचा जिवलग मित्र बाळा करंजकरचे घर पाकडी जवळ दगडोबा शिंदे यांच्या वाड्यात होते. होनाजीचा अंत दिवेघाटातील बाभुळबनात मारेक-यांच्या हल्ल्यात झाला.


लटपट लटपट लटपट लटपट
तुझ चालणं गं मोठ्या नख-यांचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं
नारी गं नारी गं...

कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
तरुणपण अंगात झोकं मदनाचा जोरात
चालणं गं मोठ्या नख-याचं
बोलणं गं  मंजुळ मैनेचं.
नारी गं नारी गं....

हे अमर भूपाळी या सिनेमातील गीत मराठी माणसांच्या मनामनात कोरले आहे. वसंत देसाई यांचे संगीत व लता मंगेशकर यांनी गायले आहे.

याहो याहो रसिकवरा
द्या कान जरा, लावा नजरा
शाहीराचा घ्या मुजरा

मराठी जीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष शाहिरीत उमटले आहे, मराठी वाडःमयातील बावनकशी सोनं म्हणजे लावण्या व पोवाडे आहेत. मराठीशाहीच्या उदयाबरोबर शाहिरी काव्य जन्मले. या काव्यात मराठीशाहीचे प्रतिबिंब असून, वीर रसाची उधळण करणारे पोवा़डे व दिलखेचक अदाकारीच्या शृंगारिक लावणीने मराठी साहित्यात व मनांमध्ये वेगळेच स्थान निमार्ण केले. अशा शाहीर होनाजी बाळाच्या डफाच्या थापेवर व तुणतुण्याच्या तारेवर महाराष्ट्र नागासारखा डोलला  आहे. घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला या सात्विक, प्रसन्न भूपाळीप्रमाणेच होनाजी अमर झाला.
२) शाहिर सगनभाऊ
----------------------
जेजुरीचे रहिवासी सगन
 पेशवाईच्या काळात वीर रसाबरोबर शृंगार रसाचीही शाहिरीमध्ये भर पडली. श्रीमंत नानासाहेब पेशवे व दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात शाहिरीला राजश्रय मिळाला. उत्तर पेशवाईत मराठी शाहिरीला बहर आला. मराठी स्त्री पुरुषाच्या प्रेमाचे चित्रण करणारे लावणी वाडःमय भरभरुन लिहिणारे, अनंतफंदी (इ.स.१७४४ ते१८९९), रामजोशी (इ.स.१७५८ते १८८३), शाहीर परशराम (इ.स.१७५४ते१८४४), होनाजी बाळा (इ.स.१७५४ते१८४४), प्रभाकर (इ.स.१७५२ते१८४३), सगनभाऊ (इ.स.१७७८ते१८५०) यांच्या जीवनासंबधी व त्यांनी लिहिलेल्या लावण्याबाबत मराठी माणसांच्या मनात कुतूहल व आकर्षण आहे.
शाहिर सगनभाऊ हे पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे नावलौकिकास पात्र ठऱले. शाहीर सगनभाऊ मुळचे जेजुरी (ता.पुरंदर) येथील रहिवासी. वंशपरंपरेने आलेल्या शिकलगारीच्या व्यवसायात मन रमेना व काव्यप्रतिभा स्वस्थ बसू देईना म्हणून पुण्याला गेले. नामवंत शाहिरांसोबत आपली कवने सादर करु लागले. थोड्याच कालावधीत यश व प्रसिद्धी मिळाली. सगनभाऊ जातीचे मुसलमान असूनही ते मराठीशी महाराष्ट्राच्या  संस्कृतीशी एकरुप झाले होत. हत्यारांना धार लावण्याचा त्यांचा धंदा. पण पिढीजात धंद्यात विशेष रस नसल्याने शाहीरीत रमले. तो नाथसंप्रदायी असून, मराठी संत व हिंदू धर्म परंपरा याचा जाणकार होता.सिंधू रावळ हा नाथपंथी शाहीर त्याचा गुरु होता. आपल्या लावण्यांत तो विठ्ठल, पंढरी, ज्ञानेश्वर, जनाबाई, तुकाराम ह्यांचा उल्लेख अनेकदा करतो. दुस-या बाजीरावाचा त्याला आश्रय होता. त्याच्या विलासावर त्याने लावण्या रचल्या. होनाजीबाळाशी त्याची चुरस असे. सगनभाऊ उतम लावण्या लिहित. सगनभाऊंच्या अनेक लावण्या कमालीच्या शृंगारिक आहेत. तथापि त्या भेदिक आहेत. असा ही दावा करण्यात येतो.  त्याकाळात गवळ्याचा फड व रावळचा फड असे दोन फड पुण्यात होते. गवळ्याच्या फडाचा प्रमुख होनाजी तर रावळाच्या फ़डाचा प्रमुख सगनभाऊ होता.  होनाजीप्रमाणे त्यानेही रागदारीत रचना केली आहे.
कोथळे गावचा भाऊ गोंधळी
---------------------------
होनाजी शिलारखाने व त्यांचा गायक साथीदार बाळा करंजकर यांना  जसे एकत्रित होनाजी बाळा असे नाव मिळाले. सगन मुस्लीम धर्मीय होता. जेजुरीपासून पाच किलोमीटरवर क-हा नदीच्या काठावर असलेल्या कोथळे गावचा रहिवासी भाऊ गोंधळी हा त्याचा सहगायक होता, म्हणूनच सगनभाऊ असे एकत्रित नामाभिधान झाले. जेजुरीकरांच्या मनात आजही सगनभाऊ बद्धल प्रेम व अभिमान आहे. जेजुरीत नोंव्हेंबर मध्ये सांस्कृतिक महोत्सवात ही रात्र शाहिरांची, लोकनाट्य, लोकसंगीत असे कार्यक्रम रंगविले जातात. भाऊ गोंधळी यांच्या गावी मात्र अजूनही त्यांचे भव्यदिव्य असे स्मारक नाही. सगनभाऊच्या  फडात गाणा-या पैकी राम गोंधळी हा उत्कृष्ठ आणि विशेष प्रसिद्ध होता.
सगनभाऊनी हिंदू देवांवरही कवने केली आहेत. खंडोबावर त्यांची श्रद्धा होती.
प्रातःकाळी उठूनी गणपतीचे, करि विष्णू स्मरण
काशी उज्जैनी, औंढी परळी, त्र्यंबक त्रिनयन
सोमनाथ सोरटी, बद्रिकेदार रामेश्वरी स्नान
श्रीशैल्य मल्लिकार्जुन, वेरूळ मांधाता जाण.
शृंगारिक लावणी
---------------------
सगनभाऊ यांच्या लावण्या आजही तमाशात व बैठकीत गायल्या जातात. रचना भावनोत्कट, प्रत्ययकारी वणर्णनांनी सजलेल्या असून, भाषा सहजसुंदर आहे. लावण्यातील शृंगारात नाजुकपणा व संयम अधिक होता. एकनिष्ठ, पतिव्रता, धर्मश्रद्धा, याबाबतचे हिंदूसंस्कार त्यामध्ये स्पष्ट दिसतात. अनंतफंदीपासून शृंगाराला सुरवात झाली. सगनभाऊच्या काळी रसिकतेने मर्यादा ओलांडली.बिभत्स,अश्लील, आडपडदा न ठेवता लावणीकार सर्व वर्णन करीत होते. त्यावेळी सगनभाऊनी शृंगारिक लावण्या रचल्या. स्वंतत्र, विचार मनोहार कल्पना यांची सांगड कवनात घातली. उतान शृंगार, डौलदार रचना, बैठकीच्या चाली यामुळे लावण्या लोकप्रिय झाल्या. त्यांनी लावणीतून मराठी राज्य व संस्कृतीचे दर्शन घडविले.
नाकी नथ हालती नागीन
डुलती शृंगाराचा काय नखरा,
किंवा
लाल भडक वेणी स़डक आति चमेली मधी भिजली।
गोरे गाल जपून जाल, मजा पहाल फाकडे।

अशा वर्णनाच्या लावण्या त्यांनी रचल्या.
  पोवाड्यांची रचना
पेशवाई बुडाल्यानंत सगनभाऊ साता-याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज प्रतापसिंहाच्या आश्रयाला आल्याचे दिसते. प्रतापसिंहावर त्यांनी पोवाडे लिहिले. इंग्रजांनी प्रतापसिंहाना पदच्यूत केल्यानंतर त्यांची रवानगी काशीला केली. हा पोवाडा त्यांनी लिहिला आहे. ग्रामीण जीवनशैली त्यांची जी नाळ बांधली होती ती त्यांच्या शाहिरीतून दिसून येते. उत्तर मराठेशाहीतील सर्वात मोठी घटना, मराठ्यांच्या मनात असणारी सल म्हणजे पानिपतची लढाई,  या लढाईवर सगनभाऊनी प्रदीर्घ पोवाडा लिहून त्याकाळीतील परिस्थितीचे सुंदर भाष्य केले. खंडेरायावर त्यांची अपार श्रद्धा होती. देवदेवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले. हीच रचना खंडेरायाच्या भूपाळीमध्ये म्हटली जाते.
खडकीच्या लढाईवरील पोवाडा, दुस-या बाजीरावाचा पोवाडा, पानिपतचा पोवाडा हे त्यांचे काही प्रसिद्ध पोवाडे.

दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी।
लेकराला माय विसरली, कसा ईश्वर तारी।

असे खडकीच्या लढाईचे अस्वस्थ करणारे वर्णन त्यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले

----------------------
महात्मा फुले (इ.स.१८२७ - नोव्हेंबर २८ १८९०) हे मराठी, भारतीय समाजाचे आधुनिक समाजसुधारक होते.
त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे जमिनीचा सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. सासवडपासून सात किलोमीटर अंतरावरील खानवडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे तेथे घर होते. जमिन होती. अजूनही त्यांच्या नावाने सातबारा तिथे पाहायला मिळतो.

तुकारामांचा प्रभाव
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सामाजिक प्रबोधनासाठी तुकारामांनी अंभग रजना केली त्याच अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली शिवजंयती महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन साजरी केली. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधिचा शोध त्यांनी लावला. समाधीची पूजा केली..रयतेचे राज्य उभे करणा-या शिवाजीराजांवर त्यांनी कुळवाडीभूषण नावाचा पहिला पोवाडा लिहिला.

मुलींची पहिली शाळा
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा येथे झाला. इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले. इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह झाला. इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले. इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास. इ.स. १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत ब्राम्हण वर्णीयांकडून अपमान झाला. इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात झाली. इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना केली. मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी, रात्रशाळा, मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न, विधवाविवाहास साहाय्य, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप, गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला, हौद अस्पृश्यांसाठी खुला, सत्यशोधक समाजची स्थापना, शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले, स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य, पुणे नगर पालिकेचे सदस्य, दारू दुकानाना विरोध, पहिल्या कामगार संघटनेची स्थापना, 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी, सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणले.
साहित्यक्रांती
मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली. २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे त्यांचे निधन झाले.
 महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रत रुजवण्यासाठी सत्यशोधक दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजषी शाहू महाराजांनी समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेत्तर चळवळीने अवघा महाराष्ट्र जेधे जवळकर जोडीने ढवळून काढला. देशाचे दुश्मन हे त्यांचे पुस्तक प्रंचड गाजले.
तृतीय रत्न नाटक -इ.स. १८५५
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा- पोवाडा इ.स. १८६९
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह- इ.स. १८६९
गुलामगिरी लेखसंग्रह- इ.स. १८७३
शेतकऱ्यांचा आसूड- लेखसंग्रह इ.स. १८८३
सत्सार नियतकालिक- इ.स. १८८५
इशारा लेखसंग्रह- इ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह- इ.स. १८८९
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
   नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
   वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

आचार्य अत्रे
---------------
मराठी साहित्यक्षेत्रात मैलाचा दगड ठरावा असे अचाट काम करणारे साहित्यसम्राट प्रल्हाद केशव अत्रे (इ.स.१३ आॅगस्ट १८९८ - इ.स१३ जून १९६९) यांचे मूळ गाव कोडीत. पुरंदरचे पहिले आमदार बापूसाहेब खैरे यांच्या ते गावचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली पराक्रम, पुरंदर किल्ला, संत सोपानदेव व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या रुपाने साहित्याचा प्रवाह क-हेतून सदैव खळखळत आहे. शौर्य, पराक्रम, अध्यात्माचा वारसा अंगाखांद्यावर खेळवीत दिमाखात उभ्या असलेल्या शिवशंभुच्या पुरंदराची प्रेरणा हीच आचार्य अत्रे यांच्या लेखनाची ताकद आहे.
आचार्य अत्रे हे वक्ता, पत्रकार, लेखक, चित्रपटकार, विडंबनकार, शिक्षणतज्ञ, नाटककार, राजकारणी यासगळ्या क्षेत्रावर त्यांचा प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक नेते म्हणूनही त्यांनी प्रभाव पाडला होता.

चित्रपट व पत्रकारिता
इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन',  इ.स. १९२६ मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले.
साहित्यलेखन
क-हेचेपाणी हे पाचखंडातील आत्मचरित्र, चांगुणा, मोहित्यांचा शाप या कांदबरीचे लेखन केले. झेंडूची फुले व गीतगंगा हे कवितासंग्रह लिहिले. अशा गोष्टी अशा गंमती, कशी आहे गम्मत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा ही कथासंग्रहाची पुस्तके लिहिली. अध्यापक अत्रे, आषाढस्य प्रथम दिवसे, इतका लहान एवढा महान, केल्याने देशाटन, क्रांतिकारकांचे कुलपुरुष, चित्रकथा भाग-१, चित्रकथा भाग-२, दलितांचे बाबा, दूर्वा आणि फुले, मराठी माणसे, मराठी मने, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, मी कसा झालो?
मुद्दे आणि गुद्दे, वस्त्रहरण तसेच विनोद गाथा लेखन केले. विनोबा, संत आणि साहित्य, समाधीवरील अश्रू, सिंहगर्जना, सुभाष कथा, सूर्यास्त, हंशा आणि टाळ्या, हुंदके या पुस्तकांबरोबर नाटकांचेही लेखन केले. अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला-विडंबन, कवडीचुंबक, गुरुदक्षिणा, घराबाहेर, जग काय म्हणेल?, डॉक्टर लागू, तो मी नव्हेच, पराचा कावळा, पाणिग्रहण, प्रल्हाद(नाटक), प्रीतिसंगम (नाटक), बुवा तेथे बाया, ब्रम्हचारी, भ्रमाचा भोपळा, मी उभा आहे,मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, वंदे भारतम, वीरवचन, शिवसमर्थ, सम्राट, सिंह, साष्टांग नमस्कार.
नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन (बेळगाव, १९५५), दहावे मराठी पत्रकार-संमेलन (१९५०) आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन. झेंडूची फुले (१९२५) हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे विशेषत: ‘रविकिरणामंडळा’ चे कवी व त्यांच्या कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबनकाव्याची परंपरा उपर्युक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा (१९३५) या संग्रहात आहे.
सासवड
पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई व भोगावती (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.
शिवछत्रपतींच्या तीर्थरूपांचे हे जहागिरीतील गाव. साबगरखिंड, पांगारखिंड, पानवडीचीखिंड, बाबदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वरघाट शिंदवणेघाट इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरू पडले. शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करून लढाईत धारातीर्थी पडलेला वीर बाजी पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आहे. सासवड-किल्ले पुरंदर मार्गावर श्री. वटेश्वर हे पुराणप्रसिद्ध जागृत स्वयंभू शिवालय आहे. प्राचीन काळी ही सिद्धसाधकांची तपोभूमी होती. याच स्थळी ब्रम्हदेवाने श्रीशंकराची आराधना केली. गहन तपाने संतुष्ट होऊन कैलासपती त्यास प्रसन्न झाले. “महातीर्थे व्रत दैवते | ब्रह्मा झाला निर्मिते ते हे स्थळ |”

श्री क्षेत्र सासवड नि वटेश्वर स्थळ म्हणजे देव, भक्त नि तीर्थ यांच्या भेटीच्या अपूर्व सोहळ्याचे पवित्र स्थळ होय. प्रथम या मंदिरास ‘नीलकंठ‘ नामाभिधान होते. नंतर त्यास ‘वटेश्वर’ संबोधण्यात येऊ लागले. ज्ञानेश्वरकालीन महान योगीराज चांगदेव यांच्या बालपणापासून बराच काळ श्रीवटेश्वराच्या सान्निध्यात गेला. अप्रतिम शिल्पकला यांचा उत्कृष्ट नमुना असलेले वटेश्वर मंदिर पुर्वाभिमुखी असून प्रवेशद्वारातून प्रवेश केला की, आतील बाजूस प्रशस्त चौकोनाकृती दगडी प्राकार लागतो, मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे, तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडपात उभा आहे. प्रवेशद्वारावरील स्तंभावर तपस्वी, दधि-मंथन करणारी स्त्री, गरुड, युगुल, लढत असलेले मल्ल, तीन नर्तकी असे शिल्प कोरलेले आहे. त्याच बरोबर चित्रविचित्र, आकर्षक, गोलाकार सौन्दर्याकृती, कमल पुष्पे, शृंखलांच्या माला, नृत्यांगना यांचे सुबक व कोरीव काम केलेले दिसते. मानवी जीवनाच्या निरनिराळ्या प्रसंगातील भावनांचा उत्कृष्ट रसाविष्कार करण्याचा नयनरम्य कलाकृती तद्वतच गेंडा, अश्व, व्यार्घ, गजादी पशूंची चित्रे, पोपटासारखे पक्षी यांचे स्तंभावरील शिल्पकला रसिकाला मंत्रमुग्ध करते. सभामंडपाच्या मध्यभागी विशाल, भव्य, घोटीव व देखणी नंदीची मूर्ती असून नंदीच्या कंठस्थानी साजरशृंगार कोरलेला आहे.
सभामंडप ओलांडला की, चौकोनाकृती मध्य गाभारा लागतो. शोडष स्तंभावर हा उभारलेला असून त्याच्या प्रत्येक स्थंभावर प्रवेशमंडपाप्रमाणेच विविध कलाकुसरयुक्त चित्राकृती, कमल पुष्पे, शृंखलांची घडण कोरलेली आहे. मंडपास दक्षिणोत्तर प्रवेश द्वारे आहेत. शिवालयाचे गर्भागार नितांतरम्य, उदात्त नि पवित्र आहे. त्यामुळे भाविक भक्तांच्या मनास सात्विक उदात्ततेचा अनुभव येतो. स्वयंभू शिवलिंगाच्या पार्श्वभागी महिरपीच्या कोनाड्यात श्री गणेश देवतेची संगमरवरी रम्य मूर्ती आहे. गर्भागारातील प्रत्येक पाषाण भिंतीस लहान कोनाडे आहेत. मंदिराचा घुमट अष्टकोनी गोलाकार आहे. देवालय प्राकाराच्या पश्चिमेस भाविक यात्रेकरुसाठी सारख्या आकाराच्या विटांच्या ओवार्‍या आहेत. मंदिराचे दक्षिणेस लहान मोठी देवालये आहेत. पूर्व प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन कृष्णपाषाणी भव्य दीपमाला आहेत. उत्तरेस पावन कर्‍हा तीरावर सखाराम बापू बोकिलांनी बांधलेला घाट दिसतो. अशा पुण्यपावन पवित्र शिवालयाचे दर्शन भाविकजनास घडले की त्यांच्या मुखातून सहज प्रशंसोद्गार निघतात.

वीर बाजी पासलकर समाधी
हिंदवी स्वराज्याचे पाहिले सर सेनापती वीर बाजी पासलकर. मराठी दौलतीतील जेष्ठ अन श्रेष्ट पराक्रमी बहादुरांपैकी बाजी हे स्वराज्यांतील एक शिलेदार. मुळचे पौड जवळच्या तव गावातील. बाजीचे घराणे होते. खानदानी देशमुखी वळणाचे. मोसे गावांत त्यांचा प्रशस्त वाडा होता. त्यावेळी सबंध आख्या मोसे खोर्र्यांत बाजीसारखा वीर दिलदार व सज्जन माणूस नव्हता. लोकांचे तंटे बखेडे मिटवून सलोखा घडवावा, गोरगरिबांना उदार हाताने मदत करावी. पुढे होऊन लग्न कार्य पार पडावेत. निराधारांना आधार द्यावा. या सदगुणामुळे बाजी खोर्र्यांत लोकप्रिय होते. बाजी म्हणजे तेथील लोकांना मोठे थोरले वडाचे झाडच. त्याची सावली सर्वांनीच. बाजी म्हणजे बुलंद देह याष्टीचा भरभक्कम मनुष्य. मोठमोठ्या भरदार मिशामुळे कमाविलेल्या शरीराला आणखीनच शोभा येई. त्यांनी १४ शूर रजपूत व शंभर नोकर चाकर पदरी ठेवले होते. बाजीचा वाडा माणसाने नेहमीच गजबजलेला असे. पै. पाहुण्यांची वाड्यांत नेहमीच वर्दळ चालू रहायची. बाजीची ‘यशवंती’ नावाची अबलख छानदार घोडी होती. विजापूरच्या बादशहास नजर करण्याचे हेतूनेच बाजीच्या जावयाने, लोकांनीशी छापा घालून तिला पळविले. पण पदरी चाकरीस असलेल्या बाजीच्या इमानी शूर एल्या मांगने छाप्यातील कित्येक लोकांना ठार काले. खुद्द दाजींनी आपल्या जावयास धरणीवर पाडले, बाजींना दोन बायका होत्या. आपली मुलगी सावित्री कान्होजी जेध्यांना देऊन बाजींनी त्यांना आपला जावई करवून घेतलेले होते. बेलसर येथे फत्तेखानाच्या छावणीवर घातलेल्या छाप्यांत मराठ्यांचे निशाण सहीसलामत आणून मराठी दौलतीची ईभ्रत राखणारा शूर पोरगा बाजी जेधे हा ह्याच कान्होजी जेध्यांचा सुपुत्र होय.
शिवाजी राज्यांच्या भोवती जमा झालेल्या सर्व सवंगड्यांत सर्वात वयस्कर बाजी पासलकर होते. सर्वाना आजोबासारखे शोभणारे, वय वर्षे सुमारे ६५ च्या आसपास. शिवबाला बाजीचा केवढा आधार दादोजी कोंडदेवचे बरोबर शिवबास बाजी सल्लामसलत डावपेच सांगत; नि शिकवीत फत्तेखानाने पुरंदरवर चाळ केली त्यावेळी, बाजी पासलकर जातीनिशी त्या लढाईत तळपती समशेर चालवीत होते. स्वराज्यातील या पहिल्या लढाईत प्रत्यक्ष खाशा राज्याच्याकडे सेनापतीत्व होते. महाराजांनी हाती तलवार घेऊन खानाचा फडशा पाडला. मुसेखान पडताच खानाच्या सैन्याची दाणादाण उडून ते पळू लागले. त्याचा वीर बाजी पासलकर व कावजी मल्हार खासनीस यांनी सासवड पर्यंत पाठलाग केला, सासवड मध्ये गनिमासी हातघाईची लढाई जुंपली यवनांची डोकी उडाली. अन पराक्रमाची शर्थ झाली. पण.... पण शेवटी घात झाला. या सासवडच्या हातघाईच्या तुबंळ लढाईत बाजी लढता लढता धारातीथॅी पडला. महाराजांचा उजवा हात गेला.


पुरंदर किल्ला
शिवकालात पुरंदराचे स्थान इतिहासाने घेतले छत्रपती शिवाजी राजे यांनी गड म्हणजे आपला प्राणच मानले होते.    इतिहास थेट राष्ट्रकुट चालुक्यापासून सुरु होतो. शिवाजीराजांनी स्वराजाची पहिली लढाई पुरंदरच्या साक्षीने जिकली आहे. महाराजांनी विजापूरकरांचा सरदारास फत्तेखानास येथे धूळ चारून स्वराजाचा ‘श्री गणेशा’ केला. हा स्वराज्याचा प्रतीपशचंद्र प्रथम पुरंदरावर उगवला. ‘शिवाजी राजे पुरांदरी बैसोनु दिवाण नाम जादीसी झगडो लागले. महाराजांनी किल्ले पुरंदर ही आपली राजधानी काही काळ केलेली होती. पुष्कळदा त्यांचा मुक्काम किल्ल्यावरच असे. मृत्युंजय शंभू राजांचा जन्म याच पावन भूमीत चौदा मे १६५७ रोजी झाला. गड पुरंदर म्हणजे स्वराजातील एक अत्यंत तोलदार, बुलंद बाका किल्ला! महाराजांनी तो नीलकंठराव सरनाईक (chanचांवळीकर) यांच्याकडून स्नेहापोटी मिळवला. गडाच्या परिसराला ‘घेरा’ म्हणतात. घेऱ्यात राहणारे कोळी,रामोशी,महार हे या गडाचे राखणदार. गडाच्या फत्ते बुरुजावर हे दणकट, पिळदार शरीराचे काळेशार जिवंत पोलादी पुतळे, रात्रंदिवस टेहळणी करीत. शेंदर्र्या बुरुजाचे काम ढासळावयाचे म्हणून पुरंदरच्या दक्षिणेस असलेल्या चिव्हे वाडीच्या येसाजी नाईक चिवे (चिव्हे) याने आपली सून व मुलगा जिवंतपणे या बुरुजात बळी दिली. मूळकागदोपत्री असे म्हटले आहे, ‘येसाजी नाईक चिबे म्हणो लागले, जे मी आपला पुत्र व सून देतो. मग बहिरनाक  सोननाक यांचा पुत्र नाथनाक व देवकाई अशी उभायता आश्विन वद्य आष्टमीस शेंद्री बुरुजात गाडली मग बुरुजाचे काम सिद्धीस गेले.’ या बळी दिलेल्या जोडप्यावर शेकडो तोळे वजनाच्या सोन्याच्या विटा ठेवल्या होत्या असे म्हणतात. खरेखोटे इतिहासाला माहित नाही.
फत्तेखानानंतर इ. स. १६६५ त पुरंदर किल्ल्यावर दुसरा जंग झाला. छत्रपती शिवाजी महारांचे राज्य नेस्तनाबूद करण्यासाठी दिल्लीहून बादशाह औरंगजेबाने दिलेरखान व मीर्झा राजे जयसिंह ह्या दोन बलाढ्य सरदारांना दक्षिणेस पाठविले. त्या वेळी पुरंदरावर किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडा ! दिलेरखानाने तीन अजस्त्र तोफा आपल्याबरोबर आणल्या होत्या बराच काळापर्यंत मुरारबाजीने किल्ला शर्थाने लढविला. पुरंदच्या पायथ्याशी २०,००० हशमांच्या मोगली `छावणीत खाशा दिलेरखानाशी झुंजता  झुंजता मुरारबाजी देशपांडा ठार झाला.
बेरडांचा पुडांवा
 मे १८०३ च्या सुमारास सासवडी बेरडांचाही दंगा झाला होता. बाजारपेठेत मोठा हलकल्लोळ माजून बेरडांनी भरपूर लुटालूट केली. त्याचे वर्णन एका ऐतिहासिक पत्रात असे आढळते की, ‘पेठेतून शिंपि वाणी सासवडास येत होते. तो बेरडांनी लुटालूट करीत आहेत खुंडू बगाला (बहुतेक हे उपनाम बंगाळा असावे) जिवे बेरडांनी बाटेस लुटताना मारला . तो मुडदा पडला आहे. सासवडची दशा राहिली नाही. स्वारी येऊन काही गावचा बंदोबस्त केला जाईल बेराडांची ठीक रीत नाही’ सासवडची अशी शोचनीय व अस्थिर स्थिती झाली होती.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              
मोहरांचा हंडा
सासवडने अशा लुटालुटी चे अनेक तडाके सहन केलेले दिसतात. पेशवाईचा अस्त झाला. चोहोकडे अराजकता माजली. इंग्रजांनी पुरंदर जिंकला व आसपास लुटालुटीला सुरुवात केली. त्या काळी चांबळीचे सरनाईक घराणे घरंदाज व धनाढय होते. लुटालुटीच्या भयाने त्यांनी आपला मोहरांचा एक हंडा सासवडचे निरगुडे यांच्या घरी सुरक्षित राहावा म्हणून आणून ठेवला. हल्लेखोरांनी प्रत्यक्ष सासवड लुटण्यास –सुरुवात केली.अनेक घरे धुवून काढली. पण निरगुडे मोठे प्रसंगावधानी. त्यांनी लुटारूंना चकवण्यासाठी आपल्या घरातील धान्य, भांडी व इतर वस्तू इतस्तत: घरात पसरून टाकल्या. लुटारूंची टोळी जेव्हा निरगुड्याच्यां घरात शिरली तेव्हा इतस्तत: पडलेले सामान पाहून हे तर आधीच लुटले गेले आहे, असे समजून ते पुढे गेले. लुटीची वार्ता चांबळीस सरनाइकांच्या कानी जाऊन ते चिंताग्रस्त झाले. निरगुडे यांनी चांबाळीस त्यांना सांकेतिक भाषेत निरोप पाठविला की, ‘तुमची बाळंतीण सुखरूप आहे.’पुढे सारनाईकांनी आपला मोहरांचा हंडा परत नेला.’ हे सांगणे नकोच. निस्वार्थी व विशुद्ध मित्र प्रेमाचे केवढे हे प्रामाणिकपणे उदाहरण !
सरकारबाग
संगमेश्वर देवालयाच्या पुढील पुलाच्या दक्षिणेस व सध्याच्या कोर्टकचेरीच्या आसपासची जागा पूर्वी ‘सरकार बाग’ म्हणून प्रसिद्ध होती. त्या बागेची मालकी श्रीमंत पेशवे यांच्याकडे असल्याने श्रीमंतांच्या देवपूजेसाठी प्रतिदिनी बागेतील फुले पुण्यास रवाना होत. या बागेसाठी सासवडजवळच्या सुपे येथून धरणाचे पाणी आणविले होते.धरणाचे पाणी सुरु झाले म्हणजे ते प्रथम या बागेसाठी अगोदर सासवडपर्यंत खाली येई. बागेचे भिजवणे झाले म्हणजे मग वाटेतील इतरांना ते पाणी घेण्याचा हक्क असे. वास्तविक धरण्याच्या पाटास जेथून सुरुवात होते तेथून क्रमशः भिजवणे सुरु होऊन सर्वात शेवटी असलेल्या जमिनीचा नंबर सरशेवट लागतो.पण या धरणाच्या पाण्याची वाटपरीत उलटी दिसते. यांत अग्रहक्क सरकार बागेच्या जमिनीस दिला आहे. सांप्रत सदर बागेच्या जमिनीपैकी कांही भाग आज येथील मराठी शाळेकडे असून त्यांना हा पाण्याचा मान प्रथम मिळतो.
इ. स. १७६९ च्या सुमारास संबंधित माळी मंडळी व चिमाणाजी गोविंद यांच्या मध्ये धरण्याच्या पाण्यावरून बराच वाद माजला होता. हे प्रकरण सखाराम बापू बोकील यांच्याकडे जाऊन त्यात तडजोड करण्याचा खूप प्रयत्त्न केला. माळी समाजामध्ये जर काही तंटा बखेडा झाला तर त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी एका माणसाची सर्वानुमते नेमणूक होत असे. या व्यक्तीला ‘म्हेतरा’ असे म्हणत. थोडक्यात त्या जमातीचा तो न्यायधीश होता, असे मानण्यास हरकत नाही. या म्हेतरावरूनच ‘म्हेत्रे ‘ हे आडनाव चालू झालेले आहे.  पूर्वी घोडयाच्या मोठमोठया पागा असत, व्यावस्थेसाठी काही मंडळीची खास नेमणूक केली जात आसे. घोडयांची  निगा राखण्याबरोबर हे लोक घोडयावर बसण्यातही पटाईत असत. सरदार स्वारीवर निघाले की, त्यांच्य समवेत घोडेस्वार होऊन हे लोकेही जात. प्रसंगी त्यांनाही तलवार चालवावी लागे पुढे पुढे ह्या तलवारबहाद्दर मंडळींना रणाचेच वेड लागले, तेच ‘रणापिसे’. युद्धामध्ये पूर्वी ‘जमदाड’ नावाचे शस्त्र वापरीत असत. ते वापरण्यात विशेष कौशल्य असे. जे लोक हे शस्त्र सदोदित वापरीत ते ‘जमदाडे’ झाले. शितोळे देशमुख व जगताप देशमुख यांचा पूर्वी बराच वाद झाला, प्रकरण शेवटी हाताघाईवर आले व जगतापदेशमुखांनी शितोळेदेशमुखांना बोपदेव घाटाच्या खाली हाकलून दिले. देशमुख मंडळीनां पालखी वापरण्याचा मान असे. शितोळेदेशमुख हे पालखीतून घात उतरू लागले तेव्हा एकाने त्या झगड्यातून शितोळ्याचीं एक चौरी सासवडपर्यत आणली चौरी आणणारे ते ‘चौरे’ झाले.

गोदाजी जगताप   ः    
 ईर्षेने  मुसेखान आपली फौज गडावर चढवू लागला. राजांनी मुसेखानाचा रोख पहिला.आणि आपली फौज त्याच्यावर सोडली. त्या फौजेत ‘सुभानमंगळ’ जिंकून आलेला सासवडचा छावा गोदाजी जगताप होते. मजबूत, पिळदार शरीराचा, भाला फेकण्यात पटाईत असलेल्या गोदाजीवर व त्याच्या मारत्या समशेरीवर महारजांचा भारी विश्वास. राजांचा हुकुम सुटताच गोदाजीने आलत्या भलत्यांचा परामर्ष न घेता,सरळ वेध घेतला तो खुद्द मुसेखानाचाच घनघोर युद्ध सुरु झाले. पुरंदर रक्ताने  SHRन्हाला. लाल फुले वार्र्याने  हालत आहेत, असे भासू. लढता लढता गोदाजीने मुसेखानाच्या छांताडात खचकन भाला खुपसला. ओल्या लाकडात कुर्र्हाड बसावी तसे झाले. पण मुसेखान मोठा जबर माणूस; अफाट ताकतीचा मर्द गडी. त्याने दोन्ही हातांनी आपल्या छातडातील भाला उपसला. आणि त्वेषाने दातओठ चावून भाल्याचे दोन तुकडे करून फेकले. खानाने आपला मुख्य दुश्मन हेरला आणि गोदाजीबरोबर तलवारीने भयंकर युद्ध मांडले. प्रचंड आरोळ्या उठल्या, आकाश दणाणून गेले. त्वेषाने पेटलेला मुसेखान गोदाजीवर वाघासारखा तुटून पडला. पण गोदाजी सुद्धा सामान्य असामी नव्हती महाराजांच्या आखाड्यात तयार झालेला पक्क्या गुरूचा चेला तो ! कर्र्हेच्या पाण्यावर गोदाजी वाढलेला. मल्हारी मार्तंडाच्या मातीत अंग घुसळून तयार झालेली गोदाजीची शरीरयष्टी पोलादासारखी कणखर जीव खाऊन गोदाजीने मुसेखानाच्या खांद्यावर असा वार केला कि बस. खांद्यापासून पोटापर्यंत खानाची फाकळी उडाली. मुसेखान पडला. आणि पराक्रमाची शर्थ करून पडला. आणि फत्तेखानाच्या सैन्याचा धीरच खचला. गोदाजीने विनीचा खासा स्वारच हाणला. आणि मावळ्यांनी इकडे शत्रूंचा हुरडा उडविला. लढाईचे पारडे फिरले, फत्तेखान धुळीने माखलेले तोंड खाली करून विजापुरकडे पळत सुटला. वीर गोदाजीने पुरंदरची स्वराज्यातील पहिली लढाई मारली. कर्र्हेचे पाणी स्वराज्यबांधणीला उपयोगी पडले.
भुलेश्वर
---------------
देवगिरीकर यादव यांच्या काळात महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली, त्यातीलच भुलेश्वर हे एक यादवकालीन शिल्पवैभवाचा देखणा नमुना असलेले शिवमंदिर. पुरंदर तालुक्याच्या क-हापठावर सह्याद्रीच्या दोन पर्वतरांगा एकमेकाला संमातर अशा पुवर्व पश्चिम पसरलेल्या आहेत. उत्तर दिशेच्या पर्वतरांगेवरील पुर्वेच्या टोकाला दौलतमंगळ किल्ला दिमाखात उभा आहे. याच किल्ल्यावर भुलेश्वर मंदिर आहे. पुरंदर तालुक्याचे शेवटचे टोक माळशिरस गाव असून, भुलेश्वरचे प्राचीन दिमाखदार वैभव पिढ्या न पिढ्या गावाने साभांळले. प्रत्येक माणसाच्या मनात या मंदिराची शिल्पकला आणि शंभुमहादेवाच्या प्रति मनात श्रद्धा आहे.
 तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले आहे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेवर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. गजनीच्या महंमदाने केलेल्या आक्रमणावेळी बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. महिनाभर यात्रा असते. परिसरातून मानाच्या कावडी येतात. चैत्री बारशीलाही मंदिरासमोर मानाच्या कावडी नाचवल्या जातात. ही जुनी परंरपरा आहे. या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करुन यादवकालीन भुलेश्वर हे पु्स्तक लिहिले आहे.महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही आहे.
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता. नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. तुकोजी होळकर यांच्या काळात पुढील नगारखान्याचे बांधकाम झाले.
दौलत मंगळगड-
 १६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला बांधला, (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. जीर्णोद्धारामुळे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
भुलेश्वर मंदिर हे पुरातत्वखात्याने ताब्यात घेतले असून राष्ट्रीय संरक्षक म्हणून जाहीर केले आहे. पुण्यापासून पन्नास किमी अंतर आहे. सासवड व यवतहूनही मंदिराकडे येण्यासाठी रस्ते आहेत. गडाच्या पायथ्याला भुलेश्वर वन उद्यान गावाच्या गायरान जमिनीत उभे आहे.

जेजुरीचा खंडोबा
जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा हे महाराष्ट्राचे लोकदेव आहेत. मराठी माणसांच्या मनामनात दोन्ही देवांबाबत तितकीत आपुलकी आहे. पुरंदर तालुक्यात पुण्यापासून सुमारे तीस मैल अंतरावर जेजुरी येथे खंडोबाचे देवस्थान आहे. धनगर, कोळी, मराठा, व इतर अनेकांचे हे आराध्यदैवत आहे.
इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले. सभोवतालच्या ओव-या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पाय-या, दीपमाळा, कमानी उभारल्या आहेत. बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची कल्पना येते. जेजुरीचे शिखर व समोरच्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता.  देवळाच्या ओव-या ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.
देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळि भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.
खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळि भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वर्‍हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो.
खंडोबाची स्थाने ः जेजुरी (पुणे), पाली (सातारा), मंगसुळी (बेळगाव), देवरगुड्डा (राणीबेन्नूर), मैलार लिंगप्पा (खानापूर), बेल्लारी), मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा), आदि मैलार (बीदर), अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद), माळेगाव (नांदेड), सातारे (औरंगाबाद), शेगुड (अहमदनगर) व निमगाव धावडी (पुणे).
कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले. खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते. महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मा्र्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे. जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती. मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला. कुळाचार - दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे. जागरण - गोंधळ : देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
तळी भरणे : तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा ,सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा. बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्त्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. याशिवाय रगडा, भरीत आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात. खंडोबाचे उपासक ब्राह्मणांपासून लिंगायत, धनगर, मराठा अशा सर्व जातींमध्ये आढळतात.


उमाजी नाईक ः
(जन्म : ७ सप्टेंबर १७९१ मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२) महाराष्ट्रातील आद्यक्रांतीकारक.
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला. तो म्हणजे 'उमाजी नाईक'. ३ फेब्रुवारी हा या आद्यक्रांतीकाराचा स्मृतिदिन इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?
तर टोस म्हणतो, उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचपुरा, करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुऱ्हाडी, तीरकामठी, गोफणी चालवण्याची कला अवगत केली.  पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या अधिपत्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरी च्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.  उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते.
१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील, फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते. आणि काहीचे प्राण घेतले होते.
१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते, इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.  इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण ही फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली. अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८५७ चे बंड सुरु केले.त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.

 श्रीनाथ म्हस्कोबा ः वीर येथे दरवर्षी माघ महिन्यात श्रीनाथ म्हस्कोबाची यात्रा भरते. चांदण्याच्या मांडवात देवाचा लग्नसोहळा रंगतो.
लोकरंगाचा उबदारपणा पहाटवारा थोपवत होता. ढोल-ताशा, झांजेचा निनाद आणि थिरकणारी पावले शांत झाली होती. भक्तिरंगात सवाई सर्ज्याचं चांगभलं ऽ चा जयघोष थांबला अन्‌ लाखभर वऱ्हाडी भाविकांच्या साक्षीने देवांचे लग्न लागते. वीर (ता. पुरंदर) येथे देवांच्या या पारंपरिक लग्नसोहळ्याने दहा दिवसांची यात्रा सुरू झाली. सर्वत्र विद्युत रोषणाई केली होती. पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात सोहळा आणखीनच रंगून गेला. सायंकाळपर्यंत सात गावांच्या पालख्या, मानाच्या बावीस काठ्या व मानकरी गावांची भक्तांची वऱ्हाडे दाखल झाली होती. अगोदर देवांच्या लग्नाला येण्यासाठी व नंतर पहाटे सव्वादोनपासून पुन्हा परत फिरणाऱ्या भाविकांमुळे रस्ते भरभरून वाहत होते.
कोडीतसह मानाच्या पालख्या सायंकाळीच पोचल्या होत्या. तत्पूर्वी हळदही लागून गेल्याने, देऊळवाड्यात लगीनघाई सुरू झाली होती. रात्री दहा वाजता सर्व देवांना लग्नाला येण्याचे आवतन गेले. पाठोपाठ वीर देवस्थानची पालखी छबिन्यासह रात्री साडेदहाच्या सुमारास अंधारचिंच या भेटस्थळी पोचली. तेथे देवस्थानच्या संबंधातील पाच मानकऱ्यांना फुलांच्या माळांचा मान दिला. त्यानंतर पालखी व काठ्यांची भेटाभेट पार पडली. कोडीत, कण्हेरी, वाई, सुपे, पुणे, सोनवडी, राजेवाडीच्या पालख्या व शिखरी बावीस काठ्या निनादात आल्या. ढोल-ताशाच्या साथीने देवाला पोशाख केला होता. मुंडवळ्या - बाशिंगेही कोडितकरांकडून घेऊन देव सजविले गेले होते. देऊळवाडा, सभोवताली व साऱ्या नगरीत मिळेल त्या जागी लोक थांबून होते. पहाटे पावणेदोन वाजेपर्यंत अक्षता पोचविल्या. परंपरेप्रमाणे मंगलाष्टकांमध्ये देवाचे लग्न पार पडले. भक्त कमळाजी व देवी तुकाईच्या भेटीला त्यानंतर पालख्या गेल्या.

'मल्हारगड' ः पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे. पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.
असेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहिरीतही पाणी नाही. या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा दिसतो. बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे जरा मोठे देऊळ महादेवाचे आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे.
 सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.  
किल्ले पुरंदर ः सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. पुरंदर म्हणजे इंद्र. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदऱ्या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला.
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
बिनी दरवाजा :  पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्‍याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.
पुरंदरेश्वर मंदिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशवांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच दिल्ली दरवाजापाशी येतो.
दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
खंदकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
पद्मावती तळे: मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेंदऱ्या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदऱ्या बुरूज.
केदारेश्‍वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्‍वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्‍वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्‍वर, रोहिडा, मल्हारगड, कर्‍हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरावखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात. भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.


पांडेश्वर मंदिर
जेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे,महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात' अशी लोकधारणा आहे .या मंदिराला गौरवशाली वारसा आहे या मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर ,दगडी मुखमंडप ,नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या ,मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात. भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे.४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते.मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर,उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे .विटांच्या या प्राचीन वस्तूला चौथ्या शतकात आकार मिळाला असावा तर पुढील जोडकाम सतराव्या किंवा अठराव्या शतकात झाले असावे.दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत.सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने,प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक ,भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.

संत सोपानदेव
- सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू.  सोपानदेवांची समाधी सासवडला भोगावती नदीच्या तिरावर आहे. या भावंडांच्या जन्मशकात तीन-तीन वर्षांचे अंतर आहे. मुक्ताई या सर्वात लहान त्यांचा सांभाळ त्यांच्या पेक्षा मोठे असलेले सोपानदेव करतात. हे सांगताना जनाबाईंनी सोपानदेवांच्या जन्मशकाचा पुढील उल्लेख केला आहे.
शालिवाहन शके अकराशे नव्वद ।
निवृत्तिआनंद प्रकटले ।।
त्र्याण्णवाचे साली ज्ञानदेव प्रकटले ।
सोपान देखिल शाण्णवात ।।
नव्व्याण्णवाचे साली मुक्ताई देखिली ।
जनी म्हणे केली मात त्यांनी ।।

ज्ञानदेवांप्रमाणेच निवृत्तीनाथच सोपान देवांचे गुरु व त्यांनीच सोपानदेवांना दीक्षा दिली. या सर्व भावंडांचं जीवन म्हणजे बव्हंशी एक प्रकारचा सहप्रवासच आहे. ज्ञानदेवांच्या साधनेचे व लेखनाचे सोपानदेव हेही एक समकालीन साक्षीदारच आहेत. शुद्धिपत्रादी पैठणच्या सच्च परीक्षेतून त्यांनाही जावंच लागली आहे.
माझ्या नामयाचा गुरु ।
तो हा सोपान सद्गुरु ।।
असा उल्लेख जनाबाईंच्या अभंगात आढळतो. ज्ञानदेवांना त्यांच्या इतर भावंडांनी समाधी घेतली पण सर्वप्रथम समाधी घेतली ती सोपानदेवांची. त्यांचा समाधिशक १२१५ असा आहे.
सोपानदेवांचं लेखन विविध प्रकारचं आहे. ज्ञानेश्वरी ही जशी ज्ञानदेवांची त्याप्रमाणं सोपानदेवी ही सोपानदेवांची.
सोपानदेवी ही देखिल गीताटीकाच आहे. ती समश्लोकी असली तरी तिचे अभंग फक्त सातशे नसून ७३९ आहेत- म्हणजे तिच्यात सातशेहून थोडेसे (३९) अभंग जास्त आहेत.
ज्ञानदेवांप्रमाणं सोपानदेवांनीही हरिपाठाचे अभंग लिहिले. त्यांनी ११३ अभंग लिहिले. त्यांची विषयवार विभागणी अशी करता येईल ज्ञ्
१) पांडुरंगमाहात्म्य २) नामस्मरण ३) पंढरी-माहात्म्य ४) आध्यात्मिक अवस्था ५) उपदेशपर अभंग इत्यादी.

नामयाचा धरूनि हात । सांगे संवत्सराची मात ।
विठोजि म्हणे देई चित्त । ऐक गुह्यार्थ सांगतो ॥ १ ॥
ही पुण्यभूमी पवित्र देखा । याची मूळ आदि पीठिका ।
सिद्धेश्वर नागेंद्र देखा । पुरातन नांदती ॥ २ ॥
- संत सेना महाराज यांनीही सोपानदेवांवर अंभग रचना केली आहे.
सासवडच्या पश्चिम दिशेस भोगवती (चांबळी) च्या पावनतीरी हे पुण्य पवित्र सोपानदेव मंदिर उभे आहे.

गोदाजी जगताप:
पुरंदराचा पहिला रणसंग्राम गाजविणारे वीर. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला .गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.
बाळाजी विश्वनाथ भट
( इ.स. १६६० – एप्रिल २, १७२०), किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पेशवे पंतप्रधान होते.
महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती. १५७५ च्या सुमारास महादजीकडे ही परंपरागत देशमुखी होती. महादजीस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. देशमुखीचे घराणे असल्याने बाळाजीस मोडी वाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्याशी त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली, त्यामुळे बाळाजीला श्रीवर्धन सोडावे लागले. त्याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणून आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले.
२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका केली. मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहू महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते, शाहूने गादीवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहूने सुरुवातीला समजूतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहूंचा नाइलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहूंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावून घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आनि नारो राम यांनी शाहूंचा पक्ष बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहूंच्या बाजूने गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. शाहूंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणून नेमले आणि सेनाकर्ते असा किताबही दिला. १७०७पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले.
पुरंदरे वाडा
आबासाहेब पुरंदरे वाड्याचे पुढे खिंडार पडले व थोडी पडझड झाली, तरी काही भाग सुस्थितीत आहे. तटबंदी मजबूत आहे. त्यामुळे आताचे मालक जय पुरंदरे करू इच्छित असलेले ऐतिहसिक संग्रहालय या वाड्यात साकारले, तर पुन्हा या वैभवला झळाळी मिळेल!!
कर्हेकाठवरील पुरंदरे घराण्याचे संस्थापक व पेशव्यांचे दिवाण अंबाजीपंत पुरंदरे यांनी १७१० मध्ये हा पुरंदरे वाडा बांधला. ते साताराचे शाहू महाराज यांचे मुतालिकही होते. शिवाजी महाराजांच्या काळात कुलकर्णी वतनदार म्हणून त्रिंबक पुरंदरे होते. शाहूंना गादीवर बसविण्यात या अंबाजीपंत पुरंदरे यांनी बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे) यांच्यासह आघाडी घेतली होती. हा पुरंदरे वाडा चार एकर क्षेत्रावर सात चौकी पद्धतीने बांधला आहे. चाळीस हजार चौरस फुटाचे बांधकाम यात आहे. तीनशे वर्षापुर्वी कर्हेकाठाची खडकाळ जागा खास निवडून हा चिरेबंद तटबंदीचा व आत चारमजाळी असलेला वाडा बांधला.
पुरंदरे यांचे पूर्वज पुर्वी हत्तिवरुन अंबारीतून यायचे. त्यामुळे बाहेरचा मुख्य दरवाजा अंबारीसह हत्ती आत येईल, एवढा होता. एखाद्या किल्ल्याचे वा गढीचे प्रवेशद्वार वाटावे असे या वाड्याचे आतील मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याला बुरूज, दगडात कोरलेल्या निरक्षण खाचा, लाकडी दारावर लोखंडी संरक्षक भलेमोठे खीले, दगड – लाकूड – लोखंड – शिसे यांचे जोड प्रत्येक ठिकाणी आजही मजबूत आहेत. वाड्यात जेवढे बांधकाम वर दिसते. तेवढेच जागा तळघरांनी व्यापली आहे. वाड्यात आड, विहीर, भुयारे, टेहळणी मनोरे चार दिशेला चार आहेत. ते आजही दिसतात. फक्त भुयारे कुठपर्यंत जातात, याची खात्री झाली नाही. तीनशे वर्षापूर्वीची रंगीत भित्तीचित्रे आजही आहेत; असे जय पुरंदर यांनी सांगितले आहे. त्यांच्या बंधुनी वाड्याचा काही निकामी भाग उतरविला. तो भाग वगळता इतर ठिकाणी वास्तु उभी आहे.


-----------------------------------------------

पुरंदर

क-हाकाठी मातीतून
घुमतो एक पुकार
मर्द मराठ्यांनी इथे
गाजवली तलवार

उसळून कोसळे वीर
मुरारबाजी हा थोर
कारकुड किल्लेदार
बेंगळे मानीना हार

किल्ल्यावर होते
मावळे चिमूटभर
ढासळले हे दगड
सपासप केले वार

ध़डाडून पडल्या तोफा
दिलेरखान झाला गार
हर हर गर्जनेने
शत्रू भेदला आरपार

अभेद्य होता पुरंदर
वज्रगड त्याच्या आड
शत्रू कापी चराचरा
मोगलांची मोडे खोड

शिवशाही बीज इथे
मातीत रुजली खोल
शंभू शिवाचा हा छावा
बोलतो बोबडे बोल

लढताना हो पडला
बाजी पासलकर
गरगरा फिरे पट्टा
गोदाजी करी कहर

दौलत मराठ्यांची
पानीपतात गेली
बेईज्जत महाराष्ट्राची
या पेशवाईत झाली

कुंजीर कामठे माने
जाधवराव पोमण
जगताप खेडेकर
इंगळे काळे रोमण

५२ सरदार इथले
अटकेपार लावी झेंडे
पुढे जानोजी भिंताडा
लढे मानाजी पायगुडे

मातीला इथल्या येतो
गंध या इतिहासाचा
द-या खो-यातून घुमतो
आवाज शिवशाहीचा

क्रांतीवीर उमाजीनं
इंग्रज केला हैराण
या कडेकपारीतून
त्याचं उठवलं रान

बुलंद बाका पठारी
मंदिरे शिवाची सात
सात गडांचा पहारा
खडाच नऊ घाटात

भंडा-यात न्हाला गड
पैलतीरी भुलेश्वर
क-हा घेऊन कवेत
नांदतो पांडेश्वर

रामायण लिही वाल्ह्या
घडवून चमत्कार
म्हस्कोबा गुलालाने
रंगवितो गाव सारे

भिवरी बोपगावाला
कानिफनाथांचा वास
पोखर नारायणपूरला
दत्त मंदिरी आरास

मराठी पिळाची पगडी
गडकोट बहारदार
स्वाभिमानी हा बाणा
माझा जपतो पुरंदर

सोपानाने शेवटचा
श्वास इथेच घेतला


घे-यातल्या मावळ्यांनी
छातीचा केलाय कोट
चिव्हेवाडीनं धरलं
काळदरीचे हे बोट

पानमळा बागाईत
वीर परिंचे खो-यात
सीताफळ अंजिराने
गु-होळी राजेवाडीत

छत्रपती शिवाजींचा
उद्धार फुल्यांनी केला
कुळवाडी भुषण ऱाजा
सांगितला हो जगाला

बेलसर व नाझंर
क-हामाईची लेकर
दिवे,सोनोरी माहूर
गडाचे किल्लेदार

नीरा क-हेच्या खो-यात
असा इतिहास घङला
कुणब्यांनी इथल्या
दुष्काळ मातीत गाडला

पुरंदराच्या मातीत
निसर्गाची नवलाई
फळे फुले पालेभाज्या
इथे पिके आमराई

क-हाकाठाची मंदिरे
खुणावती पुन्हा मला
शिवशाहीचे तोरण
म्हणे बांधायचे तुला

पुरंदराच्या भूमीत
जन्म पुन्हा पुन्हा व्हावा
मातीने कणा कणात
इतिहास जागवावा

दशरथ यादव, पुणे
मो.९८८१०९४८१


शंभुराजे

फसवलंय तुम्हाला शंभुराजे याचा लागलाय सुगावा
औरंग्याच्या डोळ्यात पाणी दुसरा कशाला हो पुरावा ॥धृ॥

श्‌ऊशी नव्हतीच लढाई तुम्ही परंपरेशी लढलात
भीम पराक्रमाने तुमच्या सगळा गनिमही झुरावा ॥१॥

लढाया जिंकल्या तुम्ही पण कागदावर हरलात
कुचाळलेल्या लेखण्या बदलून सांधावा लागेल दुरावा ॥२॥

सांगा कसं म्हणू तुम्हाला आता धर्मवीर आम्ही
धर्मानेच केला घात, कपटाने काढला कुरावा ॥३॥

आनंदासरु आले त्यांना जेव्हा काढले डोळे तुमचे
शिरच्छेद तुमचा व्हावा, धर्माचा कोंबडा आरावा ॥४॥

देवाची खाऊनी भाड हिजड्यांनी केला कावा
नामर्दाचा अंश अजून इथल्या मातीत उरावा ॥५॥


दशरथ यादव, पुणे —