Popular Posts

Wednesday, May 29, 2013

घुंगुरकथा सातासमुद्रापार

------------------------
ढोलकीवरचं पोट... धरतंय घुंगराचं बोट
----------------------------------

सारिका नगरकरची घुंगुरकथा सातासमुद्रापार


-----------------------
दशरथ यादव, पुणे
------------
स्वतः ढोलकी वाजवून घुंगराचे बोलावर थिरकणारी...दिलखेचक अदा..ठसकेबाज मुरडत रसिकांच्या मनाचा ठाव घेणा-या सारिका नगरकर हिने लावणीकलेत वेगळा ठसा उमटविला आहे. परदेशातही प्रतिष्ठा मिळवून देत नखरेलनारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून लावणीला सातासमुद्रापर नेली. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय लावणीकला गौरव पुरस्कार देऊन छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात तिला गौरविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने तिच्या कलेविषयी घेतलेला आढावा.
नखशिखांत शृगांरिक ठसकेबाज लावणीने भल्याभल्यांची दैना करणारी लावणीकलावंत सारिका हिचे नगरला दहावीपर्यंत शिक्षण झाले. बालपणी मामा रोहिदास चंदाले यांच्या अंगाखांद्यावर खेळताना ढोलकीशी ओळख झाली. नंतर घुंगराशी नाते जुळले. ढोलकी अन् घुंगराशी एकाच वेळी नातं जुळवून दोन्ही कला सादर करण्याचे भाग्य फार कमी कलावंताच्या वाट्याला येते. ते भाग्य सारिकाला लाभले. लावणी कलेच्या या छंदातूनच नखरेलनारी हा किर्ती देशमुख हिला घेऊन केलेला पहिला व्यवसायिक कायर्क्रमाने राज्यभर तिचे नाव झाले. पैसाही मिळाला. त्यातून ईस्त्राईल, दुबई या देशात लावणीकला पोचवली. लावणीची नजाकत परदेशात दाखवून परदेशी पाहुण्यालाही सारिकाच्या अदाने ठेका धरायला लावला.
लावणी कलेविषयी बोलताना सारिका भावूक होऊन सांगत होती. ‌‌‍‍मला वाटले नव्हते की मी याक्षेत्रात पुढे जाईल. बालपणी मनावर रुजलेली लावणी कला ख-या अर्थाने बहरली ती वयाच्या सतराव्या वर्षी. नखशिखांत शृंगारिक लावणीला नाके मुरडणारी सनातनी मंडळी चोरून लपून लावणी पाहतात. बाहेर तिची बदनामी करतात. तेव्हा खूप वाईट वाटते. हीच लावणी महिलांपर्यंत पोचवण्याचा माझा मानस असून, मी त्यासाठी काम करीत आहे. आगस्ट २०१२ रोजी इस्त्राईलच्या दौ-यावर गेलो. वीस दिवसाच्या दौ-यात डेडसी, जेरुसलम, बेरशेव्हा, रामलेक, जार्डन, किरियादगार, या ठिकाणी फिरलो. मराठी भाषक मंडळी भेटली की समाधान वाटायचे. लावणीचा फ्रान्सच्याही रसिकांनी आनंद घेतला. ज्यू भाषिक लावणी एकताना वन्समोअर एवजी ओदप्पा म्हणायचे. नंतर कळले की वन्समोअरला ओदप्पा म्हणतात. या अनुभवाने खूप समाधान मिळाले.

सिद्धी प्राडक्शनच्या बॅनरखाली नखरेलानारी चे शेकडो प्रयोग झाले. कमी वेळात व कमी वयात कार्यक्रमाचे निर्माती, व्यवस्थापन व लावणी नृत्यांगना म्हणून नावलौकिक झाला. तीस कलावंताचा संच, असून, अकलूज लावणी महोत्सवातही सहभाग घेतला होता. राष्ट्रवादी महोत्सव, मुंबई व बिलोली लावणी महोत्सवातही लावण्या सादर केल्या आहेत. मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची तिची इच्छा आहे.

विचार काय हाय तुमचा...पाहुणं विचार काय हाय तुमचा.. म्हणत सारिकाचा रंगमंचावर प्रवेश झाल्यानंतर जी धमाल उडते ती काही औरच असते. मावशी कविता शेवगावकर हिच्याकडून लावणीचे धडे घेतले. लावणी सातासमुद्रापार नेली पण आता कॅनडालाही जाणार आहे.
कीर्तीची साथ
--------------
किर्ती देशमुख ही लावणी कलेने भारावलेली.. लावणी होऊन जीवन जगणारी कलावती.
महाविद्यालयात स्नेहसंमेलनातून लावणीशी लळा लागला. अन् त्याच दिशेने प्रवास सुरु झाला. कोणाकडूननही काही खास शिक्षण न घेता लावणीच्या शाळेत प्रथम क्रमांकावर नेहमीच दाद मिळविणारी कीर्ती प्रारंभी करंट ४४०, पिंजरा, या कायर्क्रमातून झळकली. नंतर माझा महाराष्ट्र, लोकधारा असे कार्यक्रमही तिने केले. स्टार प्लसवर कुछ कर दिखाया मालिकेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बैठकी पेक्षा खड्या लावणीला शहरी भागात रसिकांची जास्त पसंती असल्याचे ती सांगते. सुर्योदय नवी पहाट, टेलिफिल्म, कल्याणी मालिका व धनगरवाडा, लावणी सीडीमध्ये काम केले आहे. आई, वडिल नोकरी करतात. सुरवातीला घरुन विरोध होता. पण नंतर प्रोत्साहन मिळाले.

--------------------
दशरथ यादव, पुणे

No comments: