अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे दहावे राज्यस्तरीय
महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता.पूरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०१७
रोजी झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून दशरथ यादव यांनी केलेले भाषण
उपस्थितांना खूप भावले. पुरोगामी विचाराचा गाभा असलेले भाषण हशा
आणि टाळ्यांची दाद मिळवीत रसिकांच्या काळजाचा ठाव घेत होते.
सस्नेह जय जिजाऊ
स्वराज्याचे देखणं स्वप्न पाहणा-या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी
महाराज, बहुजनसम्राट बळीराजा, सम्राट अशोक,
चार्वाक, तेजपुंज गौतमबुदध, संत नामदेव, संत तुकाराम, क्रांती
ज्योती सावित्रीमाई, ताराराणी, अहल्याबाई
होळकर, फातिमाबिबी, राष्ट्रपिता महात्मा
ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूमहाराज,
भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे, सत्यशोधक दिनकरराव जवळकर या महामानवांना प्रथमता अभिवादन
करतो.
विद्धेविना मती गेली
मतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले
अवघे अनर्थ अविद्येने केले
असा विचार मांडून समतेच्या क्रांतीची मशाल खांद्यावर
घेऊन अवघे आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित करणारे महात्मा फुले म्हणजे तेजपुंज सत्यशोधक
सूर्यच.
सत्याच्या निखा-यावर चालत राहून खचलेल्या
पिचलेल्या बहुजन समाजाचे हूंकार जागृत करत सनातनी सुलतानी संकटाशी लढणारा लढवैय्या
क्रांतीकारक म्हणजेच महात्मा फुले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या १० व्या राज्यस्तरीय
महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करुन शिवविचाराचा
सन्मान केल्याबद्धल मी सर्वांचा ऋणी आहे. पुरंदर तालुक्यातील
खानवडी हे महात्मा फुले यांचे मूळ गाव. या गावात होणा-या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मला मिळते हा माझ्या जीवनातील एक
आनंदाचा ऐतिहासिक असाच क्षण मी मानतो.
आल्याड क-हा अन पल्याड नीरा
शिवशाहीचा झरा रं
शिवशंभुचा पुरंदर म्हणजे मोतियाचा तुरा रं
सातगड व नवघाटाची क-हापठारची ही
दौलत मराठ्यांच्या इतिहासात कायमच अग्रभागी राहिली आहे. अनेक
आक्रमणेही या भूमीने सोसून कायम नव्याची निर्मित करण्यात या भूमीचा मोलाचा वाटा आहे.
काळ कोणताही असो. प्राचीन, अर्वाचीन, शिवशाही, पेशवाई,
इंग्रज या प्रत्येक काळात क-हापठारने महत्वाची
भूमिका बजावली आहे. माझ्या सारख्या शिवविचाराने झपाटलेल्या आणि
नाविन्याचा कायम शोध घेणा-या माणसाला याच भूमीची उर्जा लेखनाला
बळ देत आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ
लिहिणा-या छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
ब्रिटीशांना आव्हान देत शिवराज्याची प्रेरणा घेऊन स्वतःचे राज्य उभा
करणा-या राजे उमाजी नाईक यांचा जन्मही पुरंदरच्या गडाच्या पायथ्याला
भिवडी गावात व्हावा, संत सोपानदेवांनी समाधीसाठी पुरंदरचीच निवड
करावी, छत्रपतीनी स्वराज्याची पहिली लढाई याच मातीत लढावी,
बळीराजाच्या काळातील एका खंडाचा खंडोबा या मातीत जेजुरीत उभा रहावा,
राजमाता अहल्यादेवींनी घोंगडीवर बसून राज्यकारभार करावा, यादवराज्यात उभारलेली हर हर महादेवाची शिल्पवैभवी देवालये भुलेश्वर,
पांडेश्वर, नारायणेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर याच पठारावर उभी राहावी, पेशवाईला साथ देणारी ५२ घराणी येथेच उभी राहावी, हा काही
निव्वळ योगायोग नाही. पुरंदरच्या मातीतच अशी वेगळी ताकद आहे.
ऐतिहासिक, सामाजिक क्रांतीच्या अग्रभागी पुरंदरचा
क-हापठार नेहमीच आघाडीवर राहिला आहे. महाराष्ट्राच्या
ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक जडणघडणीत पुरंदरच्या
क-हापठारचे सोनेरी पान इतिहासात नेहमीच वैभवाने झळकत राहिले आहे.
बालपणापासूनच ऐतिहासिक, भौगोलिक परिसराचे वैभव
मला खुणावत राहिले. येथील गडकोट म्हणजे क-हापठारचा बुलंदबुरुजच आहेत. पुरंदर, वज्रगड, कानिफनाथगड, मल्हारगड,
ढवळगड, दौलतमंगळगड आणि जेजुरगड आजही वैभवाने इतिहासाच
वारसा जपत उभे आहेत. सह्याद्रीपर्वताच्या डोंगररागांनी वेढलेला
क-हापठार भौगोलिक दृष्टया विविधतेने नटलेला आहे. एकाच भागात महाराष्ट्राच्या विविधतेचे दर्शन येथेच पाहायला मिळते. जगाचे प्रतिबिंब भारतात, भारताचे प्रतिबिंब महाराष्ट्रात
आणि महाराष्ट्राचे प्रतिबिंब पुरंदरमध्ये पाहायला मिळते. ही देणगी
पुरंदरला निसर्गानेच बहाल केली आहे. दुष्काळ, पाणीटंचाई, पावसाळा, कोकणचा निसर्ग,
डोंगरद-या आणि सपाट प्रदेश ही सगळी रुपे क-हापठारवर पाहायला मिळतात. अडचणीवर मात करीत झेप घेणारी
इथली विद्वत्ता, सकंटाचा सामना करणारा पराक्रम इथल्या मातीच्या
कणाकणात सामावलेला आहे.
पिढ्या न पिढ्याचा अंधकार दूर करुन बहुजन समाजाला त्यांच्या
मूळ रुपाची जाणीव करुन देणारा महात्मा म्हणजेच ज्योतीराव गोविंदराव फुले. त्यांच्या सहवासाने मंतरलेली इथली माती आणि माणसं सुद्धा इतिहास घडवून पिढ्या
न पिढ्या संघर्ष करीत आहेत. क्रांतीकारकांच्या रक्ताने मंतरलेल्या
मातीतून आजही पराक्रमाचे हूंकार ऐकायला येतात. पण हूंकार ऐकायलाही
इतिहासाचे कान आणि संघर्षाची बीजे रुजलेले मन असावे लागते. त्यांनाच
हे क्रांतीकारी हूंकार ऐकायला येतात. ज्यांना ज्यांना हे हूंकार
ऐकायला आले त्यांनी या मातीत इतिहास घडविला. क्रांतीचे हूंकार
ऐकून साहित्याच्या क्षेत्रात छत्रपती संभाजी महाराज, महात्मा
फुले, वाल्मिक ऋषी, शाहीर सगनभाऊ,
होनाजीबाळा, आचार्य अत्रे, कृ.वा.पुरंदरे, श्रीधर नाझरेकर, साहित्य मार्तंड य़शवंतराव सावंत,
नामदेवराव जाधव यांच्या पर्यंत अनेकांनी इतिहास रचला. शिक्षणाच्या क्षेत्रात एकाच हरगुडे गावातील डाँ राम ताकवले, डाँ. एम.जी.ताकवले हे दोघे सखे भाऊ कुलगुरु होण्याचाही इतिहास घडला. जुन्या इतिहासाची प्रेरणा घेऊन नवा इतिहास रचणारी ही बावनकशी सोन्याची खाण
म्हणजे क-हेपठारची भूमी आहे. परिवर्तनाचा
ध्यास घेऊन बंड करणा-या मातीत अनेक कोहिनूर हि-यांनी कर्तृत्व गाजविले. या मालिकेतील एक तेजस्वी रत्न
म्हणजेच महात्मा फुले. हजारो वर्षे जातीयतेच्या विळख्यात अडकलेल्या
समाजाला मुक्त करण्याचे काम येथूनच सुरु झाले. शोषित समाजाचे
दुःख दूर करण्यासाठी मूळाचा शोध घेण्याचे काम त्यांनी केले. गुलामगिरी,
शेतक-यांचा आसूड, तृतीयरत्न,
अखंड या साहित्यातून त्यांनी समाज उभारणीचा जागर मांडला. त्यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील कटगून. मूळगाव खानवडीतच
क्रांतीची बिजे रुजली. सनातनी समाजव्यवस्था उखडून काढण्याचे बंड
त्यांनी येथूनच सुरु केले. एखतपूरला पुर्वीच्या काळी गुलामांचा
बाजार भरायचा. गुलामगिरी हे पुस्तकाची मूळ बिजे येथेच रुजली असावीत.
खानवडी हे क-हाकाठावरील छोटेसे
टुमदार खेडं. महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार तेवत ठेवण्याचे
काम सत्यशोधक दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे यांनी केले.
क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील,
गुरुवर्य बाबुराव जगताप, नागनाथ अण्णा नायकवडी
अशी कितीतरी माणसं या विचाराने भारावून काम करीत राहिली, सध्याच्या
काळात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी विचाराचा
झंजावात पुन्हा प्रज्वलीत केला आहे.
याच शिव(सत्य)विचाराचा जागर करावा याच हेतूने दहा वर्षापूर्वी खानवडीत महात्मा फुले यांच्या
मूळगावी साहित्यसंमेलन घेण्याचा निर्णय घेतला. लोकनेते शरद पवार
साहेबांनी महात्मा फुले यांचे स्मारकाचे उद्घाटन १९९५ साली केले. स्मारकात क्रांतीबाचा पुतळा बसविण्याचे काम पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केले.
सासवडहून खानवडीला जाणारा रस्ता खेडेकर साहेबांनी केला. लोकांची वर्दळ वाढू लागली. क्रांतीपिठातून समाजपरिवर्तनाचा
हूंकार पुन्हा ऐकायला येऊ लागला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
राज्यभरातील साहित्यिकांची मांदियाळी येऊ लागली. महात्मा फुले
प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाची कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मोठ्या हिरारीने
ज्यांनी सहभाग घेतला ते साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्य़क्ष शरद गोरे,
राजकुमार काळभोर, राजाभाऊ जगतपा, केशवराव काकडे, सुनील धिवार, रवींद्र
फुले, सुनील लोणकर, दत्ता भोंगळे,
नंदकुमार दिवसे, गंगाराम जाधव अशी कित्येक जण आहेत.
आज मला साहित्याच्या लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होताना दिसतोय.
महात्मा फुले यांच्यावर प्रेम करणारा मोठा समाज असला तरी प्रत्यक्षात
त्यांचे विचार आचारणात आणणारी मंडळी शोधावी लागतात ही मोठी खंत आहे. सत्यशोधक विचार म्हणजे आभाळातील वीज आहे, ती पकडून ठेवायला
काळीजही मोठ लागते. ब्राम्हणी व्यवस्थेने दुबळे झालेले मन अजून
सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. सत्य कटू असते
आपण नुसते म्हणत असतो, पण स्वीकारीत नाही. सत्यशोधक चळवळ तळागाळात फोपावली असती तर जातीयतेची जळमट केव्हांच गळून पडली
असती. कष्टकरी, मजूर, शेतकरी वर्ग आणखी पटीने प्रगतीपथावर गेला असता. रुढी,
परंपरा, अंधश्रद्धा मोडून काढली तर समाजमन सशक्त
होईल. अशी फुल्यांची धारणा होती. त्यासाठी
शिक्षणाची मूर्हतमेढ त्यांनी पुण्यात रोवली. स्रीशिक्षणाचा पाया
घातला. हाच विचार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारून जागर
केला. माणूस शिकला, अर्थिक सक्षम होताना
दिसत असला तरी मनाने दुबळा आणि संघर्षापासून बाजुला जाताना दिसतोय. ही मोठी चिंता करण्यासारखी बाब आहे. माहितीतंत्रज्ञानाचा
स्फोट झाला तरी परंपरेची हाडके चघळत बसणारी मंडळी समाजात कोणती क्रांती करु पाहत आहेत
याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे. शिकून शहाणी झालेली पिढी बुवा
बाबांच्या सत्संगाला जाऊन डोलताना पाहिल्यावर मन चिंताक्रांत होते. जातीयता, धर्मवादात माणूसकी हरवली आहे. जाती धर्माचे कंपू होतायेत. भांडवलशाहीच्या हातात राजसत्ता
जाऊ लागलीये, धर्माचा अतिरेक्त होत गेला तर ही लोकशाही पुन्हा
धोक्याच्या वळणावर येईल. सामान्य माणूस पुन्हा संकटात गेल्या
शिवाय राहणार नाही. सगळ्या सुखसोयी सोबत असताना सैरभैर जीवन जगणारा
समाज महासत्तेपर्यंत कधी पोचणार. महात्मा फुल्यांच्या स्वप्नातील
मानवता समाजाच्या चेह-यावर कधी फुलणार या प्रश्नांची उत्तरे कधी
मिळणार याचाही विचार करावा लागेल. मानवी समाजाचे कल्याण सत्यशोधक
विचारानेच होईल. याविचाराचा जागर होत राहिला पाहिजे. मग क्षेत्र कोणतेही असो. कृषी, शिक्षण, साहित्य,कला, नाट्य,प्रसारमाध्यमे या सगळ्या क्षेत्रात सत्याचा जागर
होत राहिला पाहिजे. यातूनच संघर्ष करणारी स्वाभिमानी पिढी निर्माण
होईल. सध्याच्या काळात मानवता कल्याणाचा विचार वेगळ्या कल्पोकल्पित
वाटेने जाताना दिसतोय. समाजमनाचा कानोसा घेतला तर अस्वस्थता दिसते.
याच्या मूळ कारणांचा शोध घ्यावा लागेल. महात्मा
फुले यांचा सत्यशोधक विचारच समाजाला तारु शकतो. या विचाराचा जागर
तळागाळापर्यंत होत राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
धन्यवाद।
जिजाऊ जय शिवराय जय ज्योति जयक्रांती