Popular Posts

Thursday, November 19, 2020

वारीच्या वाटेवर समीक्षा

 

वारीच्या वाटेवर महाकांदबरी

 भागवत धर्माची बखर

 

वारकरी संप्रदाय हा समाजाला समतेचा संदेश देत मानवता धर्माचे पालन करायला लावणारा, जातीधर्मापासून समाजाला समतेच्या मार्गावर नेणारा एक परिवर्तनशील संप्रदाय आहे. हिंदूधर्माच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला ख-या अर्थाने दिशा दाखविली ती भागवत धर्माने. वारीच्या वाटेवर ही संत साहित्याचे अभ्यासक दशरथ यादव यांची ऐतिहासिक महाकांदबरी म्हणजे वारकरी संप्रदायाची बखर आहे. श्री यादव यांनी पंधरा वर्षे संशोधन करुन या महाकांदबरीची निर्मिती केली आहे. यामुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाचे मूळरुप समाजासमोर आले आहे. लेखनातील संशोधकवृत्ती, सहजता, लालित्य, लोकदेव विठोबाचा लडिवाळपणा, संताचा संघर्ष, वारक-यांची श्रद्धा, मूळ इतिहास उलगडत जातो.

।विठ्ठलाने मला।  आहे सांगतिले।

सत्य वारीतले।  लिहायला।।

हा त्यांचा अंभग वारीच्या मूळरुपाकडे आपल्याला घेऊन जातो.

हिंदूधर्माच्या अडगळीतून बाहेर पडण्यासाठी अनेक संत आणि महापुरुषांनी बंड केले त्यातूनच देशात अनेक धर्मपंथ उदयाला आले. महानुभाव, शीख, लिंगायत, व भागवत संप्रदाय होत. या सगळ्या संप्रदायात भरभराट झाली ती भागवत धर्माची.  वारी म्हणजेच परिवर्तन व प्रबोधन आहे.

समाजातील जातीव्यवस्था संपविण्यासाठी ज्या ज्या संतानी बंड केले त्यातूनच भागवत धर्माची स्थापना झाली. बंडखोर संताचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय.

       भले देवू कासेची लंगोटी

       नाठाळाच्या माथी हाणू काठी

जगविख्यात तत्वज्ञानी विचारवतांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेने विचार करायला लावला. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीने क्षमाशीलता शिकवली. संत नामदेवरायांनी भारतभर नेलेल्या वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली ती, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, तुकाराम, विसोबा खेचर, सावतामाळी, चोखामेळा, संत जनाबाई, नरहरी, एकनाथ, गोराकुंभार, सेनान्हावी, आदी संतप्रभावळीमुळेच. अलीकडच्या काळात संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत कैकाडी महाराज, प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांनी वारकरी परंपरेचा प्रबोधनाचा वारसा चालविला.

 

पंढरीची वारी आहे ज्याचे घरी

आणिक न करी तीर्थव्रत

असा संदेश देऊन देवाधर्माच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला मानवतेचा मार्ग दाखविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले. हिंदूधर्माच्या अडगळीतून बाहेरकाढून नवा धर्म संतांनी निर्माण केला. तो म्हणजे भागवत. वारकरी संप्रदाय म्हणजे हिंदूधर्माचे शुद्धीकरण. वारकरी संप्रदायाचा एकच देव म्हणजे लोकदेव विठोबा. समतेच्या तत्वावर आधारलेल्या भागवत धर्मात आता अनेकांनी शिरकाव करुन भोळ्या भाबड्या वारक-यांना दिशाभूल करण्याचे काम सुरु केले आहे. वारकरी चळवळ आता धोक्याच्या वळणावर उभी आहे, हजारो वर्षापासून समाज जीवनाचा अंग बनलेली वारकरी चळवळ हा समाजाच्या उद्धाराचा ऐकमेवमार्ग आहे. त्याची वाढ निकोप झाली पाहिजे.

 

श्री यादव यांनी १९९६ पासून वारीचा प्रवास सुरु केला. दैनिक सकाळमध्ये पंढरीच्या वारीच्या वार्तांकनाच्या निमित्ताने पायी वाटचाल सुरु झाली. भागवत धर्म व समतेच्या विचाराने विठ्ठलमय होऊनच अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील ही पहिलीच महाकांदबरी आहे. .

 

भागवत संप्रदायाचा मागोवा

 

भागवत धर्म हा हिंदू धर्माचा गाभा असून, एकेश्वर भक्तीला प्राधान्य देणारा आहे. भगवत या संस्कृत शब्दाचा अर्थ ईश्वर असा होतो. भागवत हे त्या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. भागवत म्हणजे भगवंताने सांगितलेले विचार आणि त्यापासून बनलेला धर्म. भागवत आणि वारकरी हा एकच पंथ आहे. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता हा भागवत संप्रदायाचे द्योतक आहे. त्यातूनच भागवत संप्रदायाला वैष्णव संप्रदाय ही पण बिरुदावली लावली जाते. वेदपूर्व काळात निर्माण झालेल्या भागवत संप्रदायाबाबत संशोधकामध्ये मतभिन्नता आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मते भागवत धर्म वेदकाळापूर्वी निर्माण झालेला आहे. ब्युलरच्या मते इ..पू. नवव्या दहाव्या शतकात हा धर्म रुढ होता. पाणिनीच्या अष्टाध्यायात वासुदेव हे नाव आले असून, त्याकाळी वासुदेवाची भक्ती करणारा हा भागवत धर्म अस्तित्वात होता, असे रा.गो. भांडारकर सांगतात. ..पू २०० मध्ये वासुदेवाच्या स्मरणार्थ बेसनगर येथे हिलिओडोरस या स्वतःला भागवत समजणा-या वकिलाने गरुडस्तंभ उभारला होता. समुद्रगुप्तानंतरचे राजे स्वतःला परम भागवत म्हणून घेत असत. उत्तर भारतात पाचव्या शतकापासून भागवत धर्म लोकप्रिय आहे. तामिळ नाडूत आळवार संतानी इ...चवथ्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत वैष्णवभक्तीचे महत्व वाढविले.

भागवत धर्म सूर्य उपासनेतून निर्माण झाला असाही प्रवाह आहे. शिव भागवत, देवी भागवत हे संप्रदाय अस्तित्वाद असले तरी भागवत संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात आहे. नारायणीय, एकांतिक, पांचरात्र, सात्वत या नावानेही हा संप्रदाय होता असेही मत नोंदवले गेले आहे. वासुदेव कृष्णाने या धर्माची स्थापना केली की पुनर्जीवन यात मतभेद असले तरी उत्तर कालात कृष्ण हाच उपास्य देव बनला. दक्षिणेत रामानुज व उत्तरेत रामानंद यांनी कृष्णाऐवजी रामाला उपास्य बनवून धर्माचे पुनरुजीवन केले. वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू, हितहरिवंश हरिदास आदींनी कृष्णभक्तीचा प्रभाव वाढविला. अहिंसेला प्राधान्य असून, भुतदया, परोपकार, आई वडिलांची सेवा या नैतिक मुल्यांना महत्व देण्यात आले आहे. संत व गुरु बद्दल आदर बाळगावा,  भक्तीतून ज्ञान मिळविणे हा उद्देश आहे. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतानी भागवत धर्माचे पुनर्रजीवन केले.

भागवत पुराण आणि भगवतगीता हे संप्रदायाचे प्रमुख आधारग्रंथ आहेत.  नारायणीय उपाख्यान, हरिवंश, पंचरात्रसंहिता, सात्वत संहिता आणि विष्णूपुराण हे गंथ, भक्तीसुत्रे, रामानुज वगैरे आचार्यांचे ग्रंथ आधारभूत मानले जातात. भागवत धर्म हा लोकधर्म असून सामाजिक दृष्ट्या हीन मानलेल्या जातीतही साधू जन्माला येतात, केवळ स्त्री शूद्रांनाच नव्हे तर पशुंनादेखील मोक्षाचा अधिकार असतो, भक्तीच्या क्षेत्रात कुळ, वंश, देश भेद मानू नयेत. रुढ, कर्मकांड, संकुचित आचारधर्म, अंधश्रद्धा यांच्या पेक्षा नैतिक कर्तव्य श्रेष्ठ आहे असे धर्म सांगतो. परमार्थिक क्षेत्रात सामाजिक समता आणून नितिनिष्ठेला स्वयंश्रेष्ठता दिली.

भारतात आर्य व अनार्य असा संघर्ष हजारो वर्षे सुरु आहे, आर्यांचे देव वेगळे, अनार्य (मूळनिवासी) देव वेगळे होते. वैदिक धर्माचे अस्तित्व ठळकपणे न टिकल्याने अनार्यांच्या परंपरेचा स्वीकार करुन त्यांनी अनार्यांच्या देव आणि धर्मात शिरकाव करुन दंतकथा निर्माण केल्या. पण जीवन शैली वेगळी असल्याने ते कधीच हिंदूसंस्कृतीत मिसळले नाहीत. मानवी समाजावर कायमचा प्रभाव निर्माण करण्यासाठी वैदिकांनी जाती संस्था निर्माण केल्या. सण उत्सव आणि मनुस्मृतीनुसार बंधने घालून समाजाला कायम गुलामीत ठेवण्याच्या उपाययोजना केल्या. त्याकाळातही बंड झाले. संघर्ष केला. मानवीप्रवृतीच्या संशोधनातून माणूस गुलामीत राहणे पसंत करतो, हे पण सिद्ध झाले.  त्यासाठी स्वातंत्र्ये नाकारली. रंगव्यवस्था (वर्णव्यवस्था) निर्माण करुन ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र अशी व्यवस्था निर्माण केली. समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन वैदिक तत्वज्ञान मूळनिवासींवर बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्यातून समाजमनाची दिशाभूल करीत आपले ध्येय साधण्याचा प्रयत्न केला. हा सांस्कृतिक संघर्षे हजारो वर्षे सुरु आहे. यातूनच समाजातून अनेक धर्म आणि पंथ निर्माण करुन मानवतेच्या कल्याणासाठी विद्रोह करणारे संत आणि महापुरुष समाजमनावर राज्य करु लागले. त्यांनाच देवत्व प्राप्त झाले. वारकरी संप्रदायाने पिढ्यान पिढ्याची ही बंधने आणि जातीयता मोडून काढण्याचा शेकडो वर्षे प्रयत्न केला. त्यामुळेच त्याग आणि शौर्याचे प्रतिक असलेला भगवा ध्वज खांद्यावर घेऊन नामदेवांनी भागवत धर्म भारतभर पोहचवला. समाजमनाची मशागत केली. मराठी मुलूखावर वेगळी छाप निर्माण करुन वारकरी संप्रदायाने जगाचेही लक्ष वेधून घेतले आहे. रुढी परंपरा मोडायला निघालेला वारकरी संप्रदाय रुढीच्या परंपरेत अडकविण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न चालू आहेत. पण हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. वारकरी संप्रदायाचा पायाच मूळी प्रबोधनावर आधारलेला असल्याने मानवमुक्तीचा हा संघर्ष अखंड चालूच राहिला. देवगिरी ही यादव राजांची राजधानी. याच काळात भागवत धर्म, महानुभाव पंथाची भरभराट झाली. पंढरपूरच्या मंदिराला यादवराजांनी देणग्या दिल्याचे शिलालेखातून स्पष्ट होते. महाराष्ट्रात शिवमंदिराची शिल्पसौंदर्य याच काळात उभारली गेली. भागवत संप्रदायाने हजारो वर्षापासून निर्माण केलेली वारीची वाट काळानुसार वेगवेगळ्या वाटेने समाज जागृती करताना दिसते. वारीच्या वाटेचे मूळ शोधताना मन काळामागे धावते. कधी भगवान गौतम बुदधांच्या काळात बौद्ध तत्वज्ञान घेऊन वाट सम्राट अशोकाच्या राज्यात आनंद निर्माण करते. गुप्त काळात  पुश्यमित्र शुंगाने बौद्ध भिकूंच्या हत्या केल्याने तात्पुरती लुप्त होऊन, दत्तसंप्रदायाच्या माध्यमातूनही हा विचार ही वाट वर डोकावते. नवनाथ संप्रदायाच्या नऊ नाथांनी समाजाच्या मनातील भीती काढण्यासाठी याच वाटेने प्रवास केला. काळानुरुप वारीच्या वाटेने वेगवेगळे रुप धारण केले असले तरी मूळ भारतीय विचार कधी मरु दिला नाही. विसाव्या शतकात स्थापन झालेला शिवधर्म वारीच्या वाटेवरुनच प्रवास करीत आहे.

हजारो वर्षापासूनची मानवता धर्माची बदललेली रुपे अनुभवनांरी वारीची वाट ही ऐकमेव साक्षीदार आहे. याच वाटेने रामकृष्ण गेले. बळी गौतमानेही ही वाट उजळून काढली. 

लक्ष लक्ष पावलांनी माझे भाग्य उजाळले

मला भेटायला इथे ज्ञानदेव तुका आले

 

 संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी किर्तन, प्रवचन, अंभगातून वारीची गोडी निर्माण केली. अवघा समाज आकर्षित करुन भगवा धव्ज वारक-यांच्या खांद्यावर डौलाने फडकवत ठेवला. हाच भगवा ध्वज हाती घेत हर हर महादेव गर्जना करीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वारक-यांना मावळे बनवून रयतेचे राज्य उभारले. वारकरीच शिवाजी राजांचे मावळे बनून हातात ढाल तलवार घेऊन प्राणपणाने लढले. छत्रपती संभाजी महाराजांनी वारक-यांना वारीसाठी मदत केल्याच्या नोंदी आहेत. वारकरी संप्रदायाचा हा पुढारलेला पुरोगामी विचार याच वारीच्या वाटेने लोकदेव विठोबाचे गुणगाण करीत जागविला. वारकरी, दिंडी, पताका अन टाळ वाजवीत मोठ्या दिमाखात नटलेली वारीची वाट म्हणजे जुन्या पुर्वजांची वहिवाट आहे. मराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय सांस्कृतिक जीवनाचे अंगही आहे. भारताला महासत्ता व्हायचे असेल तर याच वाटेने जावे लागेल.

वारीच्या वाटेवर अतंरंग

वारीच्या वाटेवर या ऐतिहासिक महाकांदबरीत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पायी प्रवासाचा सगळा इतिहास आहे. त्यामध्ये वाटचालीत होणारे विसावे, त्याठिकाणचे एतिहासिक व भौगोलिक महत्व, संप्रदायाची परंपरा महत्वाच्या घडामोडी आहेत. वारीच्या वाटेवरचा चैतन्यदायी इतिहास, नीरास्नान, सासवड, जेजुरीचे ऐतिहासिक महत्व, तरगडावचे उभेरिंगण, सदाशिवनगरचे गोलरिंगण, वाखरीचे भव्य रिंगण, सोपानदेव व माऊलींची बंधूभेट,

खुडूस, ठाकूरबुवा समाधी जवळ शेतात रंगणारी गोल रिंगणे. भंडीशेगावचा मुक्काम व वाखरीचे गोल रिंगण आणि पंढरपूर पर्यंतचा प्रवास व पंढरपूरचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व.

विठ्ठल मंदिर, चंद्रभागा, तेथील मठ, संत नामदेव, जनाबाई, व सगळ्याच संताचा इतिहास कांदबरीत आहे. संत तुकाराम महाराज सोहळ्याची वाटचाल व मुक्कामी ठिकाणाचा इतिहास आहे. सोह्ळ्यातील एकूण दिंड्याची माहिती. देहू, आळंदी आणि पंढरपूरचा इतिहास. आषाढीची महापूजा, चंद्रभागेवरील गर्दी दिंड्याचा मुक्काम या सगळ्या गोष्टींचा उलगडा कांदबरीत होतो. पंढरीची वारी पहिल्यांदाच शब्दबद्ध केली असून ही भागवत धर्माची बखर आहे.. वारीचे अंभग, वारीचे खंडकाव्य, दिंडयाची एकत्रित माहिती, पालखी सोहळ्याची माहिती आहे. श्री यादव यांची महाकादंबरी म्हणजे वारकरी संप्रदायाचा ऐतिहासिक ऐवज आहे. वारीच्या वाटेवरील सासवड (माळशिरस) हे त्यांचे मूळगाव. पुरंदरच्या मातीत बालपण गेले. येथेच संशोधनाची बीजे रुजली.

No comments: