Popular Posts

Thursday, November 19, 2020

पुरंदरला नाथसंप्रदायाचा वारसा

 

संत सोपानदेव

 

महाराष्ट्रात भक्तीसंप्रदायाने हजारोवर्षे समाजप्रबोधनाचे काम केले. विषमतेच्या विरोधात संतसंप्रदायाने मानव कल्याणासाठी  संघर्ष केला. जातीभेद, गरीब श्रीमंत, अंधश्रद्धा, विषमतेच्या विरोधात बंड करणा-या संताची प्रभावळ महाराष्ट्रात निर्माण झाली. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, संत सावतामाळी, गोरोबाकाका, संत नरहरी, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम आदींनी मराठी मनाची मशागत केल्यानेच समतेची बीजे या भूमित रुजण्यास मदत झाली. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. संत विचारांचा सुगंध मराठी मातीत खोलवर रुजल्यानेच जगाला हेवा वाटावा असा पंढरीच्या वारीचा सोहळा वर्षा न वर्षे दरवर्षी पायी वारीने स्वर्ग सुखाचा आनंद अनुभवत असतो. या संत प्रभावळीतील एक रत्न म्हणजेच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेव. विठ्ठलपंत व माता रुखमिणीच्या पोटी आळंदी येथे शके ११९६ मध्ये त्यांचा जन्म झाला. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर एक वर्षांनी सासवड सवंत्सरग्रामी त्यांनी संजीवन समाधि घेतली. प्राचीनकाळापासून बौद्ध, जैन, शैव व नाथसंप्रदायाने समाजमनाची मशागत केल्याने मानवता धर्माची पताका खांद्यावर घेऊन संत परंपरा गेली नऊशे वर्ष प्रबोधनाचा जागर करीत आहे. नवव्या शतकाच्या उतरार्धात महानुभाव, लिंगायत, भागवत संप्रदाय उदयास आला. नंतरच्या काळात गुरुनानकांच्या मार्गदर्शनाखाली शीख संप्रदायही काम करु लागला. भारतामध्ये शैव संप्रदायाचा झेंडा खाद्यावर घेऊन नाथसंप्रदायने समाजात आपला प्रभाव निर्माण केला. दत्तसंप्रदायानेही अनेक वर्षे समाजजागृती केली. संत नामदेवांच्या नेतृत्वाखाली भागवत धर्माची पताका भारतभर डोलाने फडकत होती. हिंदूधर्मातील अनिष्ट चाली रुढी परंपरेच्या विरोधात परिवर्तनाचा जागर नामदेवांनी कीर्तन, प्रवचनातून मांडला होता. प्रस्थापितांच्या विरोधात बंडाचा झेंडा घेऊन देशभ्रमण करणा-या नामदेवांना भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर पंढरपूरला गेले. ज्ञानेश्वर संप्रदाय त्यांनी भागवत धर्मात विलिन केला. कल्पनेच्या जगात आभाळात स्वर्ग शोधणा-या समाजाला भुवैकुंठावर पोचविण्याचे काम भागवतधर्माने केले होते. ज्ञानेश्वरांची कीर्ती वाढत असताना धाकटे बंधू सोपानदेव त्यांच्या सावलीसारखे बरोबर होते. जनमानसावर माउलींचा प्रभाव असताना सोपानदेवांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली. गीतेवर समश्लोकी टीका सोपानदेवी ग्रंथांची निर्मिती केली. माऊलींनी आळंदीत संजीवन समाधी घेतल्यानंतर एक वर्षाने संत सोपानदेवांनीही सासवडला चांबळी नदीच्या तीरावर संजीवन समाधी घेतली. त्यावेळी निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, विसोबा खेचर, संत सावतामाळी, संत नामदेव कुटुंबासह हजर होते. संत नामदेवांच्या समाधिच्या अभंगामुळे संत ज्ञानेश्वर व सोपानदेवांचे खरे चरित्र लोकांना समजले. दोन्ही भावंडाना समाधी देण्यासाठी स्वतः पांडुरंग हजर होते. असे लडिवाळ लालित्य पुर्ण व करुणेचे अभंग नामदेवांनी लिहिले आहेत.

देव म्हणे नाम्या। मार्गशीर्ष गाढा।

जावे सासवडा उत्सवासी।।

सोपानासी आम्ही दिधले वचन।

चला अवघेजण समुदाय।।

सोपानदेवांच्या संजीवनी समाधी सोहळ्याचे वर्णन नामदेवांनी केले. साक्षात पांडुरंगाने सोपानदेवांना पीतांबर नेसवला. सप्त नद्यांच्या पाण्याने स्नान घातले.

गंध आणि अक्षता विसोबाचे हाती।

पुजा ते करिती सोपानाची।।

नारा,विठा,गोंदा पाठविला म्हादा।
झाडावया जागा समाधिची।।

सगळ्या संताना, लोकांना समाधीसोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. नागेश्वराच्या मंडपात लोक बसून होते. जनसमुदायाच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या होत्या. बाजूलाच उभी असलेली मुक्ताई धाय मोकलून रडत होती. हत्तीखडकावर निवृत्तीनाथ विचारमग्न झाले होते. संवत्सरग्रामचा अर्थ देवांनी नामदेवांना उलगडून सांगितला. ब्रम्हदेवाने तप केलेली ही भूमी आहे. सोपानदेवांना समाधिसाठी म्हणूनच ही जागा निवडली.

आल्याड क-हा अन पल्याड निरा

हा शिवशाहीचा झ-हा रं

शिवशंभुचा पुरंदर म्हणजे

मोतियाचा तुरा रं

याच क-हा पठारावर मल्हारी मार्तंड जेजुरीचा खंडोबाचा गड आहे. सह्याद्री पर्वताच्या पुर्व पश्चिम पसरलेल्या दोन समांतर डोंगर रांगावर दक्षिण बाजूला पुरंदर, वज्रगड, मल्हारगड असे तीन किल्ले आहेत. उतरेच्या डोंगररांगेवर कानिफनाथगड, सोनोरी किल्ला, ढवळगड, दौलतमंगळगड (भुलेश्वर) आहेत. शिल्पकलेचा सुंदर ठेवा असलेले यादवकालीन भुलेश्वर, नारायणेश्वर, वटेश्वर,पांडेश्वर, संगमेश्वर, शंकेश्वर ही शंभु महादेवाची मंदिरे पुरंदरची आभुषणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई याच मातीत झाली. छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म याच पुरंदर किल्ल्यावर झाला. इतिहासाचा शौर्याने मंतरलेला वैभवी वारसा पुढे आद्यक्रांतीवर राजे उमाजीनाईक, क्रांतीगुरु लहुजीवस्ताद, महात्मा ज्योतीराव फुले, शाहीर सगनभाऊ, होनाजीबाळा, आचार्य अत्रे आदींनी जोपासला. हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या लढाईत सरसेनापती वीरबाजी पासलकर कामी आले. त्यांचे समाधी मंदिर सासवडमध्ये आहे. ५२ सरदारांचे भव्यदिव्य वाडे जुन्या इतिहासाची साक्ष देत अजूनही उभे आहेत. श्रीमंत गोदाजीराजे जगताप, श्रीमंत पिलाजीराव जाधवराव, सरदार बाळोबा कुंजीर, सरदार आबासाहेब पुरंदरे, पानसे अशा मातब्बर मंडळीनी सासवडचा इतिहास जीवंत ठेवला आहे. पहिला पेशवा श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट यांची समाधी क-हाकाठावरच आहे. भक्ती आणि शक्तीचे पावनतीर्थ म्हणजे माझे सासवड होय.

नाथसंप्रदायाचा वारसा

पुरंदरला शूरवीर,समाजसुधारक, संत, साहित्यिक व नाथसंप्रदायाचाही प्रभावी वारसा लाभला आहे. दिवेघाट माथ्यावरील बोपगावच्या डोंगरावरील कानिफनाथांचे मंदिर भाविक व पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. भव्यमंदिराला असलेला एक फूट रुंदीचा छोटासा दरवाजा कुतूहलाचा विषय आहे. शंभु महादेवांच्या मंदिराची भव्यदिव्य रांग जशी या भूमित पाहायला मिळते, तशी महादेवाचे भक्त आणि आणि नाथसंप्रदायाचा इतिहासानेही ही माती मंतरली आहे. नाथपरंपरा व शिष्यगण ही निर्माण झाले. संत सोपानदेव ही मूळचे नाथसंप्रदायातच होते. वारकरी संप्रदायाची डोलारा नाथसंप्रदायाच्या पायावर मजबुतीने उभा आहे.

 

सोपानदेवानंतरची नाथपरंपरा

 

संत ज्ञानेश्वराचे नऊ शिष्य आहेत. त्यामध्ये सोपानदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, विमलांनद, सत्यानंद (सत्यामलनाथ), स्वरुपनाथ, चर्पटनाथ, सच्चिदानंद, रामचंद्रनृप यांचा समावेश आहे. या नऊ शिष्यापासून पुढे परंपराविस्तार झाला.

संत सोपानदेवापासून - मुचकुंदानंद (मुकुंदनाथ) अव्यक्त जनार्धन अलक्ष्य अचिन्त्य त्र्यंब्यकनाथ अशी पंरपरा निर्माण झाली. या त्र्यंबकनाथाचे दोन शिष्य कविदास मुकुंदराज व कोनेरीनाथ. कोनेरीनाथाचा शिष्य लिंगनाथ होय.

लिंगनाथ योगीहे नाथपंथी सत्पुरुष सुमारे १५० वर्षापूर्वी कर्नाटक चंदी चंदावरच्या बाजूस होऊन गेले. त्यांनी अमृतसार नावाचा योगशास्त्रविषयक ग्रंथ लिहिला. त्यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजे यांचे वंशज सरफोजी भोसले तमिळनाडू (तंजावर) राजे  होते. या ग्रंथात सरफोजी राजेंचे वर्णन केल आहे. हा कवी सरफोजींचा अश्रित  असावा. कोरोनाथांनी लिंगनाथ असे आपले नाव ठेवल्याचे कवी लिहितो. लिंगनाथाचा अमृतसार हा ग्रंथ योगपर असून त्यात १५ अध्याय व १४०० ओव्या आहेत. या गंथाची रचना शके १६४६ मध्ये कावेरी तीरी तंजावर येथे झाली. हा कवी सोपानदेव परंपरेतील आहे.

  कविदास मुकुंदराजहा त्र्यंब्यक नाथाचा शिष्य असून, योगविवेक व मार्तंडदीप ग्रंथ त्यांनी लिहिला. गोरक्षनाथांच्या संस्कृत ग्रंथावरीला ही टीका आहे. गोरक्षनाथांच्या नावावर योगमार्तंड व विवेक मार्तंड असे दोन ग्रंथ आहेत. या ग्रंथावर ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचा प्रभाव दिसून येतो.

  गंगाधरनाथ- सोपान परंपरेतील जनार्दनाचा शिष्य रघुनाथ व त्याचा शिष्य गंगाधरनाथ किंवा गंगानाथ होय. यांनी शके१७२१ मध्ये गोरक्षगीता निरुपण नावाचा ग्रंथ लिहिला. बेलापूर वनातील श्रीविद्यानंद स्वामी महाराज यांच्या साधुपुरुषाच्या स्वाधयाय ग्रंथात गंगाधरनाथांच्या ग्रंथाचा समावेश होत असे.

चंदावरचा लिंगनाथ आणि तंजावरच्या गरुडमठातील कवी शंकर हा नाथपंथी होता. गहिनिनाथांचा शिष्य प्रकाशनाथ होता तो नेमका कोणता याचा शोध घ्यावा लागेल.

आदिनाथ भैरवहे निघोज (ता.खेड जिल्हा पुणे) या गावचे.  त्यांचा जन्म येथेच झाला. शके १७५६ मध्ये विटे येथे नाथलिलामृत ग्रंथ त्यांनी लिहिला. आदिनाथाने वैद्य ११ शके १७६७ मध्ये नाशिक येथे समाधी घेतली. आदिनाथाचे वंशज निघोज्यात आहेत. आदिनाथाचा भैरवाचा नाथलीलामृत नवनाथभक्तीसाराहून सरस ग्रंथ आहे. तरीही राज्यात त्याला लोकप्रिता लाभली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जाते. २८ अध्याय आणि ५४९३ ओव्या या ग्रंथात आहेत. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, दासोपंत, एकनाथ, रामदास, नाभाजी, महीपती या संतकवीच्या साहित्यसागरात आदिनाथाने मनसोक्त विहार केलाय. त्यामुळे ग्रंथाचे महत्व खूप आहे. निवृती, ज्ञानेश्वर, सोपान मुक्ताबाई यांचा नाथसंप्रदायात समावेश करायला हवा. गहिनिनाथांकडून हा ठेवा निवृतीनाथांकडे आला. गहिनीनाथांनी जो उपदेश निवृतीला केला तो ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे.

पुरंदरचा नाथसांप्रदायाचा वारसा

सासवडचे गणेशनाथ आणि द्रविड देशातील प्रकाशनाथ असे आणखी दोन सोपानदेवांचे शिष्य होते. द्रवीड देशातील प्रकाशनाथांच्या परंपरेचा शोध घेतल्यास ज्ञानेश्वरोत्तर नाथसंप्रदायाचा अभ्यास करता येईल. नाथसंप्रदाय हा संत सांप्रदायाचा मूळ स्रोत आहे. आदिनाथ गूरू सकळ सिद्धांचा।

मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य।। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वोळला गहिनीप्रती।।गहिनीप्रसादे निवृतीदातार। ज्ञानदेवा सार चोजविले।।

 सासवडला शिंपीआळीत निरगुडे परिवाराकडे नवनाथ पैकी चौथे कानिफनाथ यांची समाधी आहे. हे स्थान पुरातन असून, पुर्वी वाडावजा बखळीतील मोकळ्या जागेत हे समाधीस्थान होते. कालांतराने निरगुडे परिवारातील खंडोजी निरगुडे यांनी त्यास छत निवारा केला. कै. खंडोजीचे पुत्र कै. बाळोबा निरगुडे यांनी गृहस्थाश्रमानंतर नाथदिक्षा घेऊन या समाधीस्थानातच अखेरपर्यंत वास्तव्य केले. या समाधीवर पंचधातुंचा नाथांचा मुखवटा होता. मुकुटावर मोर तर कानात मासोळ्यांची कलाकुसर होती. परंतु समाधी उघड्यावर असल्याने मुखवट्याची चोरी झाली. १९७९ साली कै. बाळोबांचे दुसरे चिरंजीव कै. सोमनाथ यांनी या जागेचा जीर्णोद्धार केला. त्यांचे पुत्र सुरेश यांनी नाथदीक्षा घेतली होती. त्यांनी पुन्हा पंचधातुचा मुखवटा कोल्हापूरहून आणला. २००९ साली याठिकाणी सिमेंटमध्ये घराचे काम करताना मध्यभागी मंदिराचेही काम केले. मंदिरात दररोज पंचोपचार पुजा व सांयकाळी आरती होते. दर गुरुवारी नाथांना प्रिय असलेल्या मलिद्याचा नैवेद्य दाखविला जातो. नवनाथ पारायण, धर्मनाथ बीज, रंगपंचमीला समाधी उत्सव साजरा केला जातो. नवसाला पावणारा देव म्हणून मोठी गर्दी येथे होते. निरगुडे घराण्यातील सातवी पिढी नाथांची अखंडसेवा करीत आहेत. कानिफनाथांचे मूळ समाधीस्थान नगर जिल्ह्यातील मढी येथे आहे. परंतु जनकल्याणाकरिता फिरत असताना नाथांनी अंशरुपात स्थान निर्माण केले. अशी अख्यायिका आहे. मंदिरात नाथांच्या लाकडी पादुका, गणेश तांदळा आहे. उत्सवासाठी नवीन चांदीच्या पादुका तयार करण्यात आल्या आहेत. निरगुडे परिवाराकडून चि. ओकार निरगुडे व शशिकांत निरगुडे हे नाथांची नित्यसेवा करीत आहेत.

गेल्या सात पिढ्या निरगुडे घराण्यातील लोक विधीवत पुजा करतात. छोटेखानी मंदिराच्या रुपाने मोठा ऐतिहासिक वारसा जतन करणारे निरगुडे कुटुंबही नाथसंप्रदायाशी जोडले गेले आहे. कानिफनाथ महाराजांची समाधी आणि सोपानदेवांनी समाधीसाठी निवडलेले सासवड याचा काही तरी संबध असावा असा अंदाज आहे. बोपगावच्या डोंगरावरील कानिफनाथ मंदिर सध्या पर्यटक आणि भाविकांचे श्रद्धेचे ठिकाण आहे. रंगपंचमीला येथे मोठी यात्रा भरते. भुलेश्वर डोंगररांगेवरील शेवटच्या टोकावर असलेले चौरंगीनाथांचे मंदिर आणि परिसर तसा दुर्लक्षित आहे. मात्र निसर्गाच्या कुशीत उभे असलेले हे ठिकाण येथील थंडगार हवा आणि याठिकाणाहून पुरंदर आणि दौंड तालुक्याचा दुरपर्यंतचा रमणीय परिसर नजरेस पडतो. चौरंगीनाथाचे हे ठिकाण अगदी उघड्यावर होते. पोंढेगावातील लोकांनी व भक्तांनी येथे मंदिराचे बांधकाम करुन निवारा केला आहे. नाथ संप्रदायाचा वारसा पुढे चालविताना खंड पडला असल्याने या परिसराचा विकास झाला नाही. इतिहास प्रसिद्ध भुलेश्वर मंदिरापासून चौरंगी नाथाचे ठिकाण अगदी जवळ आहे. भुलेश्वर मंदिरातील आखीव रेखीव यादवकालीन शिल्पकला भुरळ घालते. पुण्याचे वेरुळ म्हणून भुलेश्वर मंदिराचा उल्लेख होतो. संत नामदेवांच्या समाधीच्या अंभगात भुलेश्वरचा संदर्भ आहे. संत सोपानदेवांना समाधी दिल्यानंतर संत नामदेव आणि संतप्रभावळ चालत चालत भुलेश्वरी आले. येथे मुक्काम केला आणि दुस-यादिवशी सिद्ध बेटाकडे गेले. असे जुन्या अभंगातून संदर्भ मिळतात.

लोकदेव

महाराष्ट्राचा लोकदेव पंढरीचा विठोबा आणि जेजुरीचा खंडोबा आहेत. दोन्ही लोकदेवाची परंपरा भिन्न आहे. खंडोबाच्या भक्तांना वाघ्या व मुरळी म्हणतात. विठ्ठलाच्या भक्तांना वारकरी संबोधले जाते. देहू- आळंदीहून निघालेल्या पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीला पंढरपूरला जातात सासवडहून संत सोपानदेवांची पालखीही दरवर्षी हरिनामाच्या जयघोषात पंढरीला जाते. संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा दोन दिवसाच्या मुक्कामी सासवडला विसावतो. येथे संत सोपानदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची भेट होत नाही. माऊलींचा सोहळा सासवडला असतानाच सोपानदेव पालखी सोहळा पंढरीला निघतो. माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी दर्शनासाठी सोपानदेव मंदिरात गर्दी करतात.

-हाकाठावर सासवडला संत सोपानदेव महाराजांचा सातशेवा संजीवन समाधीसोहळा साजरा झाला. त्यावेळी वार्तांकनाच्या निमित्ताने सोहळ्यात मलाही सहभागी होता आले. महाविद्यालयात शिकत असताना क-हानदी आणि सोपानदेवांचे मंदिर, संगमेश्वर हे आमचे अभ्यासाची ठिकाणे होती. शाळकरी वयापासूनच सोपानदेवाविषयी कुतुहल होते. -हाकाठचा हा वैभवशाली इतिहास मलाही स्वस्थ बसू देत नव्हता. दैनिक सकाळमध्ये बातमीदारी करीत असताना वार्तांकन करण्याच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर पायी वारी करताना वारकरी संप्रदायाशी मी जोडला गेलो. तशी माझ्या घरी वारीची पंरपरा होतीच. पंढरीच्या वारीची महती हळूहळू कळत गेली आणि मी सुद्धा डोळस वारकरी बनून या सोहळ्यात चालत राहिलो. यातूनच माझ्याकडून वारीच्या वाटेवर या ऐतिहासिक महाकादंबरीची निर्मिती झाली.

बंधूभेट

·       संत सोपानदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पंढरपूरजवळ भंडीशेगाव येथील टप्प्यावर भेट होते. दोन्ही संताच्या पालख्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. सोपानदेव पालखी सोहळा सासवड, परिंचे, नीरा, बारामती, अकलूज मार्गे पंढरपूरला जातो. दुपारी तीन वाजता टप्पा येथे मोठ्या मनोभावे बंधूभेटीचा सोहळा पार पडतो. खरे तर ही बंधूभेट वारक-यांनाही फारसी माहिती नव्हती. नित्या विधी सारखी होती. विठ्ठलनामाचा जयघोष करीत माउलींचा सोहळा दुपारी चार वाजता टप्पा येथे घटकाभर विसावतो. दरम्यानच्या काळात संत सोपानदेवांचा पालखी सोहळा येथे आल्यानंतर दोन्ही सोहळ्यातील मानकरी जमा होता. सोपानदेवांचा रथ थांबवून मानकरी एकमेकांना शालश्रीफळ देऊन भेटतात. यावेळी हरिनामाचा जयघोष होतो. याला बंधूभेट असे म्हणतात. हा बंधूभेटीचा सोहळा मी वार्तांकन करताना दूरपर्यंत पोचविण्यात हातभार लागला. सोपानदेव संस्थानकडून गोसावी कुंटुबातील मानकरी श्रीफळ आणि शालीचा स्वीकार करतात. टप्पा या ठिकाणी जुनाट लिंबाचे झाड असून येथूनच पंढरपूर तालुक्याची हद्द सुरु होते.

 

दशरथ यादव, पुणे

वारकरी सांप्रदायाचे अभ्यासक

मो. ९८८१०९८४८१

No comments: