Popular Posts

Saturday, January 18, 2014

रेंज येईना राया (लावणी)

          रेंज येईना राया  (लावणी)

कुठं तुम्ही गेला होता, जीव राहिना
दाबून धरलं बटण, राया रिंग वाजना
फोन लागेना राया, तुझी रेंज येईना   ।।धृ।।

कोण होती सोबतीला छान छान परी
कशी होती झुल्प तिची माझ्याहून बरी
छळतोया मला तुझ्या रुपाचा आईना   ।।१।।

कधी पण होतो तुमचा मोबाईल बंद
जडला का तुम्हा कोण्या राणीचा छंद
माझ्या मनातून शंका कशी जाईना ।।२।।

बदलता सीम तुम्ही जणू राञंदिन
मँसेज वाचता जाते कसे हरपून भान
तुमचा बँलन्स कसा शिल्लक राहिना   ।।३।।

चुकूनच लागली रेंज, कोण होती मैना
हँलो हँलो केले तरी ती काहो बोलेना
उतरली माझी बँटरी, अहो मन राहिना   ।।४।।



        वेळीच घाला आवर राया  (लावणी)

खासगीकरणाचा पेलना भार
शेतकरी लागलाय वाकायला
वेळीच घाला आवर राया
सहकार लागेल विकायला ।।धृ।।

महागाई झाली मिळत नाही
रास्त भाव आता कष्टाला
औषध खताचा सोसना डोस
वास करजाचा येतोय पिकाला ।।१।।

टाटा बाटा कसतील शेती
भूमिपूञ जाईल कामाला
ऊसमळे अन हे दुधसंघ
भांडवलदाराच्या दावणीला ।।२।।

कडू झाली साखर आता
वास येऊ लागला दुधाला
कष्टक-यांची चिपाडे जातील
राजकारण्यांच्य त्या चुलीला ।।३।।

सावकाराने घेतल्या सोसायट्या
इज्ज्त अब्रु आता लुटायला
जमीन,घर ठेवुनी घाण
बसलाया करज वाटायला ।।४।।


दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१



------------------------------
-------


     वय झालं सोळा (लावणी)

चालताना झोल माझा जातोया तोल
मला कीती मी सावरायंच
वय झालं सोळा माझा लवतो डावा डोळा
मन कसं मी आवरायचं             ।।धृ।।


स्वप्न मला गं पडत्यात भारी
सनई चौघडा वाजतोया दारी
येईल म्हणून सख्याची स्वारी
रात जागून काढलीया सारी
कीती वाट पाहू, अन उपाशी मी राहू
सांगा कुठवर झुरायंच......      ।।१।।

माझ्या मनाला पडलंय भ्याव
चिंचा बोरं वाटत्यात खावं
सख्या अचूक पडलाय डाव
सांगा लपून किती दिन राहावं
नको वेळ लावू, राया निणय घेवू
आपलं लगीन करायचं            ।।२।।

कळी फुललीया गाली आज
कशी झाकू मी नवतीची शेज
उघडी करुन रातीची लाज
किती शृंगार चढवला साज
ओठाची गं लाली, पुसट ही झाली
भाळी चांदणं पसरायचं           ।।३।।


दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१







No comments: