Popular Posts

Saturday, July 7, 2012

संतभार पंढरीत


वारी पंढरीची  लेख ...

दशरथ यादव, पुणे
(संत साहित्याचे अभ्यासक)
मो. ९८८१०९८४८१ 

                    संतभार पंढरीत

                                                  ---------------- ------------                    


पंढरीची वारी आहे माझ्या घरी
आणिक ना करी तीर्थयात्रा

महाराष्टाच्या मातीत उमललेला...प्राचीन इतिहासाचा प्रभावाने प्रेरित होऊन समाजाला जगण्याचे बळ देत नेमकी वाट दाखविणारा भागवत धर्म (वारकरी पंथ) मराठी माणसांच्या मनामनात घर करून राहिला आहे. पंढरीची वारी हे शब्द कानावर पडले तरी समोर चित्र उभे राहते, ते भगव्या पताका खांद्यावर घेऊन, गळ्यात तुळशीची माळ, भाळी चंदनाचा टिळा, हाती टाळ व मुखी विठूनाम घेत पायीवारी करणारे हजारो वारकरी. साधी राहणी, प्रमाणिकपणा, शुद्ध आचार, शुद्ध विचार, एकच देव, जात नाही, पात नाही, उच्चनीच भेद नाही. असा भोळाभाबडा वाटणारा वारकरी हाच भागवत संप्रदायाचा केंद्रबिंदू आहे. मराठी माणसांच्या मनात प्रचंड प्रेम व जिव्हाळा वाटणारा हा वारकरी संप्रदायाची नाळ जुळली जाते ती तथागत गौतम बुध्दांशी. खंडित झालेला बुद्ध विचार वारकरी संप्रदायाच्या रुपाने पुन्हा सुरु झाल्याचे समाधान येथील बहुजनसमाजाचा चेहऱ्यावर जाणवते. पांडुरंगाचा प्राचीन परंपरेचा व उगमाचा शोध घेत काम करणार्या संशोधकांनी विठ्ठल ही पूर्वीची बुद्ध मुतीर्ती असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
सिद्धार्थाचे चेले। वारीचे मावळे।
हाकली कावळे। सनातनी।।
वारकरी माझा। शेतकरी राजा।
मावळा शोभतो। शिवाजींचा।।
वारकरी संप्रदायाचे मुख्य आधारस्तंभ असलेले संत नामदेव महाराज यांनी संतविचार देशभरात नेऊन पोचवला. संत चोखामेळा, संत नरहरी, संत सावतामाळी, संत सेना न्हावी, या संताच्या बरोबर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय स्वीकारून समाजात जागृतीची प्रयत्न केला. मात्र संत नामदेवांच्या नंतर संत तुकाराम महाराजांनी कीतर्तनातून वारकरी संप्रदाय कळसावर नेला. वारीची परंपरा तशी जुनी असली तरी त्याला फारशी प्रसिद्धी व  व्यापकता नव्हती. संत तुकारामांचे चिरंजीव तपोनिधी नारायणबाबा यांनी वारीली सोहळ्याचे स्वरूप दिले. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पादूका रथात ठेवून वारी करण्याची सुरवात नारायणबाबा यांनीच केली. सुरवातीला ते  देहूतून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवत व आळंदीला येऊन संत ज्ञानेश्वरांच्या पादुका त्यात ठेवत व पंढरीला जात. ही परंपरा अनेक दिवस  सुरु होती. ती देहुकर व आळंदीकर याच्यात मतभेद झाल्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे सरकार यांच्या पदरी असलेले सरदार हैबतबाबा अरफळकर(पवार) यांनी वारीला सामुहिक स्वरुप देऊन सुरवात केली.

वारीची वाट

संपत्ती सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ।।
होतील संतांच्या भेटी ।
सांगू सुखाचिया गोष्टी ।।
पंढरीच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून अनेक संतांच्या पालख्या वारकरी भक्तिभावाने काढतात व टाळ-मृदंगाच्या तालावर संतांचे अभंग गात, नाचत, गर्जत ते पंढरीची पायी वाटचाल करतात. या सकल संतांच्या पालख्यांमध्ये श्रीक्षेत्र आळंदीहून निघणारी संत ज्ञानदेवांची आणि श्रीक्षेत्र देहूहून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी या प्रमुख मानल्या जातात. हे पालखी सोहळे म्हणजे श्रद्धा भक्तीचे वार्षिक जनजागरण आहे.
ज्येष्ठ "वद्य सप्तमी' आणि "अष्टमी' या तिथींना वारकरी भावविश्र्वामध्ये एक विशेष महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमीला श्रीक्षेत्र देहूतून संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीच्या वारीसाठी "प्रस्थान' ठेवले जाते, तर ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान होते. या प्रस्थानास वारकरी भाविकांनी सोहळ्याचे रूप दिलेले आहे. हे दोन पालखी सोहळे म्हणजे स्वर्गीय आनंदाचा शद्बातीत अनुभव देणारे अनुपम सोहळे आहेत. कानाला, मनाला आणि चित्ताला एकाच वेळी अतिंद्रिय अनुभवाची प्रचिती देणारे हे नामभक्तीचे सुख सोहळे आहेत. "जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।' हा अभंग चरण संतांचे केवळ काव्य नव्हे तर अनुभवाचे, प्रचितीचे कृतार्थ उद्‌गार आहेत.
ज्येष्ठ महिना लागला की वारकऱ्यांना पंढरीचे - विठुरायाचे वेध लागतात आणि कोणी न बोलविता वारकऱ्यांची पावले आळंदी, देहूच्या दिशेने वळतात. प्रपंचातल्या, उद्योगधंद्यातल्या, शेतीतल्या नेहमीच्या अडचणी दूर ठेवून एका अनामिक ओढीने वारकरी भाविक देहू-आळंदीला जमतात. वारकऱ्यांचा महासागर जमतो. टाळ-मृदंगाच्या नादाने, नामघोषाने इंद्रायणी नदीचा तीर दुमदुमून जातो. वारकऱ्यांच्या मनात ओढ असते ती पंढरीच्या पांडुरंगाची -आषाढी वारीची, पण ते थेट पंढरपूरला न जाता देहू-आळंदीला येतात. का? तर आळंदीहून ज्ञानोबाराय व देहूहून तुकोबाराय हे सुद्धा पंढरीच्या आषाढी वारीला येतात, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे ज्ञानोबा माऊलीच्या, तुकोबांच्या सोबत पंढरीची वारी करायची म्हणून वारकरी थेट पंढरपूरला न जाता प्रथम आळंदी-देहूला जमतात.
श्री हैबतबाबा यांनी स्वतंत्ररित्या आळंदीहून ज्ञानदेवांचा पालखी सोहळा काढण्याचे ठरविले आणि त्यासाठी औंधचे संस्थानिक, (हैबतबाबांचे जुने मित्र) सरदार शितोळे (अंकली, जि.बेळगाव) यांच्याकडून घोडे, पालखी, अब्दागिऱ्या, छत्री असा सर्व सरंजामी लवाजमा मिळवला आणि भजनासाठी ह.भ.प. खंडुजीबाबा, ह.भ.प. विठोबादादा वासकर अशा वारकरी फडकऱ्यांचे, प्रमुखांचे सहकार्य घेतले आणि अशा प्रकारे साधारणत: इ.स.1823 साली आळंदी-पंढरपूर ज्ञानदेव पालखी सोहळ्याला सुरवात झाली.

दाटले आभाळ। टाळांचा पाऊस।।
वीणेची झंकार। सरीतून।।१।।
भगवी पताका। गजर्जतो आषाढ।।
पंढरीची वाट। ओलीचिंब।।२।।
भेटण्या अधीर। झाले माझे मन।।
उरकेना वाट। पांडुरंगा।।३।।
 अशी मनोमन ओढ लागलेले वारकरी पायीवारीने पंढरीला निघतात. कुठे मनात घरच्या कामाचा लवलेशही नसतो. सुगीचे दिवस, पेरणी व मुलांच्या शाळांचा प्रवेश अशी धांदल असताना येणारा हा उत्सव कीती मोठ्या मनोभावे साजरा केला जातो.
पंढरपूरला पायी वारीने जाणारा वारकर्यांचां हा लवाजमा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या बरोबर दरवर्षी लाखो वारकरी टाळमृदंगाच्या निनादात नाचत हरिनामाचे स्मरण करीत मजल दर मजल करीत निघतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. एवढा जनसमुदाय गुण्या गोविंदाने वारीत चालतो, याचे गमक जाते संताच्या मनोवृतीला व त्यांनी घालून दिलेल्या नियोजनला. वारकर्यांचे मोठ्या मनोभावे स्वागत ग्रामस्थ करतात. पंढरीच्या वारकर्यांची सेवा करून आनंद घेण्याची प्रथा जुनीच आहे. एवढा मोठा वारीचा हा गाव चालतो तरी कसा. त्याचे काय गमक आहे, याचे  कुतूहल मराठी माणसांना जसे आहे तसे परदेशी अभ्यासकांनाही वारीने भुरळ पाडली आहे.
वारीच्या गावात

रोज नवी नवलाई
टाळ मृदंग वीणेतून
रोज भेटते विठाई

माझ्या वारीच्या गावात
मळे भक्तीचे फुलतात
माणसांच्या ताटव्यांना
फुले हरिनामाची येतात

दिंड्या दिंड्याची पाले
रोज माळावर उतरतात
रात्र सरता सरता
वाट पहाटेची चालतात

गाव चालता बोलता
वारा ढोल वाजवितो
पावलांच्या तालावर
मग मृदंग नाचतो

विठ्ठलाची पूजा आम्ही
रोज नव्याने बांधतो
ओव्या अंभगाची फुले
ताजी देवाला वाहतो

माझ्या वारीच्या गावात
ओव्या अंभगाचे धन
रोज लुटतात वैष्णव
शब्दा शब्दांचे सोनं

वारीच्या गावात सत्ता
माऊलीची अशी चाले
मुक्या टाळातून देव
रोज आमच्याशी बोले
असाच भाव प्रत्येकाच्या मनी असतो. वारीचे हे भावविश्व मनाला रुंजी घालते. मोठ्या आदराने माऊली...माऊली..म्हणत इतका लडिवाळपणा व आपुलकीचे बोलणे फक्त इथेच अनुभवास येते. विज्ञान युगातही बदलाच्या उंबरठ्यावर टिकून राहणारा हा पंथ काही वेगळाच आहे. याची जाणीव झाल्यशिवाय राहत नाही. देहु व आळंदीतून पायीवारीने निघालेला वैष्णवांचा मेळा दिंडया दिंडयातून नाचत गात प्रवचन, भजन म्हणत पुढे सरकतो. ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा ते बाळगत नाहीत. सावळ्या विठूरायाच्या दशर्शनाच्या ओढीने हा गाव चालत चालत निघतो. पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, वेळापूर मार्गे पंढरीला पोचतो. वारीची वाट म्हणजे काय चमत्कार आहे, अशी भावना अनेकांच्या मनात येते, महिला, मुले, वद्ध, सगळेच खूष असतात.
वारीचे व्यवस्थापन
वारीची रचना पाहिली तर लाखो  लोक चालतात, मुक्काम  करतात, जेवणे होतात, हा सगळा लवाजमा व याचे नियोजन कसे होते, हे आश्चर्य आहे, कुठे ही फारसी सोय नसताना व अडचणीवर मात कशी करायचे ही वारी शिकवते. स्वावलंबनाचा मंत्र येथे मिळतो. समाजात कसे वागावे हेही कळून येते. दिंड्याचे शेकडो ट्रक, जीप, व वाहने सामान वाहून नेतात. मुक्कामाच्या राहुट्या, जेवणाचे साहित्य, स्वयंपाक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर वारी काय आहे याचा उलगडा होईल. व्यवस्थापनशास्त्र वारीने जगला सांगितले हे समजून येईल व शिकायलाही मिळेल. वारीच्या एकेका पैलूवर अभ्यास करून खूप काही शिकण्यासारखे आहे.

संतभार पंढरीत।  कीर्तनाचा गजर होत।
तिथे असे देव ऊभा। समचरणाची शोभा।।
असा भाव वैष्णवांच्या मनात पंढरीत आल्यावर येतो. देहू व आळंदीहून पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूर आल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुन्हा पाय घराकडे वळू लागतात. पण वारीच्या प्रवासात आलेले अनुभव, भेटलेली माणसे, जीवाभावाची जमलेली गठ्ठी सोडून जाताना मनाला हूरहूर वाटत राहते. पण विठ्ठल भेटीचे फळ पदरात पडल्याने जे समाधान मिळते ते काही औरच असते. या सगळ्या अनुभवाची शिदोरी मनात साठवून मिळालेले जगण्याचे बळ पुन्हा पुढ्च्या वारीच्या तयारीत रमते. पंढरी सोडून जातानाची हुरहुर ही मनाला भावते. चंद्रभागा स्नान, टाळांची छनछन, वीणेची झंकार, फ़डफडणार्या भगव्या पताका, नाचणारे पाय, उन्हाचा चटका, पावसाचा शिडकावा, दणाणून गेलेला परिसर, वाटेतील रिंगणे...पालखीरथाचा कळस....अश्वाची दौड, राहुट्याच्या महालातील रंगलेली भजने, चोपाची शिस्त, समाजारतीचा जल्लोष, टाळांची छनछन कानातून जात नाही. या सगळ्या गोष्टीचा पट उलगडत उलगडत मन आठवणींच्या वारीत पुन्हा रमुन जाते.

आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।।


टीप । आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरची प्राचीन महिती सांगणारा लेख
------------------------------------
दशरथ यादव, (संत साहित्याचे अभ्यासक)
पुणे. संपर्क ९८८१०९८४८१
                       आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।।
........................
भागवत धर्माचे धर्मपीठ असलेल्या पंढरपूरच्या महतीविषयी अनेक संतानी वेगळे महत्व विशद केले आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन चंद्रभागानदीत स्नान करायचे व लाडक्या विठूरायाचे दशर्शन झाले की, वारकरी धन्य होतात. ही शेकडो वर्षाची परंपरा अजूनही अखंडपणे सुरू आहे. वारकरी संप्रदायाची काशी असलेले तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर होय. आषाढी कातिकी विसरु नका मज। सांगतसे गुज पांडुरंग।। वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्वाची यात्रा मानली जाते. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपयर्यंतचा चार महिन्याचा काळ चातुर्मास म्हणून संबोधला जातो. याकाळात लाखो वारकरी पंढरपुरात मठ, मंदिरे, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तन व प्रवचनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. भागवत धमार्माचा अभ्यास करतात. आषाढीयात्रेसाठी दरवर्षी संताच्या पालख्यासमवेत सुमारे ८ ते १० लाख भाविक पंढरीत येत असतात. ही परंपरा गेली शेकडो वर्षे सुरू आहे. तथागत गौतम बुद्धांची मानवताधर्माची मोडीत निघालेली चळवळ पुन्हा वारकरी संप्रदायाच्या रुपाने सुरु झाली. देशात व महाराष्ट्रात बुद्ध लेण्यांच्या रुपाने जागोजागी मानवतेचा विचार पेरला आहे. त्याचा प्रभाव हजारो वर्षे जनमानसांवर आहे. मधल्या कालखंडात वैदिक परंपरेने बौद्ध तत्वज्ञान संपल्याचा गाजावाजा सुरु केला होता. पण वेगवेगळ्या चळवळीच्या निमित्ताने बुद्धांचा विचार समाजात नसानसात भिनला होता. ही मानवतेची चळवळ पुढे वारकरी संप्रदायातील संतानी हातात घेऊन चालवली व पुढे नेल्याचे इतिहासाचे संशोधन करणार्यांनी मान्य केले आहे. भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधर्म स्वीकारेपयर्यंत हा विचार व तत्वज्ञान वारकरी पंथ, महानुभाव पंथ, शीख पंथ या चळवळीच्या रुपाने समाजात रुजवला जात होता. विचार कधी मरत नसतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो समाजात प्रतीत होत असतो. पण तोपर्यंत सदृश स्वरुपात तो जाणवत नाही. मात्र माणसांच्या आंतरमनावर त्याचा ठसा उमटलेला असतो. वारकरी संप्रदायाच्या प्राचीनत्नवाचा विचार करता ही नाळ क्षेत्रिय गौतम व बळीवंशाची आहे, हेच स्पष्ट होते.
 पंढरीच्या राया। माझी विनवणी पायी।
काय वर्णू हरिच्या गोष्टी। अनंत ब्रम्हांडे याचे पोटी।
सेना न्हावी याचे घरी। अखंड राबे विठ्ठल हरी।।
राम चिंता ध्यानी मनी। म्हणे नामायाची जनी।।

संत नामदेव महाराजांची समकालीन असलेली संत जनाबाईने पंढरीचे महात्म्य सांगणारे अनेक अंभग लिहिले आहेत. ज्या काळात सनातनी प्रवृतीच्या वैदिक परंपरेने समाज वेठीला धरला होता. त्याकाळात याच वारकरी संप्रदायाने विठ्ठल नामाचा महिमा गात पंढरीचे महत्व वाढवून वारकरी पंथ जगात नेला. संत नामदेव तर म्हणतात आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।। स्वगार्गात वैकुंठ पाहत बसणाऱ्या समाजाला नामदेवांनी वैकुंठ म्हणून पंढरीच आहे, असे सांगून जागृती केली. पंढरीचा महिमा संतानी वर्णन करताना जराही दुलर्लक्ष केले नाही.जेवढी बुद्दी व विद्ववत्ता वापरून वणर्णन करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न केला. यामागचे कारण एकच की, समाजात सनातनी प्रवृतीला व हिंदू धर्मातील गलिच्छ रुढीला विटलेल्यांना हा सन्मार्ग मिळाला.
पंढरीचा वारकरी। त्याचे पाय माझ्या शिरी।.।
हो का उत्तम चांडाळ। पायी ठेवीन कपाळ।.
वंद्य होय हरिहरा। सिद्ध मुनि ऋषेश्वरा।.
मुखी नाम गर्जे वाणी।  म्हणे नामायाची जनी।।
किंवा
संतभार पंढरीत। कीतर्तनाचा गजर होत
तेथे असे देव उभा। जैशी समचरणाची शोभा।।
रंग भरे किर्तनात। प्रेमे हरिदास नाचत।
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामायाचे जो जिव्हार।।
ऐशा संता शरण जावे। जनी म्हणे त्याला ध्यावे।।
पंढरपूरच्या प्राचीन परंपरेविषयी संताच्या अंभगातून अनेक गोष्टी उलगडतात. दिंड्या पताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वणार्णावा किती।। या संत नामदेवांच्या अंभगानुसार माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी।। या भावनेने लाखो वारकरी, खांद्यावर वारकरी संप्रदायाची पताका घेऊन मुखाने हरिनाम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पायीवारीने येतात. काही जण भारतभरातून या वैभवी सोहळ्यासाठी येतात.
प्राचीन पंडरगे (पंढरपूर)
-----------------------
पंढरपूरचे महत्व कीती आहे, हे संतानी जाणीवपूवर्वक समाजाला सांगून पंढरीची ही पायवाटच आपल्या जन्माचे साथर्क करील हे सांगितले. त्यामागे वारकरी चळवळ वाढून समाजात समता प्रस्थापित व्हावी हाच उदात्त हेतू संताचा होता. जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।। हे अंभगाचे चरणच पंढरीचा प्राचीन इतिहास उलगडण्यास पुरेसे आहे.
प्रसिद्द संशोधक रा.चि.ढेरे यांनी संशोधन करून पंढरपूरच्या तीथर्थक्षेत्राचा इतिहास उलगडला आहे. पांडुरंगाचे विठ्ठल हे पयायार्यी नाम असले तरी पांडुरंग विठ्ठल हे. ‘’काशी विश्वनाथ’’ यासारखे नाव होते. स्कांद, पांडूरंगमाहात्म्यातही असाच उल्लेख आहे. काशीविश्वनाथ म्हणजे काशीक्षेत्राचा विश्वनाथ असा होतो. हैदराबादमधील  तिरू मैल पर्वतावर वेंकटेशचे मंदिर उभारले आहे. मात्र तेथील भक्ततांनी तिरूमैल व्यंकटेश असे नामकरण केले आहे. 
पंढरपूर या क्षेत्राचे मूळ कन्नड नाव पंढरगे. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातील तुळईवर असलेल्या होयसळ नृपती सोमेश्वराच्या लेखात (११५९) या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या ‘पंडरगे’ पासून पांडुरंग हे देवनाम आले. पंढरपूर हे क्षेत्रनाम व पुंडरीक हे कृत्रिम संस्कृतीकरण करून साधले. विठ्ठल नामाची स्पष्टीकरण सांगण्याच्या हेतूने तो विटेवर उभा असल्याचे सांगितले आहे. लोकप्रिय प्रचलित सामग्रीतूनच माहात्म्यकथा रचली जाते. असा दैवतशास्त्रज्ञांना कायम प्रत्यय आला आहे. विठ्ठलाची विकसन प्रक्रिया याच पद्धतीन घडत राहिली.
विठ्ठलाचे आदिरुप मात्र अद्यापही आपल्या दृष्टीक्षेपात येऊ शकले नाही. त्या नामाचा शोध घेण्यासाठी विठ्ठल नामाची निशःक व्युत्पती सापडायला हवी. विठ्ठल-विरप्पा या नावाने नांदणारी धनगरांची विठ्ठलोपसना शोधल्यास काही गोष्टींचा उलगडा होईल. विठ्ठल ह गवळी-धनगरांचा देव आहे.पदूबाई नावाच्या गवळणबाईचा पती आहे. ही वस्तूस्थिती ध्यानी घ्यावी लागेल. नग्ना व मुक्तकेशी होऊन विठ्ठलावर भाळलेली पद्मा पांडुरंगमाहत्म्यात आहे.
विठ्ठल व  वेंकटेश हे दोघेही विष्णूरुप आहेत. बालाजी (बालकृष्ण) मानले. या सर्व साम्यांचा शोधासाठी वापर करायाला हवा. कृष्णरुप मानला गेलेला कटीवर कर ठेवून उभा असलेला पश्चिम बिहारमधील अहिरांचा देव वीर कुवर (वीर कुमार) याचा विठ्ठलाशी साम्यबंध लक्षणीय ठरेल.    
श्रीक्षेत्र पंढरपूर
चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले पंढरपूर हे सर्वात श्रेष्ठ असे तीर्थस्थान आहे. 'जेव्हा नव्हते चराचर।| तेव्हा होते पंढऱपूर|।।' असे संत नामदेव सांगून गेले आहेत. पंढऱपूर हे क्षेत्र पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपुर, फागनीपुर, पौंडरिक क्षेत्र, पंडरंगे आणि पांडुरंगपल्ली अशा विविध नावांनी त्या त्या कालखंडात परिचित होते. काहींच्या मते पंढरपूर हे भागवत व महाभारतकालाच्याही आधीपासून अस्तित्वात होते. कारण भागा नदी ( चंद्रभागा) चा उल्लेख श्रीमद्भागवत व महाभारत या ग्रंथातही आढळतो. पंढरपूर पूर्वी दिंडिरवन या नावानेही ओळखले जात असे. येथील जंगलात दिंडीख या राक्षसाचे वास्तव्य होते. त्याचा वध मल्लिकार्जुनाने केला. पुढे शालिवाहन राजवटीमध्ये या जंगलाची साफसफाई करण्यात आली आणि तीन योजन अंतरामध्ये एक विस्तीर्ण वस्ती बसविण्यात आली. राजाने लाखभर रुपये खर्च करुन मल्लिकार्जुनाचे देऊळ तसेच पांडुरंगाचे देऊळ बांधले आणि पंढरीनाथाची वास्तू उभी करुन या नगरीला 'पांडुरंग नगरी' असे नाव दिले. (संदर्भ : मालूतार ग्रंथ)
इ.स. ५१६ मधील एक शिलालेखामध्ये पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगपल्ली असा आढळतो. केरळमधील कालंटी येथे इ.स. ७३२ ते ७८८ चा कालावधीत होऊन गेलेल्या श्रीआद्य शंकराचार्य यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या श्रीपांडुरंगाष्टकम् या अष्टश्लोकी काव्यात भीमानदीच्या तीरावर उभ्या असलेल्या पांडुरंगाची मी उपासना करतो असे म्हटले आहे.
सोळखांबी शिलालेखात इ.स. १२२६ मध्ये भीमरथी नदीचे काठी पंडरंगे नावाचे महाग्राम वसले आहे, असा उल्लेख आहे. तसेच १२७० साली झालेल्या एका शिलालेखात पंढऱपूरचा उल्लेख पांडुरंगपूर असा आहे. १२६० ते १३०९ या यादवकाळातील हेमाद्री (हेमाडपंत) या मंत्र्याने आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात पंढऱपूर व पांडुरंगाचे वर्णन केले आहे. तर १३०३ सालच्या चौंडरस या कवीच्या अभिनव दसकुमारचरित या ग्रंथातच पंढरी व विठ्ठलराय असा उल्लेख आहे.
१४९० ते १५०८ या काळात निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्याने लिहिलेल्या नृसिंहप्रसाद ग्रंथातील तीर्थसार भागातील कथेनुसार सांगायचे तर यात पुंडरीकक्षेत्री भीमेच्या दक्षिण तीरावर पांडुरंग राहत असल्याचा उल्लेख आहे. येथे पुंडरीक नावाचा माणूस पुष्करिणीच्या तीरावर आश्रम बांधून राहात होता. पुंडरीकाने हे क्षेत्र माझ्या नावाने 'पुडरीक क्षेत्र' म्हणून प्रसिद्ध व्हावे असा वर कृष्णाला मागितला. त्याच विनंती मान्य करुन भगवंताने त्याला मी येथे गुप्त रुपाने वास करीन असे आश्वासन दिले. पुरातन काळापासून या क्षेत्राला वेगळे महत्व आहे.
श्री द्वारिकाधीश मंदिर – श्रीमंत शिंदे सरकार वाडा येथे महाद्वार घाटावरच भव्य दगडी तटबंदी असलेले श्री द्वारकाधीशाचे मंदिर आहे. हे मंदिर बाहेरुन किल्ल्यासारखे दिसते.  मंदिराला चार भव्य दरवाजे असून, देवळात चारही बाजूला प्रशस्त ओवर्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जय-विजयाच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिरातील मुरलीधराची शाळीग्रामची मूर्ती देखणी आहे. मुतीर्ती चतुर्भुज असून, मस्तकी चांदीचा मुकूट आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस तीन दिवस मोठा उत्सव असतो. या मंदिराचे बांधकाम 1249 साली करण्यात आले. ग्वाल्हेरचे महाराज दौलतराव शिंदे यांच्या पत्नी महाराणी बायजाबाई महाराज राणीसाहेब यांनी हे मंदिर बांधले, याच मंदिरात श्रीराधिका, श्रीरुक्मिणी, श्रीगणपती व गरुड तसेच बाइजाबाईसाहेब महाराज यांच्या मूर्ती आहेत
ताकपिठे विठोबा मंदिर : श्रीविठ्ठल मंदिराच्या मागील पश्चिमद्वार रस्त्याला, चौफाळयाकडून मंदिराकडे जाताना उजव्या हाताला, मंदिरापासून फक्त 250 ते 300 फूट अंतरावर ताकपीठे विठोबा प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. पुढे सभामंडप आहे. मुख्य व्यासपीठावर श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. हे मंदिर सन 1618 साली रमाबाई नावाच्या एका ब्राम्हण महिलेने बांधले असा ऐतिहासिक पुरावा आहे. ती श्रीविठ्ठलभक्त होती. रोज 'श्री'ना ताक व पीठ एकत्र करुन नैवेद्य दाखवीत असे. स्वत: श्री विठ्ठलनाथ तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन ताकपीठ खाण्यासाठी येत असत, अशी एक कथा आहे. या मंदिरातील मूर्तीत व मुख्य मंदिरातील मूर्तीत साम्य आहे.
गोपालकृष्ण मंदिर : एस् टी स्टँडकडून मंदिराकडे जाताना चौफाळा भाग लागतो. याच चौफाळयात दगडी बांधकामाचे इंद्रापूरच्या नारायण नाखरे नावाच्या व्यक्तीने 1770 साली बांधलेले गोपालकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर श्रीविट्ठल मंदिराच्या पश्चिमेस आहे. यात्राकाळात नगर प्रदक्षिणेला जाणाऱ्या सर्व दिंडया, पालख्या इथे थांबवितात, अभंग म्हणतात. या ठिकाणाहून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. या मंदिरावर शिखर आहे. मंदिरातील श्रीगोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, मनमोहक आहे.
काळा मारुती मंदिर : प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस काळामारुतीचे भक्कम दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. गर्भागार व 4 खांबांवर आधारलेला सभामंडप असे या मंदिराचे दोन भाग आहेत. सन. 1799 साली रामचंद्र नावाच्या एका ब्राह्मणाने हे मंदिर बांधले व 1960 साली मुंबईच्या एका गुजराती वैष्णवाने सभामंडप बांधला असा संदर्भ सापडतो. हनुमानजयंतीला येथे मोठा उत्सव होतो. या मंदिराचे संदर्भात असे सांगतात की संत भानुदासाने अनागोंदीहून भक्तिबळावर आणलेली विठ्ठलमूर्ती वारकऱ्यांनी वाजतगाजत मंदिरात नेली व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून काळया मारुतीची स्थापना केली गेली. इथे थांबून विजयाचा अभंग गातात.
नामदेव मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर विणेगल्लीजवळ कासार घाटाशेजारी नामदेव मंदिर आहे. केशवराज संस्थेने या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. या मंदिराची जागा पूर्वी नामदेव टेकडी म्हणून प्रसिध्द होती. याच जागेत विठुरायाचे लाडके भक्त संत नामदेवांचे वास्तव्य होते. याच जागेवर भव्य व अतिशय सुंदर असे मंदिर बांधले असून मंदिरात संतश्रेष्ठ श्रीनामदेव व श्रीकेशीराज (श्रीविठ्ठल) यांच्या अत्यंत मनमोहक मूर्ती आहेत. संत जनाबाईचीही छोटी मूर्ती या मंदिरात आहे. या मंदिरात संत नामदेवाच्या 16 व्या पिढीतील वंशज राहतात. मंदिरात नामदेवरायांची हस्तलिखित गाथा आहे.
श्रीधर स्वामी समाधी मंदिर : कुंभार घाटावर हे समाधिमंदिर आहे. 250 वर्षांपूर्वी होऊन गेलेले श्रीधर स्वामी नाझरेकर महान भक्त व श्रेष्ठ कवी होते. त्यांनी शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, अंबिका उदय इ. प्रासादिक ग्रंथांची रचना केली.
श्रीज्ञानेश्वर मंदिर व श्रीनाथ मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर नाथ चौकात ही दोन संतांची मंदिरे आहेत. आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने या मंदिराच जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिरावर मंदिरावर सुंदर शिखर बांधले आहे. या मंदिरात श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पितळी मुखवटा आहे. आषाढी यात्रेत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी इथेच असते. इथून जवळ श्रीनाथ मंदिर आहे. एकनाथ षष्ठीला इथे उत्सव होतो. याशिवाय पंढरपुरात अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी रामबागेत श्रीरामाचे मारवाडी समाजाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर अंबाबाई पटांगणाजवल, श्रीव्यास-नारायणाचे मंदिरासमोर आहे. येथे प्रतिवर्षी रामजन्मोत्सव मोठया थाटामाटाने संपन्न केला जातो.सावरकर पथावर दाक्षिणात्य पध्दतीचे आकर्षक प्रवेशद्वार असणारे लक्ष्मणबाग नावाचे श्रीलक्ष्मी-व्यंकटेशाचे मंदिर आहे. 

Friday, May 25, 2012

DasharathJi_Yadav.flv