Popular Posts

Saturday, July 7, 2012

संतभार पंढरीत


वारी पंढरीची  लेख ...

दशरथ यादव, पुणे
(संत साहित्याचे अभ्यासक)
मो. ९८८१०९८४८१ 

                    संतभार पंढरीत

                                                  ---------------- ------------                    


पंढरीची वारी आहे माझ्या घरी
आणिक ना करी तीर्थयात्रा

महाराष्टाच्या मातीत उमललेला...प्राचीन इतिहासाचा प्रभावाने प्रेरित होऊन समाजाला जगण्याचे बळ देत नेमकी वाट दाखविणारा भागवत धर्म (वारकरी पंथ) मराठी माणसांच्या मनामनात घर करून राहिला आहे. पंढरीची वारी हे शब्द कानावर पडले तरी समोर चित्र उभे राहते, ते भगव्या पताका खांद्यावर घेऊन, गळ्यात तुळशीची माळ, भाळी चंदनाचा टिळा, हाती टाळ व मुखी विठूनाम घेत पायीवारी करणारे हजारो वारकरी. साधी राहणी, प्रमाणिकपणा, शुद्ध आचार, शुद्ध विचार, एकच देव, जात नाही, पात नाही, उच्चनीच भेद नाही. असा भोळाभाबडा वाटणारा वारकरी हाच भागवत संप्रदायाचा केंद्रबिंदू आहे. मराठी माणसांच्या मनात प्रचंड प्रेम व जिव्हाळा वाटणारा हा वारकरी संप्रदायाची नाळ जुळली जाते ती तथागत गौतम बुध्दांशी. खंडित झालेला बुद्ध विचार वारकरी संप्रदायाच्या रुपाने पुन्हा सुरु झाल्याचे समाधान येथील बहुजनसमाजाचा चेहऱ्यावर जाणवते. पांडुरंगाचा प्राचीन परंपरेचा व उगमाचा शोध घेत काम करणार्या संशोधकांनी विठ्ठल ही पूर्वीची बुद्ध मुतीर्ती असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
सिद्धार्थाचे चेले। वारीचे मावळे।
हाकली कावळे। सनातनी।।
वारकरी माझा। शेतकरी राजा।
मावळा शोभतो। शिवाजींचा।।
वारकरी संप्रदायाचे मुख्य आधारस्तंभ असलेले संत नामदेव महाराज यांनी संतविचार देशभरात नेऊन पोचवला. संत चोखामेळा, संत नरहरी, संत सावतामाळी, संत सेना न्हावी, या संताच्या बरोबर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय स्वीकारून समाजात जागृतीची प्रयत्न केला. मात्र संत नामदेवांच्या नंतर संत तुकाराम महाराजांनी कीतर्तनातून वारकरी संप्रदाय कळसावर नेला. वारीची परंपरा तशी जुनी असली तरी त्याला फारशी प्रसिद्धी व  व्यापकता नव्हती. संत तुकारामांचे चिरंजीव तपोनिधी नारायणबाबा यांनी वारीली सोहळ्याचे स्वरूप दिले. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पादूका रथात ठेवून वारी करण्याची सुरवात नारायणबाबा यांनीच केली. सुरवातीला ते  देहूतून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवत व आळंदीला येऊन संत ज्ञानेश्वरांच्या पादुका त्यात ठेवत व पंढरीला जात. ही परंपरा अनेक दिवस  सुरु होती. ती देहुकर व आळंदीकर याच्यात मतभेद झाल्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे सरकार यांच्या पदरी असलेले सरदार हैबतबाबा अरफळकर(पवार) यांनी वारीला सामुहिक स्वरुप देऊन सुरवात केली.

वारीची वाट

संपत्ती सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ।।
होतील संतांच्या भेटी ।
सांगू सुखाचिया गोष्टी ।।
पंढरीच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून अनेक संतांच्या पालख्या वारकरी भक्तिभावाने काढतात व टाळ-मृदंगाच्या तालावर संतांचे अभंग गात, नाचत, गर्जत ते पंढरीची पायी वाटचाल करतात. या सकल संतांच्या पालख्यांमध्ये श्रीक्षेत्र आळंदीहून निघणारी संत ज्ञानदेवांची आणि श्रीक्षेत्र देहूहून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी या प्रमुख मानल्या जातात. हे पालखी सोहळे म्हणजे श्रद्धा भक्तीचे वार्षिक जनजागरण आहे.
ज्येष्ठ "वद्य सप्तमी' आणि "अष्टमी' या तिथींना वारकरी भावविश्र्वामध्ये एक विशेष महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमीला श्रीक्षेत्र देहूतून संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीच्या वारीसाठी "प्रस्थान' ठेवले जाते, तर ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान होते. या प्रस्थानास वारकरी भाविकांनी सोहळ्याचे रूप दिलेले आहे. हे दोन पालखी सोहळे म्हणजे स्वर्गीय आनंदाचा शद्बातीत अनुभव देणारे अनुपम सोहळे आहेत. कानाला, मनाला आणि चित्ताला एकाच वेळी अतिंद्रिय अनुभवाची प्रचिती देणारे हे नामभक्तीचे सुख सोहळे आहेत. "जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।' हा अभंग चरण संतांचे केवळ काव्य नव्हे तर अनुभवाचे, प्रचितीचे कृतार्थ उद्‌गार आहेत.
ज्येष्ठ महिना लागला की वारकऱ्यांना पंढरीचे - विठुरायाचे वेध लागतात आणि कोणी न बोलविता वारकऱ्यांची पावले आळंदी, देहूच्या दिशेने वळतात. प्रपंचातल्या, उद्योगधंद्यातल्या, शेतीतल्या नेहमीच्या अडचणी दूर ठेवून एका अनामिक ओढीने वारकरी भाविक देहू-आळंदीला जमतात. वारकऱ्यांचा महासागर जमतो. टाळ-मृदंगाच्या नादाने, नामघोषाने इंद्रायणी नदीचा तीर दुमदुमून जातो. वारकऱ्यांच्या मनात ओढ असते ती पंढरीच्या पांडुरंगाची -आषाढी वारीची, पण ते थेट पंढरपूरला न जाता देहू-आळंदीला येतात. का? तर आळंदीहून ज्ञानोबाराय व देहूहून तुकोबाराय हे सुद्धा पंढरीच्या आषाढी वारीला येतात, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे ज्ञानोबा माऊलीच्या, तुकोबांच्या सोबत पंढरीची वारी करायची म्हणून वारकरी थेट पंढरपूरला न जाता प्रथम आळंदी-देहूला जमतात.
श्री हैबतबाबा यांनी स्वतंत्ररित्या आळंदीहून ज्ञानदेवांचा पालखी सोहळा काढण्याचे ठरविले आणि त्यासाठी औंधचे संस्थानिक, (हैबतबाबांचे जुने मित्र) सरदार शितोळे (अंकली, जि.बेळगाव) यांच्याकडून घोडे, पालखी, अब्दागिऱ्या, छत्री असा सर्व सरंजामी लवाजमा मिळवला आणि भजनासाठी ह.भ.प. खंडुजीबाबा, ह.भ.प. विठोबादादा वासकर अशा वारकरी फडकऱ्यांचे, प्रमुखांचे सहकार्य घेतले आणि अशा प्रकारे साधारणत: इ.स.1823 साली आळंदी-पंढरपूर ज्ञानदेव पालखी सोहळ्याला सुरवात झाली.

दाटले आभाळ। टाळांचा पाऊस।।
वीणेची झंकार। सरीतून।।१।।
भगवी पताका। गजर्जतो आषाढ।।
पंढरीची वाट। ओलीचिंब।।२।।
भेटण्या अधीर। झाले माझे मन।।
उरकेना वाट। पांडुरंगा।।३।।
 अशी मनोमन ओढ लागलेले वारकरी पायीवारीने पंढरीला निघतात. कुठे मनात घरच्या कामाचा लवलेशही नसतो. सुगीचे दिवस, पेरणी व मुलांच्या शाळांचा प्रवेश अशी धांदल असताना येणारा हा उत्सव कीती मोठ्या मनोभावे साजरा केला जातो.
पंढरपूरला पायी वारीने जाणारा वारकर्यांचां हा लवाजमा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या बरोबर दरवर्षी लाखो वारकरी टाळमृदंगाच्या निनादात नाचत हरिनामाचे स्मरण करीत मजल दर मजल करीत निघतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. एवढा जनसमुदाय गुण्या गोविंदाने वारीत चालतो, याचे गमक जाते संताच्या मनोवृतीला व त्यांनी घालून दिलेल्या नियोजनला. वारकर्यांचे मोठ्या मनोभावे स्वागत ग्रामस्थ करतात. पंढरीच्या वारकर्यांची सेवा करून आनंद घेण्याची प्रथा जुनीच आहे. एवढा मोठा वारीचा हा गाव चालतो तरी कसा. त्याचे काय गमक आहे, याचे  कुतूहल मराठी माणसांना जसे आहे तसे परदेशी अभ्यासकांनाही वारीने भुरळ पाडली आहे.
वारीच्या गावात

रोज नवी नवलाई
टाळ मृदंग वीणेतून
रोज भेटते विठाई

माझ्या वारीच्या गावात
मळे भक्तीचे फुलतात
माणसांच्या ताटव्यांना
फुले हरिनामाची येतात

दिंड्या दिंड्याची पाले
रोज माळावर उतरतात
रात्र सरता सरता
वाट पहाटेची चालतात

गाव चालता बोलता
वारा ढोल वाजवितो
पावलांच्या तालावर
मग मृदंग नाचतो

विठ्ठलाची पूजा आम्ही
रोज नव्याने बांधतो
ओव्या अंभगाची फुले
ताजी देवाला वाहतो

माझ्या वारीच्या गावात
ओव्या अंभगाचे धन
रोज लुटतात वैष्णव
शब्दा शब्दांचे सोनं

वारीच्या गावात सत्ता
माऊलीची अशी चाले
मुक्या टाळातून देव
रोज आमच्याशी बोले
असाच भाव प्रत्येकाच्या मनी असतो. वारीचे हे भावविश्व मनाला रुंजी घालते. मोठ्या आदराने माऊली...माऊली..म्हणत इतका लडिवाळपणा व आपुलकीचे बोलणे फक्त इथेच अनुभवास येते. विज्ञान युगातही बदलाच्या उंबरठ्यावर टिकून राहणारा हा पंथ काही वेगळाच आहे. याची जाणीव झाल्यशिवाय राहत नाही. देहु व आळंदीतून पायीवारीने निघालेला वैष्णवांचा मेळा दिंडया दिंडयातून नाचत गात प्रवचन, भजन म्हणत पुढे सरकतो. ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा ते बाळगत नाहीत. सावळ्या विठूरायाच्या दशर्शनाच्या ओढीने हा गाव चालत चालत निघतो. पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, वेळापूर मार्गे पंढरीला पोचतो. वारीची वाट म्हणजे काय चमत्कार आहे, अशी भावना अनेकांच्या मनात येते, महिला, मुले, वद्ध, सगळेच खूष असतात.
वारीचे व्यवस्थापन
वारीची रचना पाहिली तर लाखो  लोक चालतात, मुक्काम  करतात, जेवणे होतात, हा सगळा लवाजमा व याचे नियोजन कसे होते, हे आश्चर्य आहे, कुठे ही फारसी सोय नसताना व अडचणीवर मात कशी करायचे ही वारी शिकवते. स्वावलंबनाचा मंत्र येथे मिळतो. समाजात कसे वागावे हेही कळून येते. दिंड्याचे शेकडो ट्रक, जीप, व वाहने सामान वाहून नेतात. मुक्कामाच्या राहुट्या, जेवणाचे साहित्य, स्वयंपाक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर वारी काय आहे याचा उलगडा होईल. व्यवस्थापनशास्त्र वारीने जगला सांगितले हे समजून येईल व शिकायलाही मिळेल. वारीच्या एकेका पैलूवर अभ्यास करून खूप काही शिकण्यासारखे आहे.

संतभार पंढरीत।  कीर्तनाचा गजर होत।
तिथे असे देव ऊभा। समचरणाची शोभा।।
असा भाव वैष्णवांच्या मनात पंढरीत आल्यावर येतो. देहू व आळंदीहून पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूर आल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुन्हा पाय घराकडे वळू लागतात. पण वारीच्या प्रवासात आलेले अनुभव, भेटलेली माणसे, जीवाभावाची जमलेली गठ्ठी सोडून जाताना मनाला हूरहूर वाटत राहते. पण विठ्ठल भेटीचे फळ पदरात पडल्याने जे समाधान मिळते ते काही औरच असते. या सगळ्या अनुभवाची शिदोरी मनात साठवून मिळालेले जगण्याचे बळ पुन्हा पुढ्च्या वारीच्या तयारीत रमते. पंढरी सोडून जातानाची हुरहुर ही मनाला भावते. चंद्रभागा स्नान, टाळांची छनछन, वीणेची झंकार, फ़डफडणार्या भगव्या पताका, नाचणारे पाय, उन्हाचा चटका, पावसाचा शिडकावा, दणाणून गेलेला परिसर, वाटेतील रिंगणे...पालखीरथाचा कळस....अश्वाची दौड, राहुट्याच्या महालातील रंगलेली भजने, चोपाची शिस्त, समाजारतीचा जल्लोष, टाळांची छनछन कानातून जात नाही. या सगळ्या गोष्टीचा पट उलगडत उलगडत मन आठवणींच्या वारीत पुन्हा रमुन जाते.

No comments: