Popular Posts

Saturday, July 7, 2012

रिंगण, धावा, भारुडाने वारक-यांमध्य़े चैतन्य


--------------------------------
रिंगण,  धावा, भारुडाने
वारक-यांमध्य़े चैतन्य
वेळापूर उत्साही स्वागत

दशरथ यादव----------- पंढरीची वारी
वेळापूर, ता. २६ – वारीच्या वाटेवरील निम्याहून जास्त अंतर पार करून पंढरीसमीप आलेल्या वारक-यामध्ये रंगलेले रिंगण, धावा..व भारुडाने चैतन्य आले. टाळमृदंगाच्या निनादात नाचत गात माऊलींच्या सोहळ्यातील वैष्णव रिमझीम पावसाच्या हलक्याशा सरी अंगावर झेलत अर्धनारीनटेश्वराच्या भूमीत वेळापूरला सायंकाळी मुक्कामी पोचले. ग्रामस्थांनी उत्साही स्वागत केले. उद्या (ता.२७) रोजी पालखी भंडीशेगावला जाईल.
भल्या पहाटे माऊलींचा सोहळा माळशिरसकरांचा निरोप घेऊन वाट चालू लागला. सकाळी आठ वाजता खुडूस गावाच्या हद्दीत काळ्या मातीच्या शिवारात अश्वाने बेफाम दौड करीत रिंगण केल्याने वारकर्यांची अवस्था भाग गेला शीण गेला अवघाचि झाला श्रीआनंद अशीच झाली होती. सकाळच्या शीतल वातावरणात भगव्यापताकांची दाटी शिवारात शोभून दिसत होती. हिरव्यागार शिवारात रंगलेले रिंगण व उडीच्या खेळाचा वारक-यांनी मनसोक्त आनंद घेतला. रिंगणानंतर उडीचे निमंत्रण राजाभाऊ चोपदार यांनी सर्व दिंडीकर-यांना दिले. त्यानंतर टाळांचा गगनभेदी आवाजाने उडीचा खेळ रंगला. वारीच्या वाटचालीत सगळ्या दिंडीतील टाळकरी फक्त रिंगणाच्यावेळी एकत्र येतात.  ।लक्ष लक्ष डोळियांनी आज म्या पाहिले रिंगण। लाखो नजरांनी रिंगणाचा नयनमनोहर सोहळा मनात साठवला. त्यानंतर दुपारी बारा वाजता पालखी निमगाव पाटीच्या माळावर भोजनासाठी थांबली. परिसरातील भाविकांनी दशर्शनासाठी रांग लावली होती.
सावताने केला।    भक्तीचा हा मळा।
लावला हो लळा।   शिवाराचा।।

पंढरीच्या वाटे।    कोणी ना परखे
भेटतील सखे।    पांडुरंग।।

मातीचा बुक्का।  कपाळी लावता।
भगवाच हाता।  झेंडूमळा।।

अशीच अवस्था हिरव्यागार शेताशिवाराच्या सोबतीने वाटचाल करताना झाली होती. निमगाव पाटीजवळ मोहितेपाटील कुंटुबियांच्या वतीने माऊलीची पुजा झाली. त्यानंतर सोहळा पुन्हा वाट चालू लागला. हितेपाटील कुटुंबियाच्या वतीने माऊलींची पूजा झाली. त्यानंतर सोहळा पुन्हा भगव्या पताका फडफडत चालू लागला. माऊलींचा पालखी रथ धीम्यागतीने पुढे सरकत होता. दिंड्या दिंड्यात हरिपाठाचे अंभग रंगले होते.
सांयकाळी चार वाजता माऊलींचा अश्व वेळापूरच्या धावाबावी माथ्यावर आला. याठिकाणी सगळे वारकरी धावत धावत खाली येतात. संत तुकारामांना या माथ्यावरून श्रीविठ्ठलाचे दर्शन झाल्याने ते धावत धावत गेले अशी वारक्रयांची श्रद्धा आहे.
तुका म्हणे धावा। आहे पुढे पंढरी विसावा।
हा अंभग गात गात वारकरी धावत होते. हा नयनमनोहर क्षण टिपण्यासाठी मोठी गदीर्दी जमली होती. पायथ्याला दिंड्यात भारुडाचे कायर्यक्रम रंगले होते. पालखी समोर भारूड करण्याचा मान शेडगे दिंडीला असून त्यांच्या वतीन लक्ष्मण राजगुरु यांनी वेडीचे भारुड करुन धमाल उडवून दिली. यावेळी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, दिंडीचे मालक जयसिंग मोरे, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, मानकरी उपस्थित होते. दरम्यान एका बाजूला मला दादला नको गं बाई हे भारुड दिंडीत रंगले होते. मी लाडकी लेक मी  संताची गं लाडकी लेक मी संताची अशी अनेक भारुडे दिंडया दिंड्यात रंगली होती. भारुडाने वारक-यांत चैतन्य पसरले होते. सायंकाळी उशीरा पालखी तळावर समाजारती झाली. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने पंढरीच्या वारक-यांचे स्वागत केले. उद्या टप्पा येथे संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव यांची बंधू भेट होणार असून, तोंडले बोंडले येथे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा माऊलींच्या सोहळ्याबरोबर एकत्र येईल.

No comments: