संतविचारांचा दिवा उजळूया
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला पंढरपूरचा लोकदेव विठ्ठल आणि जेजुरीचा खंडोबा हे भाविकांचं श्रद्धास्थान . महाराष्ट्रातले लोक विठुरायाची वारी करतात तशी खंडेरायाचीही न चुकता मल्हारवारी करतात. वारी म्हणजे येरझारा घालणं. आपल्या आवडत्या देवाच्या गावी न चुकता जाणं. महाराष्ट्रात हजारो वर्षांपासून वेगवेगळया विचारांचे प्रवाह आहेत. त्यातच एक आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरणारा.
तर दुसरा त्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी संघर्ष करणारा. यातूनच सांस्कृतिक लढा उभारला गेला. या माध्यमातूनच प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगानं मान्य केली. गौतम बुद्धाचा शांतीचा संदेश सगळ्या जगाला प्रेरणा देत आहे. हाच शांतीचा संदेश देणारा विचार प्रवाह शेकडो वर्षे बाजूला गेला होता. पण याच विचारांचा आधार घेत संतांनी भागवत धर्माची स्थापना केली. प्रबोधनाचा विचार रुजवायला सुरुवात केली. हे विचार किती तळागाळापर्यंत रुजले आणि फोफावलेत, हे पंढरपूर वारीचा ओघ पाहिल्यावर लक्षात येतं.
हिंदू धर्मातल्या चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा, जातीयता, देवाधर्माच्या नावाखाली होणारे अमानुष प्रकार, मानसिक गुलामी याविरोधात बंड करून संतांनी नव्या पंथाची (धर्माची) स्थापना केली. यात संत बसवेश्वराचा पंथ, संत चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ आणि भागवत अर्थात वारकरी पंथ यांचा प्रामुख्यानं समावेश होतो. त्या काळात देवाधर्माच्या नावाखाली समाजात कमालीची अंधश्रद्धा जोपासली जात होती. जातीपातीच्या उतरंडीत सापडलेला सगळा समाज गुलामीचं जीणं जगत होता. या सगळ्या समाजाला जाण आणि भान देण्याचं काम या समाजसुधारक संतांनी केलं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत कबीर, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज या संतांचा पहिल्यांदा उल्लेख करावा लागेल. ज्या काळात महिलांवर प्रचंड बंधनं होती, त्या काळात संत जनाबाई, संत कान्होपात्रा यांसारख्या वारकरी संत झाल्या. या सर्वांनी अत्यंत प्रभावीपणानं प्रबोधनाचं काम केलं. संत नामदेवांनी तर भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी धर्म देशभर पोचवला. उत्तर भारतात त्यांनी वारकर्यांचं तत्वज्ञान रुजवलं. नामदेव तिथं एवढे लोकप्रिय झाले की त्यांची ठिकठिकाणी मंदिरं उभारली गेली. शीखांच्या गुरु ग्रंथसाहिबमध्ये तर नामदेवांचे 61 अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत.
नामदेवांचाच हा वारसा संत तुकारामांनी पुढं चालवला. समाजातल्या ढोंगांवर त्यांनी अभंगांतून प्रहार केले. सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला. वारकरी धर्म हीच महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची ओळख बनली. पंढरपूर हे वारकरी चळवळीचं केंद्र बनलं.
आळंदी, देहू, पैठण या ठिकाणीही हेच काम जोरात सुरू झालं. विठ्ठल हा एकच देव. बांधावरच्या शेंदर्या-हेंदर्या दैवतांची सुट्टी करण्यात आली.
लहान -मोठा, गरीब-श्रीमंत असे भेद नष्ट करण्यात आले. तेहतीस कोटी देव बाजूला सारून वारकरी चळवळीनं विठ्ठल हे उपास्य दैवत समाजासमोर मांडलं. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभ्या राहिलेल्या सावळ्या विठ्ठलामुळं लोकांची देव धर्म, कर्मकांड याबाबतची भिती कमी झाली. लोक पंढरीच्या वारीच्या निमित्तानं चांगला विचार, आचरण करू लागले. लोकशाही मूल्यांची बीजं रुजली गेली. कर्मकांड, होमहवन, भविष्य, ज्योतिष, अंधश्रद्धा मातीत गाडून नवा समाज उभा राहिला. पण आपण ही परंपरा विसरलो की काय, अशी परिस्थिती वारीच्या वाटेवर आणि एकूणच वारकरी पंथात सध्या पाहायला मिळते आहे. कीर्तनकारांनी संतांचे विचार जनतेसमोर मांडायला हवेत. पण ते गुंतलेत कीर्तनातून संतांच्या दंतकथा, कपोलकल्पित चमत्कार सांगण्यात. अंधश्रद्धा वाढवण्याचा हा नवाच प्रकार. कीर्तन म्हणजे समाजसेवा. समाजाचं प्रबोधन करण्याचं माध्यम. निर्लोभीपणानंच ही कीर्तनसेवा करणं अपेक्षित असतं. तुकाराममहाराज तर म्हणतात, जिथं कीर्तन कराल तिथं पाण्याचा थेंबसुद्धा घेऊ नये. पण आता भरमसाठ मानधनाशिवाय कीर्तनाची तारीखच पक्की न करणारे कीर्तनकार तयार होऊ लागलेत. असे लक्ष्मीच्या मागं धावणारे कीर्तनकार काय प्रबोधन करणार, असा प्रश्नच आहे. वारकरी काय किंवा मानकरी काय, सगळेच संतांच्या विचारांपासून दूर जात आहेत, असं खेदानं म्हणावं लागेल. ज्ञानेश्वरमाऊलींच्या पालखीसोहळ्यात संतांच्या नावांनी अठरापगड जातीच्या दिंडय़ा चालतात. या दिंडय़ांमध्ये मोठा घोळ सुरू आहे. शेकडो वर्षे वाटचाल करणार्या अनेक दिंडय़ा विकल्या जात आहेत. वारकर्यांची लूट करून पैसा कमावण्याच्या उद्देशानं दिंडी मालक पछाडले आहेत. मान्यताप्राप्त दिंडीत चालण्यासाठी वारकर्यांकडून भरमसाठ फी घेतली जात आहे.
आश्चर्य वाटेल पण पावसासाठी आता वारीत होमसुद्धा करायला सुरुवात झालीय. ही कुठली वाटचाल म्हणायची? कर्मकांडाच्या विरोधात लढा उभारणार्या माऊलींनाच आता सोवळ्या-ओवळ्यात पुजलं जातंय. नैवेद्यसुद्धा वेगळे वेगळे दाखवले जातायत.
देवाच्या नावाखाली मानकरी वर्षाची चंदी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. गळ्यात माळ घालून अनेक महाराज प्रतिगामी चळवळी घेऊन वारकर्यांमध्ये येत आहेत. माऊलींचे वारकरी कुंभमेळ्याला जातात, त्यांचा खर्च संस्थान करते, यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं? कुंभमेळा आणि वारकरी संप्रदाय यात काही फरक आहे की नाही? कवीवर्य कुसुमाग्रज यांनी या प्रकाराचा आपल्या `पर्वणी’ या कवितेतून चांगलाच समाचार घेतला आहे. ते या कवितेत म्हणतात,
व्यर्थ गेला तुका। व्यर्थ ज्ञानेश्वर।।
संतांचे पुकार वांझ झाले।।
रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग।
दंभ शिगोशीग तुडुंबला।।…असे कवितेत भरपूर कोरडे ओढलेले आहेत. कवितेत शेवटी कुसुमाग्रज तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळी उधृत करतात.
तुका म्हणे ऐसे मावेचे मईंद।
त्यापाशी गोविंद नाही नाही।।
कुसुमाग्रजांनी केलेला हा जागर लेखक, कवींनी पुन्हा एकदा करण्याची गरज आहे.
सर्वसामान्य वारकरी, प्रवचनकार, कीर्तनकार, मानकरी, फडकरी, भालदार, चोपदार यांच्यात याविषयी जागृती व्हायला हवी.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।।
हा संत तुकारामांचा उपदेश सर्वत्र रुजवायला हवा. संतविचारांचा लामणदिवा घासूनपुसून लख्ख करायला हवा. त्याचा उजेड पुन्हा एकदा सर्वत्र पसरायला हवा.
पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभ्या राहिलेल्या सावळ्या विठ्ठलामुळं लोकांची देव धर्म, कर्मकांड याबाबतची भिती कमी झाली. कर्मकांड, होमहवन, अंधश्रद्धा मातीत गाडून नवा समाज उभा राहिला. पण आपण ही परंपरा विसरलो की काय, अशी परिस्थिती सध्या आहे.
3 comments:
hi
hi
j
Post a Comment