Popular Posts

Saturday, July 7, 2012

वारीच्या गावात

माझ्या वारीच्या गावात
रोज नवी नवलाई
टाळ मृदंग वीणेतून
रोज भेटते विठाई

माझ्या वारीच्या गावात
मळे भक्तीचे फुलतात
माणसांच्या ताटव्यांना
फुले हरिनामाची येतात

दिंड्या दिंड्याची पाले
रोज माळावर उतरतात
रात्र सरता सरता
वाट पहाटेची चालतात

गाव चालता बोलता
वारा ढोल वाजवितो
पावलांच्या तालावर
मग मृदंग नाचतो

विठ्ठलाची पूजा आम्ही
रोज नव्याने बांधतो
ओव्या अंभगाची फुले
ताजी देवाला वाहतो

माझ्या वारीच्या गावात
ओव्या अंभगाचे धन
रोज लुटतात वैष्णव
शब्दा शब्दांचे सोनं

वारीच्या गावात सत्ता
माऊलीची अशी चाले
मुक्या टाळातून देव
रोज आमच्याशी बोले

भगवी वस्त्रे गुंडाळून
सूर्य दर्शनाला येतो
माझ्या गावाच्या चरणी
माथा रविकरांचा टेकतो

विठ्ठलही रोज इथं
मुक्कामाला येतो
पहाट होण्या अगोदर
गाव उचलून नेतो

दशरथ यादव, पुणे                                                                                                                                        

No comments: