Popular Posts

Friday, August 2, 2013

चोरटा पाऊस

चोरटा पाऊस

नको तिथेच झोंबला
असा पाऊस चोरटा
बघा टपून बसला
हा हा नभाचा पोरटा

ढग चालता बोलता
बघा आडले घरात
ताटी मनाची लावता
उभा पाऊस दारात

छत अंगाव घेऊन
वळचणीला लोंबला
मऊ शिंतोडे बनून
हळू घरात घुसला

भल्या पहाटे पहाटे
आडावरती लपला
हंडा भरता भरता
दव बनून खेटला

भर दुपारी बागेत
त्याने बंगला बांधला
मग सखीला बघून
हळू फांदीशी झिंगला

नाग पंचमी सणाला
झिम्मा सईशी खेळला
पिंगा घालता घालता
गडी गर्दीत घुसला

पा णी अडवा जिरवा
असा पुढारी बोलला
माळ बोडका बघून
गाली पाऊस हसला

मेंहदी हाताला बघून
पाऊस डोळ्यात दाटला
मग मु-हाळी बनून
असा एकांटी भेटला

टाळमृदंग वाजता
भक्ती रसात भिजला
झेंडा भगवा घेऊन
असा दिंडीत नाचला

माठ फो़डीला कृ्ष्णानं
करी गवळण कागांवा
पेंद्या हसत म्हणाला
जावा शरण यादवा


दशरथ यादव, पुणे

No comments: