Popular Posts

Sunday, February 2, 2020


           क-हाकाठचे दिवस

                

              लेखक- दशरथ यादव

    
                आल्याड क-हा अन पल्याड नीरा

                  हा शिवशाहीचा झरा रं                 शिवशंभुचा पुरंदर म्हणजे                  मोतियांचा तुरा रं..

साहित्याचे पहिले बीजारोपण बालमनावर झाले ते शाळकरी वयात. भुलेश्वराचे शिल्पवैभव, माळशिरस गावचा शिवार, येथील प्राचीन पांढरीमाती, चिंचेचा बाग, खळखळाणारा ओढा, डोंगर, -या, फुले, फळे, शेती, सण उत्सव यातून लेखणाची आवड निर्माण झाली. सासवडला महाविद्यालयीन जीवनात कवितेच्या प्रतिभेला अंकूर फुटले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा वैभवशाली वारसा अंगाखांद्यावर दिमाखात मिरविणा-या  -हाकाठावर काव्य प्रतिभा बहरली. १९८७-८८ साली महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्ताने मी सासवडला आलो. त्यावेळचे सासवड म्हणजे मोठे खेडे. सोपाननगरची वसाहत नुकतीच होत होती. नगरपालिका आणि पंचायत समितीच्या बाहेर सासवड पसरलेले नव्हते. वाघिरे महाविद्याल गावाबाहेर दूर होते. सध्याचे एसटी स्टँड पोलिसस्थानकाच्या जागेवर उभे होते. आधुनिकतेच्या उंबरठ्यावर सासवड होते. मोठे खेडे ते टुमदार शहर या सासवडच्या बदलाचा साक्षीदार होण्याचे भाग्य माझ्या पिढीला लाभले. माळशिरस सारख्या खेडेगावातून सासवडला आल्या नंतर मोठे कुतुहल मनात होते. अकरावी विज्ञान शाखेला पुरंदर हायस्कूलला मी प्रवेश घेतला. पुरंदर हायस्कूल म्हणजे महाविद्यालयाचा कोणता वारा तिथे फिरकत नव्हता. वाघिरे महाविद्यालयात तोपर्यंत अकरावी विज्ञान शाखा सुरु नव्हती. मी पुरंदर हायस्कूलला प्रवेश घेतला त्यानंतर वाघिरे महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरु झाली. पुरंदरला शिक्षण घेत असताना वाघिरे महाविदलयाचे आकर्षण स्वस्थ बसू देत नव्हते. पुरंदर हायस्कूलला एक वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर मी बारावीला वाघिरे महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिकत असताना साहित्याची आवड निर्माण झाली. गावावरुन एसटीने जेवणाचे डबे यायचे. रात्रीचे जेवण शिळ्या भाकरी खाऊनच व्हायचे. दरम्यानच्या काळात क-हाकाठचे संगमेश्वर, वटेश्वर, सोपानदेव मंदिर, येथील जुने पुराणे वाडे, यांच्या नाळ जुळली. दिवस न दिवस संगमेश्वर आणि वटेश्वर मंदिराच्या परिसरात चिंच आंब्याच्या झाडाखाली अभ्यास करीत जायचा. छान वाटायचे. आज काळाच्या मागे वळून पाहताना ते सोनेरी दिवस फुलायचे होते. झुलायचे होते. हे पटते. वाघिरे महाविद्यालयात नवे मित्र जोडले गेले.  गावाशिवेच्या बाहेरचे मित्र जोडल्याने काही तरी नवीन गवसत आहे याचा आनंद वाटायचा. परिस्थिती गरीबीचीच होती. प्राचार्य मोहोडसर होते. त्यावेळी मुरकुटेसर, वाघंमारेसर, घुमरेसर, हुंबरेमँडम, जांभळेसर यांचा बोलबाला होता. कशी बशी बारावी पास होऊन मी कामाच्या निमित्ताने पुण्यात गेलो. अगोदरच कवी मनाच्या  गाभा-यात साहित्याची बीजे रुजत होती. -हेकाठावर कवितेची, साहित्याची, इतिहासाची गोडी वाढत होती. पुण्यात गेल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्याची जिद्द मी सोडली नाही. बी.ए पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी मला मदत झाली ती सतीश पाटील सरांची. प्रवेश घेणे, परीक्षा फाँर्म भरणे याकामी त्यांनी मला मोठ्या आपुलकीने मदत केली. दरम्यान मी पुण्यात दैनिक सांजसमाचार, दैनिक पुढारी मध्ये पत्रकार म्हणून काम करीत होतो. पत्रकारितेत नाव होत होते. तर दुस-या बाजूला शिक्षणही सुरु होते. एम.ए पर्यंतचे शिक्षण वाघिरे महाविद्यालयात झाले. माझे मित्र एम.ए होईपर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रातील माझा अनुभव पाच वर्षाचा झाला होता. याचा मला मोठा उपयोग झाला. प्रसिद्धीचे वलय वाढत असताना साहित्यलेखनही होत होते.
माझे सासवड, पुरंदर किल्ला, मल्हारगड, दिवेघाट, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, आद्यक्रांतीवीर उमाजीराजे यांचे भिवडी, संत सोपानदेवांचे समाधी, आचार्य अत्रे, शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा, साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, यांचा साहित्याचा वारसा जतन करण्याची संधी मिळाली. आभाळाच्या उंचीची माणसे क-हाकाठावर जन्माला आली हीच माझी साहित्यलेखनाची खरी उर्जाशिल्पकलेचे वैभव असलेले चांगावटेश्वर, संगमेश्व, भुलेश्वर, नारायणेश्वर, संकेश्वर, पांडेश्वर ही प्राचीन मंदिरे म्हणजे क-हापठारचा अमोल ठेवाच. -हानदीच्या दक्षिणेला पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेवर पुरंदर, वज्रगड, जेजुरगड तर उत्तरेला असलेल्या डोंगररांगेवरील दौलतमंगळ, ढवळगड, मल्हारगड, कानिफनाथगड हे गडकोटांचे बुरुज मला खुणावत. दिवे, शिंदवणे, भुलेश्वर, दौंडजखिंड, शिवरी-तक्रारवाडी, बाबदेव (पांगारे), नारायणपूर, गराडे मरीआई या नऊ घाटांची वेलांटी वळणांनी अक्षरांची गोडी लावली. सुरवातीला कवितेच्या गावाला निघालेलो मी..पुणे मुक्कामात पत्रकारितेच्या गावात पोचलो. तिथे दैनिक पुढारी, सकाळ, केसरी, लोकमत, नवशक्ती, सुराज्य या दैनिकात पत्रकार, उपसंपादक म्हणून एक तप पुर्ण केले. दरम्यान दैनिक सकाळमध्येच असताना पंढरीच्या वारीचे वार्तांकन करण्यासाठी आळंदी ते पंढरपूर असा सलग प्रवास करताना प्रसिद्ध ग्रामीण कवी विठ्ठल वाघ यांची ओळख झाली. त्यांनी माझ्या कविता ऐकल्या आणि मला म्हणाले, एक बातमी कमी लिही पण कविता लिहित जा. बातमी अल्पायुशी असते. कविता दीर्घायुषी असेत. कायम टवटवीत असते. पुन्हा कविता लेखनाकडे वळलो. राज्यभर हजारो कविसंमेलनाचे कार्यक्रम केले. कवि मुलांच्या भेटीला,  गाव कवितेचा, हास्यकवीसंमेलन, प्रबोधन कविसंमेलने गाजवली. चांद्यापासून बांद्यापर्यंत कवितेचे कार्यक्रम केले. अगदी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातही अनेक कार्यक्रम केले, दुरदर्शन, आकाशवाणी, टीव्ही चँनेलवरही कविता वाचन आणि गायन केले. महाराष्ट्राच्या साहित्य दरबारात पत्रकार, कवी, लेखक, गीतकार, कांदबरीकार, वक्ता, इतिहास संशोधक, लावणीकार, असा ब-यापैकी बोलबाला झाला. ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडला झाले. त्यावेळी निमंत्रित कवी म्हणून तर मी सहभागी होतोच, पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा राज्याचा प्रवक्ता म्हणून काम केले. संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अडीच ते तीन लाख एवढा गर्दीचा विक्रम झाला.

हजारो वर्षाची गुलामगिरी तोडून मानवता जागवणा-या पुरोगामी विचारांच्या मुशीतून मी घडत होतो. राजकारणात लोकनेते शरद पवार साहेबांचा विचार मनावर घोंघावत होता. वारकरी संप्रदायाचे टाळ कानात घुमत होते. लोकदेव विठोबा, खंडोबा बदलाचा संदेश देत होता. पत्रकारितेमुळे उभ्या देशातील नेते, साहित्यिक, विचारवंत, कलावंत यांच्या भेटीमुळे जगाकडे पाहण्याची दृष्टी बदल होती.                           
    -हाकाठचा पुरंदर स्वस्थ बसू देत नव्हता. छत्रपती शिवरायांचा पराक्रम स्फुर्ती देत होता. छञपती संभाजी राजांचे बलिदान स्वस्थ बसू देत नव्हते. पुरंदर किल्ला, मल्हारगड, दिवेघाट, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, आद्यक्रांतीवीर उमाजीराजे यांचे भिवडीगाव आणि महापुरुषांचा पराक्रम डोळ्यासमोरुन तरळत होता. सात गड नऊ घाटांच्या कवेत वसलेली क-हेपठार ही शंभर चौरस मैलांची मराठ्यांची दौलत. माळशिरस (भुलेश्वर) च्या मातीत बालपण गेले. मोहेंजेदडो हडप्पाशी नातं सांगणारे गावातील पांढ-या मातीचे ढिगारे, गाडलेली जुनीसंस्कृती हादरे द्यायची. तिथेच इतिहास संशोधनाची बीजे रुजली. बळी, चार्वाक, गौतमबुद्द, जिजाऊ, शिवाजीमहाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर, शिवश्री पुरुषोत्तम खेडेकरसाहेब यांच्या शिवविचारांच्या प्रभावातून ऐतिहासिक, कांदबरी लेखनाकडे वळलो.
भुलेश्वर विद्यालयात शिक्षण घेत असताना खरे तर कवितेची नाळ जुळली ती पाठ्यपुस्तकांतील कविता वाचता..वाचता..आपणही कविता गाणी लिहावीत असे मनोमन वाटू लागले. त्यापूर्वी एकून होतो की कविता लिहिणे म्हणजे ही दैवाची देणगी आहे. प्रतिभा ही कवीला देवाकडून मिळते. कवी लेखक म्हणजे काही समजापेक्षा वेगळा असतो. कविता वाचता वाचता थोड्या बहुत प्रमाणात बाळबोध कविता लिहू लागलो. दहावी झाल्यानंतर माझ्यात असलेल्या प्रतिभेला आणखी पालवी फुटली ती क-हाकाठावर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सा.संगमेश्वर, सा.केदारेश्वर मध्ये कविता छापून येऊ लागल्या. दिवाळी अंकातही कविता छापल्या आणि कुतूहल आणखी वाढले. अकरावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना मराठी साहित्याची पुस्तके वाचणारा मी एकटाच असेल. ग्रंथपाल घाडगे यांनाही त्याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. खूप पुस्तके वाचली. क-हानदीच्या काठावर संगमेश्वर, वटेश्वर, सोपानदेव मंदिर परिसरात दिवस ना दिवस जात. अभ्यासासाठी आम्हा मुलांचा कंपू महाविद्यालय सुटले की तिकडे जात. तेथेच साहित्याची बीजे रुजली. पुण्यात दैनिक पुढारीमध्ये काम करीतच मी शिक्षण घेत होतो. वृत्तपत्रात मान खूप पण धन मात्र अत्यल्प आहे. रोजचा खर्च भागविणे त्याकाळात अशक्य व्हायचे. पण पत्रकारितेची आवड असल्याने या सगळयांकडे दुर्लक्ष केले. पत्रकारितेत मन लावून काम करु लागलो. पुण्यात हा हा म्हणता माझ्या लेखनाचा आणि कामाचा बोलबाला होऊ लागला. त्यानिमित्ताने अनेक मान्यवर साहित्यिक, कवी, लेखकांच्या ओळखी झाल्या. पत्रकारितेच्या गावात रमून गेलो. वृत्तपत्रीय लिखाणात मन रमले. बराच काळ गेल्यानंतर मात्र पंढरीच्या वारीला दैनिक सकाळ मध्ये वारीच्या वाटेवर या सदरात लेखन करीत असताना प्रसिद्धी तर मिळालीच. पण लेखनाचे अंगही विकसित झाले. कविसंमेलनाला जायला लागलो. पुन्हा कवितेला बहर आला. या बहरात लिहिलेल्या कविता उन्हातला पाऊस या शीर्षकाखाली वाचकांच्या भेटीला येत आहेत.

-हाकाठाची मंदिरे
खुणावती पुन्हा मला
शिवशाहीचे तोरण
म्हणे बांधायचे तुला

पुरंदराच्या भूमीत
जन्म पुन्हा पुन्हा व्हावा
मातीने कणा कणात
इतिहास जागवावा

पुरंदरवर असलेल्या प्रेमातून अशा स्वाभिमानी कवितांचे लेखन झाले. ही माझी खरी दौलत आहे, असे मी समजतो.
वारीच्या वाटेवर ही महाराष्ट्रात गाजलेली ऐतिहासिक महाकादंबरी ही साहित्य दरबारात दाखल झालेला मैलाचा दगड ठरली आहे.


  क्रांतीकारक राजे उमाजी नाईक


उमाजी नाईक। क्रांतीचा अंगार। जुलमी नंगर। तोडियेला।।
भिवडी गावचे । दादोजी नाईक। गडाचे पाईक। पुरंदर।।१।।
राजे शिवाजींची। प्रेरणा घेऊन। बांधले तोरण। उमाजीने।।
शपथ घेऊन। लावीला अंगारा। उधळी भंडारा। स्वराज्याचा।।२।।

धिप्पाड उमाजी। कणखऱ बाणा। रयतेचा राणा। शोभतसे।।
-हेचा पठार। शौर्याची ही खाण। गडाचीही शान। पुरंदर।।३।।
आद्य क्रांतीवीर। उमाजींचे बंड। थोपटले दंड। विरोधात।।
राजे उमाजीचा। काय सांगू थाट। डोंगराचे तट। संवगडी।।४।।

तुजोरी लुटली। स्वराज्यासाठी। हाणुनीया काठी। नाठाळाच्या।।
जुलमी इंग्रज। होती खूप चीड। मोडलीना खोड। उठावाने ।।५।।
इंग्रज हाकला। वाचवा देशाला। म्हणून मांडला। जाहिरनामा।।
गद्दाराची कधी। नाही केली गय। घाबरतं भय। उमाजीला।।६।।

जनतेला वाटे.। उमाजीच राजा।। होई गाजा वाजा। भवताली।।
खुशाबा विठोजी। जीवाचे सोबती। बाबू कृष्णा सत्तू। कीती सांगू ।।७।।
दादोजी वडील। माता लक्ष्मीबाई। बहिण जिजाई। सोबतीला।।
भांबुर्डा तिजोरी। दिवसा लुटली। गरिबां वाटली। आनंदाने।।८।।

उमाजी पुतळ। कहाणी प्रेमाची। खंडोबा बाणाई। देवाचीच।।
काळोजी फितुर। इंग्रजाना झाला। दिला दगा त्याला। जिजानेही।।९।।
उमाजी पकडा। इंग्रजी आदेश। जाहीर बक्षीस। केले बघा।।
पोखर कोडीती। युद्ध झाले फार। पडलेना गार। माँटिकस।१०।।

इंग्रजी मुंडकी। पाठविली थेट। उमाजीने भेट। मामलेदारा।।
लपाया डोंगर। पांगारे पिंगोरी। फिरे काळदरी। रात्रदिंन।।११।।
उत्रोली गावात। पकडले वीरा। लागू दिला ना थारा।।इंग्रजानी।।
दगा फटक्याने । नाही घाबरला। हसतच गेला। फासावर।।१२।।

(प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांच्या शिवधर्मगाथेतून साभार)

 वारीच्या वाटेवर महाकांदबरी














    स्वातंत्र्याचे महानायक - राजे उमाजी नाईक

महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी यौद्ध्यांच्या नामावलीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्षवेधून घेतो. लढवय्य क्रांतीकारक आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहील. इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला. राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. वडील दादोजी नाईक-खोमणे, आई लक्ष्मीबाई, भाऊ अमृता व कृष्णा, बहिण जिजाई, गंगू, म्हाकाळा, तुका व पार्वती असे कुटुंब. वयाच्या 10 व्या वर्षी कुस्तीगीर म्हणून त्यांचा लौकिक होता. सातारा गादीचे राजे प्रतापसिंह यांच्याकडून नसरापूरला राममंदिरात त्यांचा गौरव करण्यात आला होता. कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरवातीला 300 च्या वर सैन्याची त्यांनी जमवा जमव केली. इंग्रजाना हाकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीवीरांना बळ देणारे ठरले.  
इंग्रजांनी रामोशी जातीला गुन्हेगार ठरविले होते. त्यांना चरितार्थासाठी शेती किंवा दुसरा कुठलाही उद्योगधंदा नव्हता. सरळ मार्गाने इंग्रज जगू देत नव्हते. त्यामुळे पोट भरण्यासाठी लुटालूट करण्याशिवाय पर्याय नव्हता. पेशव्यांनी रामोशी वतने रद्द करुन पुरंदरगड खाली करण्याचा हूकुम दिला होता. 1804 मध्ये किल्ल्याच्या पायथ्याशी जांभुळवाडीवर हल्ला करुन त्यांना हुसकावून लावले होते. त्यामुळे त्यांनी निजामाच्या हद्दीत स्थलांतर केले. उमाजीला परिस्थितीची जाणीव झाली. त्याने आपले स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार केला. जातीतील लोकांना एकत्र करुन जागृती केली. रामोशी खंडोबाचे भक्त होते. गेलेली वतने मिळविण्यासाठी बंडाचे निशाण त्यांनी हातात घेतले.
16 फेब्रुवारी 1831 ला इंग्रजाविरुद्ध त्यांनी बंड उभारले. शिवशाहीपासून पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी नाईक घराण्याकडे होती. कोणताही ह्ल्ला परतून लावण्याची त्यांची नेहमी तयारी असे. राजे उमाजी उंचपुरे धिप्पाड होते. चांगले कुस्तीगीर असल्याने रोज दंड बैठकांचा व्यायाम करी. दांडपट्टा, कु-हाडी, तीरकामठा, गोफण, भाला फेक, घोड्यावर बसणे. तलवार चालवणे ही कला त्यांनी वडिलांकडून लवकरच अवगत केली होती. या काळातच हिंदुस्थानात इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली होती. हळुहळु मराठी मुलुख जिंकत पुणे ताब्यात घेतले होते. 1803 मध्ये दुस-या बाजीरावाला स्थानापन्न करुन त्याने इंग्रजाचा पाल्य म्हणून काम सुरु केले होते. त्याने पुरंदर किल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडुन काढून आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजांचे अत्याचार वाढत होते. त्यामुळे उमाजी नाईक जनतेच्या बाजून लढण्यासाठी पुढे झाले. भारताच्या इतिहासात 1857 च्या उठावा अगोदर क्रांतीची स्वप्ने पाहणारे व 14 वर्षे इंग्रजाना सळो की पळो करुन सोडणारे पहिले क्रांतीकारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रामोशी समाजात जन्मलेल्या उमाजी नाईक यांच्या वर इतिहास कारांनी कायमच अन्याय केला. त्यांचा पराक्रम दुर्लक्षित राहिला.
21 डिसेंबर 1830 रोजी पाठलाग करणा-या इंग्रज अधिकारी बाँईड आणि त्यांच्या सैन्याला मांढरदेवी गडावरुन बंदुका आणि गोफणीतून दगड मारुन घायाळ करुन परत पाठविले होते. काहींच प्राणही घेतले होते.
सातारा जिल्ह्यात चित्तुरसिंग यांच्या नेतृत्वाखाली तर पुरंदर भागात उमाजी नाईक यांनी लुटालुट सुरु केली.1824 मध्ये कडेकोट बंदोबस्त असूनही भांबुर्ड्याची तिजोरी लुटली. मिरजेच्या पटवर्धनांची मंडळी पुण्याला जाताना त्यांच्यावर छापा टाकून मोठा ऐवज लुटला. 1826 साली एप्रिल महिन्यात पंढरपूराहून पुण्याला जाणा-या सावकाराला लुटुन त्याची मालमत्ता ताब्यात घेतली. आँक्टोबर महिन्यात जेजुरीच्या पोलीस चौकीवर हल्ला करुन बंदुका पळविल्या. जेणेकरुन इंग्रज हैराण होतील अशा मोहिमा ते आखीत. उमाजीला पकडून देण्यासाठी इंग्रजानी मोठे बक्षिस जाहीर केलेसर्वसामान्य लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची ते काळजी घेत. एका शेतक-याला त्याची गहाण ठेवलेली जमीन सोडवून घेण्यास मदत केली. एकाला रोख रक्कम दिली. लग्नाच्या व-हाडातील गरीब वधुवरांना आपल्या जवळचे दागिने दिले. जंगलातून त्यांना सुखरुप घरी पोचवले.
इंग्रजाना हाकलून देण्याचे त्यांचे ध्येय होते. भुजबा, पांड्या हे उमाजीचे साथीदार होते. त्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापन करुन राज्याच्या खर्चासाठी खंडणी गोळी केली. स्वतःला राजा समजून ब्राम्हणांना दक्षिणा वाटली. लोकांनी इंग्रजांना वसूल देऊ नये. कर भरल्यास घरे जाळून टाकण्याच हूकूम केला. आपला स्वतःचा  दरबार भरविण्यास सुरवात केली. लोक त्यांना मानीत होते. राज्याचा विस्तार होत होता. ठिक ठिकाणी चौक्या बसवल्या. भोगा, पांडू, कृष्णा, अमृता, सत्तू, येसाजी यांच्या स्वतंत्र लहान लहान टोळ्या होत्या. सत्तूची स्वतःची टोळी उमाजींचा उद्देश कळल्यावर त्यांना नेता मानून त्यांच्या कार्यांत सहभागी झाली.
महाराष्ट्राच्या भूमीत इंग्रजाना पहिला हादरा आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उमाजी नाईक यांचे बालपणच शौर्याचा वैभवशाली वारसा असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या परिसरात गेले. अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची हिम्मत त्यांना शिवरायांच्या चरित्रातूनच मिळाली. वयाच्या १८ व्या वर्षी इंग्रजाच्या विरोधात उठाव करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. विठुजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळस्कर यांना बरोबर घेऊन जेजुरीत खंडोबारायावर भंडारा उधळीत इंग्रजा विरोधात बंड करण्याची शपथ घेतली.
इंग्रज सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून ते गोरगरिबांना अर्थिक मदत करु लागले. कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर ते भावासारखे धाऊन जातत्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्या बाबत आपुलकीची भावना निर्माण होत होती. इंग्रजाना त्रास दिल्याने उमाजी राजे यांना 1818 रोजी एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याचा काळात ते लिहायला व वाचायला शिकले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या सरकार विरोधातील कारवाया आणखी वाढल्या. उमाजी राजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांच्या सोबत येऊ लागली. त्यामुळे त्यांचे सैन्य पाच हजारापर्यंत गेले. दरोडे आणि लुटमारीमुळे इग्रंज पुरते वैतागून गेले. उमाजीराजांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी माँकिन टाँस यांनी पुरंदरच्या मामलेदारास आदेश दिले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील पोखर, कोडीत परिसरातील डोंगरात शोध घेऊ लागला. तेथे उमाजी आणि इंग्रजांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. इंग्रजाना पराभव स्वीकारावा लागला. उमाजींनी पाच इंग्रज सैनिकांची डोकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले होते. उमाजींचे सैन्य डोंगरात टोळ्या करुन राहत असतं.
नोव्हेंबर 1827 रोजी इंग्रजाना त्यांनी ठणाकावून सांगितले की आज हे बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील. तुम्हाला जेरीस आणतील.
उमाजींचा जाहीरनामा
 राजे उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरोधात जाहीरनामाच प्रसिदध केला. लोकांनी इंग्रजी नोक-या सोडाव्यात. त्यांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा देऊ नये. देशवासियांनी एकाचवेळी जागोजागी गोंधळ घालून आराजकता माजवावी. इंग्रज राजवट लवकरच संपुष्टात येत आहे. त्यांना कोणी मदत करु नये. इंग्रजाना मदत केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करील. असे सांगून नवीन स्वराज्य उभारण्याचा प्रयत्न केला. स्वतःची फौज उभी केली. उमाजीने राज्यात स्वतःचा ध्वज निर्माण केला. शिवाजी राजांचे हुबेहुब अनुकरण करीत राज्य स्थापना केली. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. जनताही उमाजींना मदत करु लागली. उमाजींचा जाहीरनामा इंग्रजांना हादरावणारा होता. 1829 साली सरकारने त्यांच्याशी समझोता करुन त्याला 120 बिघे जमीन दिली. गुन्हे माफ केले. नाईक पदवी दिली. जातीतील काही साथीदारांना नोक-या दिल्या. काही काळ त्यांनी ते मान्य केले.
उमाजींनी केलेल्या या उठावामुळे इंग्रज हादरुन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुन्हा उमाजी स्वराज्य निर्माण करीन यांची भिती त्यांना वाटू लागली. त्यामुळे उमाजीला पकडण्यासाठी त्यांनी सावकार, वतनदार यांना मोठ मोठी अमिषे दाखविली. उमाजीची माहिती देणारांस 10 हजार रुपये व चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. उमाजींच्या बहीणीवर प्रेम असलेल्या काळोजी नाईक याला उमाजीने एका दरोड्याच्या प्रकरणात शिस्त मोडून एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून त्याच्या हाताची बोटे दगडाने ठेचण्याची शिक्षा दिली होती. त्याचा बदला घेण्यासाठी काळोजी व नाना चव्हाणही इंग्रजाना फितुर झाला. काळोजीने उमाजीराजे यांच्या बहिणीचा कपटाव्याने वापर करीत इंग्रजाना गुप्त माहिती पुरवली.
उमाजीराजे यांच्या पराक्रमावर खूष असलेल्या सरदेशमुख यांची मुलगी पुतळ हिने त्यांच्याबरोबर लग्न केले. काळोजी नाईक आणि त्याचे साथीदार दरोडा टाकण्यासाठी आले असताना वस्तीमध्ये गरीब कुटुंबावर अन्याय करीत असलेल्या काळोजीच्या विरोधात पुतळ स्वतः उभी राहिली. तिचे धाडस आणि प्रामाणिकपणा उमाजीराजांनाही भावला. पुतळ चे उमाजी नाईक यांच्यावर प्रेम होते. त्यातूनच उमाजीने तिच्याबरोबर लग्न केले.
उमाजीला पकडण्यासाठी माँन्कीटसने दिवेघाटाच्या माध्यावर सैन्याची छावणी टाकून तो शोध घेत होता. भोर, पानवडी, काळदरी, पिंगोरीच्या डोंगर द-यातून उमाजी नाईक यांचा वावर होता. त्या ठिकाणीही इंग्रज शोध घेत होते. काळोजी नाईक फितुर झाल्याचे पुतळला समजल्याने तिने उमाजीनाईकांना वाचविण्यासाठी इंग्रज अधिका-याशी काळोजीच्या वेषातून संधान साधून त्याचा डाव उलटविण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या घडणा-या नाट्यमय घडामोडी बाबत अजूनही संशोधन झालेले नाही. उमाजीराजांचा खरा इतिहास पुढे येण्यासाठी संशोधन होण्याची गरज आहे. उमाजीं नाईक यांची तडफ, बेडरपणा, लढाऊ वृती, शिवनीती, प्रामाणिकपणा, जाज्वल्य देशप्रेम, चपळाई, खंडोबा प्रती असलेली देशभक्ती आणि जनतेत असलेला आदरयुक्त दरारा, सैन्यावरचा वचक यामुळे त्यांनी स्वराज्याचा दुसरा लढा उभारला होता. पुन्हा जनतेचे राज्य उमाजींच्या रुपाने येईल अशी शक्यता होती. पण महाराष्ट्राच्या मातीत आणखी काही नवीनच घडणार होते. फितुरीचा जुनाच शाप या मातीत आहे. काळोजी नाईक आणि नाना चव्हाणांनी गुप्त माहिती पुरवली. जोडीला जिजाला मदतीला घेऊन अखेर इंग्रजानी डाव साधला. 15 डिसेंबर1831 रोजी भोर तालुक्यातील उत्रोली गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजानी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीत काळ्या खोलीत ठेवण्यात आले. इंग्रज अधिकारी माँकिन टाँस याने उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे.उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवून न्यायधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. खडकमाळ आळीत मामलेदार कचेरी समोर देशासाठी हसत हसत नरवीर उमाजी नाईक 3 फेब्रुवारी 183२ रोजी फासावर चढले. त्यावेळी त्यांचे वय होते 43 वर्षाचे. इंग्रजानी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बाबू सोळस्कर यांनाही फाशी दिली. इतरांना दहशत बसावी म्हणून त्यांचा देह पिंपळाच्या झाडाला तसाच तीन दिवस लटकत ठेवला होता. अशा प्रकारे धगधगत्या क्रांतीकारकाच्या बंडाचा शेवट झाला. अशा महापुरुषाचे प्रेरणादायी स्मारक त्यांच्या जन्मगावी भिवडी येथे उभारण्याची घोषणा अनेकवेळा झाली. पण योग्य तो न्याय अजून राजे उमाजी नाईक यांना मिळाला नाही. इतिहासकारांनी त्यांना हवे ते स्थान दिले नसले तरी जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे महानायक म्हणून उमाजीराजांचे स्थान अबादीत आहे. थरकाप उडविणा-या त्यांच्या मोहीमांच्या दंतकथा आजही लोक मोठ्या आपुलकीने सांगत असतात.

लेखक-
दशरथ यादव, पुणे (सासवड)
मो.9881098481