क-हाकाठचे दिवस
लेखक- दशरथ यादव
आल्याड
क-हा अन पल्याड नीरा
हा शिवशाहीचा
झरा रं शिवशंभुचा
पुरंदर म्हणजे मोतियांचा
तुरा रं..
साहित्याचे पहिले बीजारोपण
बालमनावर झाले ते शाळकरी वयात. भुलेश्वराचे
शिल्पवैभव, माळशिरस गावचा
शिवार, येथील प्राचीन
पांढरीमाती, चिंचेचा बाग, खळखळाणारा ओढा, डोंगर, द-या, फुले, फळे, शेती, सण उत्सव यातून लेखणाची आवड निर्माण झाली. सासवडला महाविद्यालयीन जीवनात कवितेच्या प्रतिभेला अंकूर फुटले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा
वैभवशाली वारसा अंगाखांद्यावर दिमाखात मिरविणा-या क-हाकाठावर काव्य प्रतिभा बहरली. १९८७-८८ साली महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्ताने मी सासवडला आलो. त्यावेळचे सासवड म्हणजे मोठे खेडे. सोपाननगरची वसाहत
नुकतीच होत होती. नगरपालिका आणि पंचायत समितीच्या बाहेर सासवड
पसरलेले नव्हते. वाघिरे महाविद्याल गावाबाहेर दूर होते.
सध्याचे एसटी स्टँड पोलिसस्थानकाच्या जागेवर उभे होते. आधुनिकतेच्या उंबरठ्यावर सासवड होते. मोठे खेडे ते टुमदार
शहर या सासवडच्या बदलाचा साक्षीदार होण्याचे भाग्य माझ्या पिढीला लाभले. माळशिरस सारख्या खेडेगावातून सासवडला आल्या नंतर मोठे कुतुहल मनात होते.
अकरावी विज्ञान शाखेला पुरंदर हायस्कूलला मी प्रवेश घेतला. पुरंदर हायस्कूल म्हणजे महाविद्यालयाचा कोणता वारा तिथे फिरकत नव्हता.
वाघिरे महाविद्यालयात तोपर्यंत अकरावी विज्ञान शाखा सुरु नव्हती.
मी पुरंदर हायस्कूलला प्रवेश घेतला त्यानंतर वाघिरे महाविद्यालयात विज्ञान
शाखा सुरु झाली. पुरंदरला शिक्षण घेत असताना वाघिरे महाविदलयाचे
आकर्षण स्वस्थ बसू देत नव्हते. पुरंदर हायस्कूलला एक वर्षाचे
शिक्षण घेतल्यानंतर मी बारावीला वाघिरे महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतला.
विज्ञान शाखेत शिकत असताना साहित्याची आवड निर्माण झाली. गावावरुन एसटीने जेवणाचे डबे यायचे. रात्रीचे जेवण शिळ्या
भाकरी खाऊनच व्हायचे. दरम्यानच्या काळात क-हाकाठचे संगमेश्वर, वटेश्वर, सोपानदेव
मंदिर, येथील जुने पुराणे वाडे, यांच्या
नाळ जुळली. दिवस न दिवस संगमेश्वर आणि वटेश्वर मंदिराच्या परिसरात
चिंच आंब्याच्या झाडाखाली अभ्यास करीत जायचा. छान वाटायचे.
आज काळाच्या मागे वळून पाहताना ते सोनेरी दिवस फुलायचे होते.
झुलायचे होते. हे पटते. वाघिरे
महाविद्यालयात नवे मित्र जोडले गेले. गावाशिवेच्या बाहेरचे मित्र जोडल्याने
काही तरी नवीन गवसत आहे याचा आनंद वाटायचा. परिस्थिती गरीबीचीच
होती. प्राचार्य मोहोडसर होते. त्यावेळी
मुरकुटेसर, वाघंमारेसर, घुमरेसर,
हुंबरेमँडम, जांभळेसर यांचा बोलबाला होता.
कशी बशी बारावी पास होऊन मी कामाच्या निमित्ताने पुण्यात गेलो.
अगोदरच कवी मनाच्या गाभा-यात साहित्याची बीजे रुजत होती. क-हेकाठावर कवितेची, साहित्याची,
इतिहासाची गोडी वाढत होती. पुण्यात गेल्यानंतर
पुढचे शिक्षण घेण्याची जिद्द मी सोडली नाही. बी.ए पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी मला मदत झाली ती सतीश पाटील सरांची. प्रवेश घेणे, परीक्षा फाँर्म भरणे याकामी त्यांनी मला
मोठ्या आपुलकीने मदत केली. दरम्यान मी पुण्यात दैनिक सांजसमाचार,
दैनिक पुढारी मध्ये पत्रकार म्हणून काम करीत होतो. पत्रकारितेत नाव होत होते. तर दुस-या बाजूला शिक्षणही सुरु होते. एम.ए पर्यंतचे शिक्षण वाघिरे महाविद्यालयात झाले. माझे मित्र
एम.ए होईपर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रातील माझा अनुभव पाच वर्षाचा
झाला होता. याचा मला मोठा उपयोग झाला. प्रसिद्धीचे
वलय वाढत असताना साहित्यलेखनही होत होते.
माझे सासवड, पुरंदर किल्ला, मल्हारगड, दिवेघाट, महात्मा फुले
यांचे मूळगाव खानवडी, आद्यक्रांतीवीर
उमाजीराजे यांचे भिवडी, संत
सोपानदेवांचे समाधी, आचार्य अत्रे, शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा, साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, यांचा साहित्याचा
वारसा जतन करण्याची संधी मिळाली. आभाळाच्या
उंचीची माणसे क-हाकाठावर
जन्माला आली हीच माझी साहित्यलेखनाची खरी उर्जा… शिल्पकलेचे
वैभव असलेले चांगावटेश्वर, संगमेश्वर, भुलेश्वर, नारायणेश्वर, संकेश्वर, पांडेश्वर ही
प्राचीन मंदिरे म्हणजे क-हापठारचा अमोल ठेवाच. क-हानदीच्या
दक्षिणेला पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेवर पुरंदर, वज्रगड, जेजुरगड तर
उत्तरेला असलेल्या डोंगररांगेवरील दौलतमंगळ, ढवळगड, मल्हारगड, कानिफनाथगड हे
गडकोटांचे बुरुज मला खुणावत. दिवे, शिंदवणे, भुलेश्वर, दौंडजखिंड, शिवरी-तक्रारवाडी, बाबदेव (पांगारे), नारायणपूर, गराडे मरीआई या नऊ घाटांची वेलांटी वळणांनी अक्षरांची गोडी लावली. सुरवातीला कवितेच्या गावाला निघालेलो मी..पुणे मुक्कामात पत्रकारितेच्या गावात पोचलो. तिथे दैनिक पुढारी, सकाळ, केसरी, लोकमत, नवशक्ती, सुराज्य या
दैनिकात पत्रकार, उपसंपादक
म्हणून एक तप पुर्ण केले. दरम्यान दैनिक
सकाळमध्येच असताना पंढरीच्या वारीचे वार्तांकन करण्यासाठी आळंदी ते
पंढरपूर असा सलग प्रवास करताना प्रसिद्ध ग्रामीण कवी विठ्ठल वाघ यांची ओळख झाली. त्यांनी माझ्या कविता ऐकल्या आणि मला म्हणाले, एक बातमी कमी लिही पण कविता लिहित जा. बातमी
अल्पायुशी असते. कविता
दीर्घायुषी असेत. कायम टवटवीत
असते. पुन्हा कविता लेखनाकडे वळलो. राज्यभर हजारो कविसंमेलनाचे कार्यक्रम केले. कवि मुलांच्या भेटीला, गाव कवितेचा, हास्यकवीसंमेलन, प्रबोधन कविसंमेलने गाजवली. चांद्यापासून
बांद्यापर्यंत कवितेचे कार्यक्रम केले. अगदी
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातही अनेक कार्यक्रम केले, दुरदर्शन, आकाशवाणी, टीव्ही चँनेलवरही कविता वाचन आणि गायन केले. महाराष्ट्राच्या साहित्य दरबारात पत्रकार, कवी, लेखक, गीतकार, कांदबरीकार, वक्ता, इतिहास संशोधक, लावणीकार, असा ब-यापैकी बोलबाला झाला. ८७ वे अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडला झाले. त्यावेळी
निमंत्रित कवी म्हणून तर मी सहभागी होतोच, पण अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा राज्याचा प्रवक्ता म्हणून काम केले. संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अडीच ते तीन लाख एवढा गर्दीचा
विक्रम झाला.
हजारो वर्षाची
गुलामगिरी तोडून मानवता जागवणा-या पुरोगामी विचारांच्या मुशीतून मी घडत होतो.
राजकारणात लोकनेते शरद पवार साहेबांचा विचार मनावर घोंघावत होता.
वारकरी संप्रदायाचे टाळ कानात घुमत होते. लोकदेव
विठोबा, खंडोबा बदलाचा संदेश देत होता. पत्रकारितेमुळे उभ्या देशातील नेते, साहित्यिक,
विचारवंत, कलावंत यांच्या भेटीमुळे जगाकडे
पाहण्याची दृष्टी बदल होती.
क-हाकाठचा पुरंदर स्वस्थ बसू देत नव्हता. छत्रपती
शिवरायांचा पराक्रम स्फुर्ती देत होता. छञपती संभाजी राजांचे
बलिदान स्वस्थ बसू देत नव्हते. पुरंदर
किल्ला, मल्हारगड, दिवेघाट, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, आद्यक्रांतीवीर उमाजीराजे यांचे भिवडीगाव आणि महापुरुषांचा पराक्रम
डोळ्यासमोरुन तरळत होता. सात गड नऊ घाटांच्या कवेत
वसलेली क-हेपठार ही शंभर चौरस मैलांची मराठ्यांची दौलत.
माळशिरस (भुलेश्वर) च्या
मातीत बालपण गेले. मोहेंजेदडो हडप्पाशी नातं सांगणारे
गावातील पांढ-या मातीचे ढिगारे, गाडलेली
जुनीसंस्कृती हादरे द्यायची. तिथेच इतिहास संशोधनाची बीजे
रुजली. बळी, चार्वाक, गौतमबुद्द,
जिजाऊ, शिवाजीमहाराज, महात्मा
फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न
डाँ.बाबासाहेब आंबेडकर, शिवश्री
पुरुषोत्तम खेडेकरसाहेब यांच्या शिवविचारांच्या प्रभावातून ऐतिहासिक, कांदबरी लेखनाकडे वळलो.
भुलेश्वर
विद्यालयात शिक्षण घेत असताना खरे तर कवितेची नाळ जुळली ती पाठ्यपुस्तकांतील कविता
वाचता..वाचता..आपणही कविता गाणी लिहावीत असे मनोमन वाटू लागले. त्यापूर्वी एकून
होतो की कविता लिहिणे म्हणजे ही दैवाची देणगी आहे. प्रतिभा ही कवीला देवाकडून
मिळते. कवी लेखक म्हणजे काही समजापेक्षा वेगळा असतो.
कविता वाचता वाचता थोड्या बहुत प्रमाणात बाळबोध कविता लिहू लागलो. दहावी
झाल्यानंतर माझ्यात असलेल्या प्रतिभेला आणखी पालवी फुटली ती क-हाकाठावर
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सा.संगमेश्वर, सा.केदारेश्वर
मध्ये कविता छापून येऊ लागल्या. दिवाळी अंकातही कविता छापल्या आणि कुतूहल आणखी
वाढले. अकरावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना मराठी साहित्याची पुस्तके वाचणारा मी
एकटाच असेल. ग्रंथपाल घाडगे यांनाही त्याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. खूप
पुस्तके वाचली. क-हानदीच्या काठावर संगमेश्वर, वटेश्वर, सोपानदेव मंदिर परिसरात
दिवस ना दिवस जात.
अभ्यासासाठी आम्हा मुलांचा कंपू महाविद्यालय सुटले की तिकडे जात. तेथेच साहित्याची
बीजे रुजली. पुण्यात दैनिक पुढारीमध्ये काम करीतच मी शिक्षण घेत होतो.
वृत्तपत्रात मान खूप पण धन मात्र अत्यल्प आहे. रोजचा खर्च भागविणे त्याकाळात अशक्य
व्हायचे. पण पत्रकारितेची आवड असल्याने या सगळयांकडे दुर्लक्ष केले.
पत्रकारितेत मन लावून काम करु लागलो. पुण्यात हा हा म्हणता माझ्या लेखनाचा आणि
कामाचा बोलबाला होऊ लागला. त्यानिमित्ताने अनेक मान्यवर साहित्यिक, कवी,
लेखकांच्या ओळखी झाल्या. पत्रकारितेच्या गावात रमून गेलो. वृत्तपत्रीय लिखाणात मन
रमले. बराच काळ गेल्यानंतर मात्र पंढरीच्या वारीला दैनिक सकाळ मध्ये
वारीच्या वाटेवर या सदरात लेखन करीत असताना प्रसिद्धी तर मिळालीच. पण लेखनाचे
अंगही विकसित झाले. कविसंमेलनाला जायला लागलो. पुन्हा कवितेला बहर आला. या बहरात
लिहिलेल्या कविता उन्हातला पाऊस या शीर्षकाखाली वाचकांच्या भेटीला येत आहेत.
क-हाकाठाची
मंदिरे
खुणावती पुन्हा
मला
शिवशाहीचे तोरण
म्हणे बांधायचे
तुला
पुरंदराच्या भूमीत
जन्म पुन्हा
पुन्हा व्हावा
मातीने कणा कणात
इतिहास जागवावा
पुरंदरवर
असलेल्या प्रेमातून अशा स्वाभिमानी कवितांचे लेखन झाले. ही माझी खरी दौलत आहे, असे मी समजतो.
वारीच्या
वाटेवर ही महाराष्ट्रात गाजलेली ऐतिहासिक महाकादंबरी ही साहित्य दरबारात दाखल झालेला
मैलाचा दगड ठरली आहे.
No comments:
Post a Comment