Popular Posts

Monday, July 15, 2013

दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…

दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…
- डॉ. सदानंद मोरे



”मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्‍य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले. शहाण्णव कुळींच्या रट्टांवरून व महारट्टांवरून सबंध देशाला महरट्टांचा देश ऊर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या शहाण्णव कुळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आदीपासून आतापर्यंतचा इतिहास.”
इतिहासाचार्य राजवाडे राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या राष्ट्रकल्पनेची व्याप्ती हिंदुस्थानशी समकक्ष नसून, महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. मराठ्यांनी हिंदुस्थानभर साम्राज्य स्थापणे, हे त्यांना नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसे. युरोपभर आपले साम्राज्य करु इच्छिणारा नेपोलियन त्यांना “बदनजरेचा पाजीतला पाजी राक्षस’ वाटे. ज्युलियस सीझर, तैमूर इत्यादींसारख्या अशाच साम्राज्येच्छूंचा त्यांना तिटकारा होता. इतकेच नव्हे, तर श्रीरामदास व श्री शिवाजी यांनी स्वराज्य स्थापिल्यावर बाजीरावादी मंडळींना सर्व हिंदुस्थानभर नव्हे, तर संपूर्ण दुनियेपर्यंत राज्य स्थापण्याची दुष्ट व अन्याय्य बुद्धी झाली,” असे ते म्हणत.
राजवाड्यांना संघराज्याच्या – णपळींशव डींरींशी चा पर्याय न्याय्य वाटे. मराठ्यांना “णपळींशव डींरींश स्थापण्याची न्याय्य बुद्धी झाली नाही. त्यामुळे रजपूत, रांगडे, पंजाबी, गुजराती, काठी, कानडी, तेलगू, मल्याळम, मुसलमान अशी हिंदुखंडातील सर्व राष्ट्रे व लोक मराठ्यांच्या विरुद्ध होऊन पानिपत येथे भिकार अबदालीकडून पराभव झाला. अशी त्यांची पराभवमीमांसा होती.
राजवाडे भाषावार आणि संस्कृतीवार राष्ट्रांच्या निर्मितीचे पुरस्कर्ते असून, अशा राष्ट्रांची लीग, कॉन्फिडरसी वा युनियन व्हायला त्यांची हरकत नाही. महाराष्ट्राने राष्ट्र व्हावे आणि हिंदुस्थानच्या संयुक्त संस्थानांचे धुरीणत्व करावे, अशी त्यांची कल्पना दिसते.
”इंग्रज, अंग्लोइंडियन्स, पारशी, ज्यू, लिंगायत, मानभाव, महार, शूद्र, मराठे, कातकरी, मुसलमान, गुजराथी, मारवाडी, जैन, ब्राह्मण व सुधारक यांपैकी महाराष्ट्र कोणाचे? एकेकाचे की साऱ्या मिळूनचे? साऱ्या मिळूनचे म्हटले तर उत्तर एक येणार नाही. एकेकाचे म्हटले तरी उत्तर एक येणार नाही, हे ठरलेलेच.”
याही पुढे जाऊन राजवाडे असे विधान करतात, की “”बहुतम व जुनाट जे हिंदू त्यांचे महाराष्ट्र म्हटले तत्रापिही ही एकच एक उत्तर येणे अशक्‍य आहे.”
याचा अर्थ असा होतो, की सर्वसाधारण हिंदूला महाराष्ट्राच्या ऱ्हासाची जाणीव होईलच, असे नाही. म्हणजेच राजवाडे शिवसेनेप्रमाणे महाराष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व यांच्यात अनिवार्य संबंध मानायला तयार नाहीत.
राजवाड्यांचा वर्चस्ववाद
राजवाड्यांचे असे मत आहे, “”फक्त ब्राह्मण व मराठे यांच्या दृष्टीला राष्ट्राचा ऱ्हास झालेला दिसेल. अन्य कोणाच्याही दृष्टीला ऱ्हास दिसणार नाही. कित्येक तर प्रगती चाललेली आहे, असेच म्हणतील. … दोन्ही प्रश्‍नमालिकासंबंधाने फक्त ब्राह्मण व मराठे यांची बरीच एकवाक्‍यता होईल. इतरांचे हितसंबंध, आकांक्षा, भविष्य व उमेद अगदी निराळी. त्यांची उत्तरे ब्राह्मणमराठ्यांच्या उत्तराहून अगदी उलट येणार, यात संशय नाही. खंगले कोण? तर ब्राह्मण-मराठे. स्वराज्य व साम्राज्य गेले कोणाचे? तर ब्राह्मण मराठ्यांचे. पोटभर भाकरी मिळत नाही कोणाला? तर ब्राह्मण मराठ्यांना. शरीराने क्षीण कोण? ब्राह्मण मराठे. धंदा नाही कोणाला? ब्राह्मणमराठ्याला. रेल्वेवरती हरघडी पाणउतारा होतो कोणाचा? तर ब्राह्मण मराठ्यांचा. धर्म गेला कोणाचा? तर ब्राह्मण मराठ्यांचा. मराठी मंडळ कोणाचे? ब्राह्मण मराठ्यांचे. सर्वतोपरी ऱ्हास भासतो कोणाला? ब्राह्मण मराठ्यांना. प्रस्तुत ऱ्हासाचा प्रश्‍न काढला कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. उन्नतीचे उपाय हवेत कोणाला? ब्राह्मण मराठ्यांना. विशेष नीच लुच्चे व धर्मभ्रष्ट कोण? तर ब्राह्मण मराठे. धर्मसचोटी व शील वाढवावेसे “वाटते’ कोणाला? तर ब्राह्मण मराठ्यांना. महाराष्ट्र बुडविला कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. महाराष्ट्रावर निःसीम प्रेम कोणाचे – प्रिय महाराष्ट्रातील ब्राह्मण मराठ्यांचे, असा हा ब्राह्मणमराठ्यांचा आजपर्यंतचा प्रश्‍न आहे.”
उतारा काहीसा लांबलचक असला तरी राजवाड्यांचा दृष्टिकोन समजण्यासाठी आवश्‍यक आहे. महाराष्ट्र हा ब्राह्मण आणि मराठा या दोन राज्यकर्त्या अभिजनांचा असल्याचे राजवाड्यांचे मत आहे. महाराष्ट्र सर्वांचा आहे, जे राजारामशास्त्री भागवतांचे मत होते, त्याच्या अगदी विरोधी असा हा राजवाड्यांचा वर्चस्ववाद आहे. या दोन विद्वानांची यथायोग्य तुलना राजवाड्यांचे वारसदार मानल्या गेलेल्या दत्तोपंत पोतदारांनी अत्यंत समर्पकरीत्या केली आहे. पोतदार लिहितात- “”राजारामशास्त्र्यांची राजवाड्यांशी पुष्कळ बाबतीत तुलना करता येईल. दोघेही नैरूक्तिक होते. दोघेही इतिहासपंडित होते. दोघेही लोकांना विक्षिप्त वाटत. दोघेही सडेतोड व बाणेदार होते. मऱ्हाटी व मऱ्हाटे यांचा जाज्वल्य अभिमान दोघांच्या ठायी उत्कट होता. दोघांची भाषासरणी व विचारसरणी स्वतंत्र होती. साधी राहणी व उच्च विचारसरणी या कोटीत दोघेही पडतात. दोघांचेही जगाशी पटत नसे… एकास ब्राह्मण्याचा उत्कट अभिमान होता, तर दुसरा ब्राह्मणी काव्याच्या कल्पनांनी व्याप्त झाला होता. एकास युरोपियनांचे वावडे असे, तर दुसऱ्यास मिशनऱ्यांच्या सहवासात व सेवेत आयुष्य कंठणे परवडले… दोघेही समकालीन असून, “भेटी नाही जन्मवरी’ असा प्रकार होता. एकाच पर्वताच्या एकाच सोंडेमुळे दोन अंगाला बनलेल्या दोन खोऱ्यांतून दोन स्वतंत्र प्रवाह निघावेत आणि दोन्ही एकाच दिशेने; परंतु एकमेकांस स्पर्श न करता समुद्रास मिळावेत, असा काहीसा प्रकार या दोन जबरदस्त विद्वानांच्या लेखनप्रवाहासंबंधाने झाला, असे म्हटले असता उचित दिसेल.”
दत्तोपंत पोतदारांची निरीक्षणे वस्तुस्थितीस धरूनच असल्याचे म्हणावे लागते. राजवाड्यांमधील ब्राह्मण्याच्या ज्या उत्कट अभिमानाचा ते उल्लेख करतात, त्याने राजवाड्यांची इतिहासमीमांसा झाकोळून गेली आहे. वरील लांबलचक उताऱ्यात त्यांनी महाराष्ट्र हा ब्राह्मण मराठ्यांच्या व म्हणून त्याची काळजी ब्राह्मण मराठ्यांनाच, असे म्हटले असले आणि त्यामुळे ते सकृत्‌दर्शनी ब्राह्मण मराठा युतीचे पुरस्कर्ते वाटत असले, तरी विश्‍लेषणाअंती त्यांनी मराठ्यांना कसे दुय्यम ठरवले आहे, ते दिसून येईल. महाराष्ट्राच्या प्राचीन वसाहतीकरणाचा जो इतिहास त्यांनी मांडला, त्यातून हे चित्र स्पष्ट होते. हा इतिहास मांडताना त्यांनी महाराष्ट्रातील हजारो ग्रामनामांची जी व्युत्पत्तीशास्त्रीय छाननी केली, त्यावरून त्यांना पारंपरिक यास्क,पाणिनी, पतंजलींसारख्या नैरूक्तिकांच्या डोक्‍यावर बसवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला नाही. ते इतिहाससंशोधक म्हणून अधिक गाजले असले, तरी ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांनी भाषाशास्त्रज्ञ आणि वैयाकरण या नात्याने त्यांची कामगिरी अधिक महत्त्वाची असल्याचे मानले होते. महाराष्ट्राच्या प्राचीन अथवा वासाहतिक इतिहासाची राजवाड्यांची मांडणी मुख्यत्वे भाषेच्या पायावरच आधारित आहे. पाणिनी, कात्यायन, पतंजली अशा व्याकरणकारांच्या लिखाणाचे ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या अंगाने विश्‍लेषण, पुराणग्रंथातील उल्लेख आणि प्रचलित ग्रामनामांच्या व्युत्पत्त्या या साधनसामग्रीच्या जोरावर आणि अर्थातच आर्यवंशश्रेष्ठत्व आणि गौणत्वाने ब्राह्मणमराठा वर्चस्व; परंतु प्राधान्याने व अंतिमतः ब्राह्मणवर्चस्व या गृहितकांच्या आधारावर राजवाडे आपली इतिहासाची इमारत उभी करतात.
या इतिहासाच्या पहिल्या भागाची मांडणी आपण यापूर्वीच केली आहे. नर्मदेच्या पलीकडे, उत्तरेतील विशेषतः मगध नावाच्या महाराष्ट्रातील चातुर्वर्ण्याधिष्ठित सनातन वैदिक धर्मावर बौद्ध-जैन लोकायतादी अवैदिक पाखंडे आणि नंद व मौर्य घराण्यांतील शुद्ध क्षत्रियांचे द्वेष्टे असणारे सत्ताधीश यांच्या रूपाने कोसळलेल्या दुहेरी संकटातून सुटका करून घेण्यासाठी तेथील महाराजिक ऊर्फ महाराष्ट्रीक गणाच्या लोकांनी दक्षिणेत स्थलांतर करून तेथील दंडकारण्यात वसाहती केल्या. त्यांचाच मार्ग कुरुपांचालदेशातील राष्ट्रिकांनी आणि उत्तरकुरू व उत्तरमद्रातील वैराष्ट्रिकांनीही अवलंबला. पुढे या तिघांचाही उल्लेख महाराष्ट्रीक या सामान्य नावानेच होऊ लागला.
दंडकारण्य कोणते?
परंतु या महाराष्ट्रिकांना दंडकारण्यातील आद्य वसाहतकार म्हणता येईल काय? वैदिक साधनांनाच अनुसरायचे झाल्यास आर्यांच्या दक्षिणेतील वसाहतीचा पहिला मान निःसंशयपणे अगस्ती ऋषींकडे जातो; परंतु अगस्ती कोणी सत्ताधारी राजेमहाराजे नव्हते. वाल्मिकी रामायणानुसार इक्ष्वाकू कुळातील दंडक नावाचा राजा दक्षिणापथात राज्य करीत होता. त्याच्यावरूनच या प्रदेशाला “दंडकारण्य’ हे नाव पडले.
पण एका राज्याचे रूपांतर अरण्यात कसे झाले?
हा दंडक इक्ष्वाकूच्या शंभर पुत्रांपैकी तिसरा. इक्ष्वाकूने त्याला विंध्याद्री व शैवल पर्वत या दोहोंमधील प्रदेशाचे राज्य दिले. या प्रदेशातील मधुमंत नावाची नगरी त्याने आपली राजधानी केली. वस्तुतः वसिष्ठ हा इक्ष्वाकूचा पुरोहित. इक्ष्वाकूचा दुसरा पुत्र निमि याने वसिष्ठालाच आपला पुरोहित नेमले. दंडकाने भृगूच्या कुळातील एका ऋषीस आपले पौरोहित्य दिले. एकदा त्याने कामातुर होऊन आपल्या गुरूच्या अरजा नावाच्या कन्येवर बलात्कार केला. त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्या भार्गव पुरोहिताने दंडकाला बल, कोश इ. राज्यांगांसह शापाने भस्मसात केले. तेव्हापासून त्याच्या राज्याच्या चारशे योजनांचा प्रदेश उजाड झाला. त्याला “दंडकारण्य’ असे नाव पडले. (इकडे निमि आणि वसिष्ठ यांनीही एकमेकांना वेगळ्या कारणांमुळे शाप देऊन नष्ट केले.) पुढे इक्ष्वाकू वंशातीलच दाशरथी राम आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासमवेत वनवासाला गेला, तेव्हा त्याच्या वनवासाचा बराच काळ याच दंडकारण्यातील जनस्थान नामक भागात व्यतीत झाला. दंडकारण्य त्या वेळी लंकाधिपती रावणाच्या राज्याचा भाग बनला होता. रावणाने तो आपली विधवा बहीण शूर्पणखा हिला देऊन आपला सावत्र भाऊ खर यास सेनापती दूषणासह तेथे ठेवले होते.
दंडकारण्याच्या संबंधी एका वेगळ्या मताचीही येथे नोंद घ्यायला हवी. जैन परंपरेतील आचार्य विमलसुरींच्या “पउमचरियं’ या ग्रंथात (शूर्पणखेऐवजी?) चंद्रनखा नावाच्या स्त्रीचा उल्लेख आहे; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्यानुसार दंडक नावाचा पर्वत होता व त्या पर्वतावर दंडक याच नावाच्या एका महानागाचे वास्तव्य होते. त्यामुळे या प्रदेशाला दंडकारण्य हे नाव प्राप्त झाले.
दंडकारण्य शब्दाची व्युत्पत्ती काहीही असो. महाराष्ट्राचा व त्याचा संबंध आजही इतका दृढ आहे, की कोणत्याही वैदिक कर्माचा संकल्प सांगताना आपण राहतो त्या प्रदेशाचा उल्लेख “दंडकारण्य’ असाच केला जातो. मध्ययुगीन दानपत्रांमधून दान दिलेल्या भूमीच्या वर्णनात दंडकारण्याचा उल्लेख अनेकदा येतो. उदाहरण म्हणून डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या “शोधमुद्रा’ (खंड 1) मध्ये प्रसिद्ध झालेल्या वसमतजवळील रांजणा येथील नृसिंह मंदिरातील शके 1139 मधील आमणदेवाचा शिलालेख घेऊ. या लेखातील स्थलाचा उल्लेख “भारत वर्षे जंबुद्वीपे दंडकारण्ये’ असा झाला आहे.
राजवाड्यांच्या मते वऱ्हाड, नागपूर, उत्तर कोकण, आंध्र प्रदेश, गोदातीर या दंडकारण्याच्या भागात आर्यांच्या वसाहती प्रथम झाल्या. नाणे मावळातील 168 गावांच्या नावांचा अभ्यास करून त्यांनी असा अंदाज बांधला, की दंडकारण्यातील हा “”मावळ प्रांत अरण्याच्या अगदी गाभ्यात व सह्यपर्वताच्या कुहरात असल्यामुळे यात वसाहती बऱ्याच उशिरा झाल्या असाव्यात.”
मावळातील ग्रामनामांच्या संस्कृतोद्भवतेवर बोट ठेवून राजवाडे सांगतात, की आधी हा भाग निर्भेळ अरण्य होता. तेथे मनुष्यवस्ती अजिबात नव्हती. पहिल्यांदा तेथे राक्षस अवतरले. (राक्षस ही माणसांचीच एक जात). मग नाग (हाही मनुष्यवंशच) आणि मग आर्य. ते असेही मान्य करतात, की “”ग्रामनामांवरून दिसते, की सनातन धर्म नाणेमावळात असून, शिवाय बौद्ध धर्माची छाया या मावळावर बरीच दाट पडली होती.”
खरे महाराष्ट्रिक कोण?
राजवाड्यांची महाराष्ट्रातील आर्य वसाहतीकरणाची कथा खूप गुंतागुंतीची आहे. ते नेमके केव्हा झाले, हे त्यांना सांगता येत नसले तरी ज्या अर्थी अशोकाच्या शिलालेखात रस्टिकांचे नाव अवतीर्ण होते, त्या अर्थी रस्टिक किंवा राष्ट्रिक किंवा रट्ट हे तेव्हा येथे येऊन स्थिरावले असणार, हे उघड आहे. या रट्टांनी वसाहतीकरणात पुढाकार घेतल्यामुळे, खरे तर ते उत्तरेत असल्यापासूनच त्यांच्याकडे प्रादेशिक किंवा स्थानिक अधिकारपदे असल्यामुळे, पाटील, देसाई, देशमुख ही पदे त्यांच्याकडे आपोआपच आली व पिढीजात किंवा वंशपरंपरागत झाली. ते वर्णाने क्षत्रिय व पेशाने देशाधिकारी. त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाच्या क्षत्रिय अधिकाऱ्यांना सरपाटील, सरदेशमुख, सरदेसाई असे म्हणण्यात येई. पण ही पदे सांभाळणारे साधे राष्ट्रीक किंवा रट्ट नसून महाराष्ट्रिक होत. महाराष्ट्रिक याचाच अपभ्रंश महरट्ट व महरट्ट याचा अपभ्रंश मऱ्हाट. “”हे रट्ट जी संस्कृतोत्पन्न अपभ्रष्ट भाषा बोलत ती दंडकारण्यातील राजमान्य, लोकमान्य व कविमान्य महाराष्ट्री ऊर्फ महरट्टी व पुढे कालांतराने मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांत प्रकृष्ट म्हणून प्रख्या पावली… रट्ट व महरट्ट हे वर्णाने व जातीने क्षत्रिय, दर्जाने देशाधिकारी आणि सत्तेने राष्ट्राधिकारी, देशाधिकारी व ग्रामाधिकारी पडल्यामुळे, मुलखातील सर्व प्रकारचे पुढारपण यांच्याकडे आले होते. आणि असले हे सर्वतो प्रकारे उच्चस्थानापन्न लोक जो अपभ्रंश बोलत तो सर्व अपभ्रंशांत श्रेष्ठतम ठरावा यात नवल कोणते? भारत वर्षातील काश्‍मीरपासून कुमारीपर्यंत जे जे संस्कृतप्राकृत नाटककार होऊन गेले, त्यांनी उच्च दर्जाच्या पात्रांच्या तोंडी महाराष्ट्री भाषा घातलेली जी आढळते, तिचे कारण ही महाराष्ट्री भाषा द्रव्यबल, मनुष्यबल व सत्ताबल अशा विविध बलांनी समलंकृत अशा उच्चवर्णाच्या क
्षत्रियरट्टांची भाषा होती.”
राजवाडे असाही तपशील सांगतात, “”मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्‍य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले. शहाण्णव कुळींच्या रट्टांवरून व महारट्टांवरून सबंध देशाला महरट्टांचा देश ऊर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या शहाण्णव कुळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आदीपासून आतापर्यंतचा इतिहास.”
अर्थात या रट्टांबरोबर “”निरनिराळ्या दीडशे प्रकारचे लोक दंडकारण्यात भारतवर्षाच्या नाना प्रदेशांतून शिरले. परंतु या सर्व लोकांचे पुढारपण रट्ट व महारट्ट यांजकडे असे. – हे लोक यद्यपि भिन्नप्रांतीय, भिन्नजातीय व भिन्नवृत्तीय होते. तत्रापि, रट्टांचे तेज सर्वांवर पडून त्या सर्वांना कालांतराने महाराष्ट्रीय ऊर्फ मऱ्हाटा ही संज्ञा प्राप्त झाली.”

No comments: