Popular Posts

Thursday, September 26, 2013

१) होनाजी बाळा


क-हाकाठचे साहित्यरत्न
-----------------------------
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे ३,४,५ जानेवारी २०१४ रोजी सासवडला होत आहे. साहित्यक्षेत्रातील मराठी भाषेचा हा महत्वाचा साहित्य सोहळा
होत आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या साहित्यात मोलाची भर टाकणारे आणि मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, साहित्य निर्मीतीची ज्योत तेवत ठेवणारे
क-हाकाठवर प्राचीन काळापासून अनेक साहित्यरत्न जन्माला आली. त्या साहित्याच्या वारसदाराची माहिती करुन देणारी मालिका.... 
लेखक - दशरथ यादव

-------------------------
१) होनाजी बाळा 
---------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली प्रेरणादायी इतिहास अंगाखांद्यावर मिरवीत संस्कृतीचा वारसा जोपासणा-या पुरंदरच्या क-हापठारावरील महान रत्नापैकी होनाजी व बाळा ही दोन अनमोल रत्ने. प्राचीन, अर्वाचीन, यादव, बहमनी, शिवशाही, पेशवाई, इंग्रज या सगळ्याच कालखंडात पुरंदरच्या क-हापठारचे योगदान कायम वाखाण्याजोगेच राहिले आहे. भौगोलिक दृष्ट्या निसर्गाची कृपादृष्टी झाल्याने, सात गड व नउ घाटांच्या सोबतीने क-हापठार पिढ्या न पिढ्या काळाशी सुसंगत अशीच कामगिरी करीत झळकत राहिला. मग काळ कोणताही असो. काळानुरुप पुरंदरच्या मातीची प्रेरणा घेऊन अनेकांनी गौरवशाली काम केले. 

वंशपरंपरागत शाहिरी
------------------
 होनाजी हा क-हाकाठावरील सासवडमधील गवळी समाजात जन्माला आला. तो त्याच्या घराण्याचा दुधाचा व्यवसाय करीत असे. पेशव्यांच्या वाड्यावर दुधाचा रतीब घालणे व सांयकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी मनोरंजन करीत. त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसा शाहिरीचा पण व्यवसाय वंशपरंपरागत होता. होनाजीचे आजोबा साताप्पा किंवा शाताप्पा हे व त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. विशेषःता होनाजीचा चुलता बाळा हा लावणीकार होता. तो बाळा बहिरु या नावाने शाहिरी क्षेत्रात प्रसिद्ध होता. बहिरु नावाचा रंगारी हा बाळाचा मित्र होता. ते दोघे बाळा बहिरु नावाने तमाशाचा फड चालवीत होते. बाळाजीची हीच परंपरा पुढे होनाजीने चालविली. होनाजीचा साथीदार आणि मित्र बाळा करंजकर हा सासवडच्या शिंपी समाजातील होता. त्याच्या जोडीने होनाजीने आपला तमाशा गाजविला. त्याने होनाजी बाळा हे जोडनाव रुढ केले. 
होनाजी बाळा (इ.स.१७५४-इ.स.१८४४) मुळचा सासवडचा होता. नंतरच्या काळात तो पुणे येथे राहत होता. होनाजीचे आजोबा सातप्पा शिलारखाने हा पेशव्यांचा आश्रित व नावाजलेला तमासगीर होता. होनाजीने रागदारीवर अनेक लावण्या लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचना त्यांनी केली. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या लावणीला आज भूपाळीचे म्हत्व प्राप्त झाले. होनाजी काव्य करायचा व बाळा गायन करीत होता. म्हणून त्यांच्या फ़डाला होनाजी बाळाचा फड असे म्हणत. 

पोवाड्याची रचना
--------------------
लावणीचे शब्दसामर्थ्य आकर्षक होते. शब्दरचना बांधीव मुलायम होती. सहजता व शृंगाररसाचा अदभुत प्याला होनाजीने रसिकांसमोर ठेवला.इतकेच नाही तर विरहाची लावणी, गरोदर स्त्रीच्या दुःखाची लावणी, वांझेची लावणी अशा विविध लावणीतून स्त्रीमनाचे दर्शन त्यांनी घडविले. होनाजीनी काही पोवाडे रचले आहेत. खड्र्याची लढाई, रंगपंचमीचा पोवाडा, दुस-या बाजीरावाचा पोवाडा, असे अनेक पोवाडे रचले. शिमग्याचे पाच दिवस ते सरकारवाड्यापुढे तमाशा सादर करीत. होनाजीला सालीना तीनशे रुपये वर्षासन मिळत होते. पेशवाई बुडाल्यानंतर बुडाल्यानंतर बडोदेसरकारकडून त्यांना वर्षासन मिळे. पेशवाई गेल्यानंतर होनाजीने लिहिलेला पोवाडा अतिशय ह्दयद्रावक आहे. होनाजीने पेशवाईतील रंगढंग मोठया कलात्मकतेने व यथेच्छपणे रंगविले आहेत. होनाजीने रचलेल्या लावण्यात अंतरीक प्रेम, जिव्हाळा, सामाजिक नीती याची कदर इतर शाहिरांपेक्षा जास्त आहे. लावणीरचना सरळ, ओघवती, शब्दलालित्याने नटलेली आहे. होनाजी स्वतःच्या लावण्याबरोबर बाळा करंजकर यांच्याही लावण्यात गात असत. सासवडही होनाजीची अजोळभूमी सासवड. काव्याची पुष्पाची पहिली पाकळी त्यांनी येथील काळभैरवनाथाच्या चरणी अर्पिली आहे. धनाने दारिद्रयात असलेला हा शाहीर सासवडला धान्यबाजारपेठेत हल्लीच्या शेडगे यांच्या दुकानाच्याजवळ राहत होता.त्याचा जिवलग मित्र बाळा करंजकरचे घर पाकडी जवळ दगडोबा शिंदे यांच्या वाड्यात होते. होनाजीचा अंत दिवेघाटातील बाभुळबनात मारेक-यांच्या हल्ल्यात झाला. 

मर्द मराठी थाप डफावर
खन खन खंजीर बोले सत्वर
तुण तुण तुण तुण म्हणे तुणेतुणे
झुनक झुनक झांज किणकिणे
 सूर खडा शाहिरी धडाधडा म्हणे पोवाडा जोशात
थेट तशी गम नेट लावून सुरकरी करती साथ
नसानसातील रक्त रसाला येईल आज उधान 

अशा मराठा बाण्याच्या काव्यातून म-हाठ मोळा रांगडेपणाही खळखळाळत होता. होनाजीची भूपाळी त्याच्या सात्विक भाषेचा प्रत्यय देते. हुबेहुब शब्दचित्रे तयार करण्याचे शब्दसामर्थ्य त्यांच्या काव्यात होते.

हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा 

किंवा

लटपट लटपट लटपट लटपट
तुझ चालणं गं मोठ्या नख-यांचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं
नारी गं नारी गं...

कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
तरुणपण अंगात झोकं मदनाचा जोरात
चालणं गं मोठ्या नख-याचं
बोलणं गं  मंजुळ मैनेचं.
नारी गं नारी गं....

हे अमर भूपाळी या सिनेमातील गीत मराठी माणसांच्या मनामनात कोरले आहे. वसंत देसाई यांचे संगीत व लता मंगेशकर यांनी गायले आहे.

होनाजीवर मारेकरी घातले
--------------------------
होनाजीला वंशपरंपरेने कवित्वाची देणगी लाभली होती. पुराणकथा व पंडिती काव्याचा त्याचा अभ्यास होता. होनाजीची बैठकीची लावणीही प्रसिद्ध होती. शास्त्रीय रागदारीवर  संथचालीवरच्या लावण्या त्यांनी रचल्या. तमाशा लावणीला तबल्याच्या ठेक्याची साथ देणे होनाजीने सुरु केले. शास्त्रीयगायन तमाशात आणणे आणि ढोलकीबरोबर वा स्वतंत्रपणे तबल्याचा ठेका घेणे अनेकांना मंजूर नव्हते. त्यामुळे विरोधकांनी बाजीरावाचे कान भरले. होनाजीला तमाशात तबला आणण्यास मनाई झाली. होनाजी हट्टाला पेटला. त्याने आव्हान म्हणूनच ही घटना स्वीकारली. तो आपल्या अहिली नावाच्या शिष्येला घेऊन पुणे सोडून मुंबईला आला. मुंबईत राहून शिष्येच्या गळ्यावर शास्त्रीय गायकीचे संस्कार केले. व्यवस्थिक तालीम करुन लावणी शास्त्रीय ढंगात म्हणण्यात त्या शिष्याला पारंगत करुन तबल्याचा समावेश पुन्हा दरबाराच्या कार्यक्रमात सुरु केला. होनाजीने लावणीच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम केले. होनाजीचे जीवन अनेक नाट्यपूर्णँ घटनांनी भरले आहे. दुस-या बाजीराव पेशव्याचा निकटवर्ती कारभारी त्र्यंबकजी डेंगळे हा होनाजीचा आश्रयदाता व जवळच्या संबधातील होता. होनाजी सगळी मिळकत डेंगळ्याच्या वाडयात ठेवत असे. पुढे राजकारणाच्या उलट्या तेढ्या फे-यात डेंगळेची मिळकत इंग्रजाकडून जप्त झाली. त्यात होनाजीची व्यक्तिगत चीजवस्तूही नाहीशी झाली. होनाजी कफल्लक झाला.कुठून तरी कसे तरी चार पैसे मिळवावेत व चरितार्थ चालवावा असे काहीसे त्याचे जीवन सुरु होते. जीवनात सगळीकडे होनाजीने चांगले यश मिळविले. त्यामुळे स्वाभाविकच विरोधकांची पोटदुखी वाढलेली होती. होना गवळ्याचा चुना, असे त्यांच्या स्थितीबद्दल विरोधकांनी म्हटले आहे. त्याच्या विरोधात असलेल्या कोणा पाताळयंत्रि माणसाने होनाजीवर मारेकरी घातले. असह्य शस्त्राच्या माराने होनाजीचा छिन्नविच्छिन्न देह पुणे शहरात आणून टाकला. दारुण यातनांनी होनाजी गतप्राण झाला. तो दिवस होता भाद्रपद कृष्णचतुदशी.

होनाजीबाळा संगीत नाटक
----------------------------------
संगीत नाटकांचा एक सुवर्णकाळ होता. होनाजीबाळा हे संगीत नाटक भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, माया जाधव हे कलाकार काम करीत. सध्या मुंबई साहित्य संघाने हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले आहे. शहाजी काळे, स्वप्निल परांजपे, बाळा नाईक, अभिनय भोसले, राणी भोसले हे कलाकार आहेत. घनश्याम सुंदरा या भूपाळीने नाटकाला मोठी लोकप्रियता मिळाली.
`घनःश्याम सुंदरा’ ही श्रवणीय भूपाळी नव्या-जुन्या मंडळींनी रेडिओवर ऐकलेलीच आहे. त्याचप्रमाणे `श्रीरंगा कमला कांता’ ही गौळणही बहुश्रूत आहे. पण मूळ कथानकासह त्याचा अनुभव आपल्याला `होनाजी बाळा’ या नाटकात घेता येतो. होनाजी हा एक गवळी. तर बाळा तमासगीर. या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा. पण एकाच शरीरातील आत्मा असे हे नाते. दोघांना वेगळे करता येत नाही. होनाजीशिवाय बाळाला अस्तित्व नाही आणि बाळाशिवाय होनाजीचा विचारच होऊ शकत नाही, असे हे घट्ट नाते. होनाजी जितका गंभीर तितकाच बाळा हा मिश्किल. गाईंना चरायला नेल्यानंतर होनाजीला कवने करण्याचा नाद. त्याच्या कुळाचा मूळपुरुष श्रीकृष्ण याच्यापासून ही संगीताची देण लाभलेली. पण सर्वच काळात सर्वच कला लोकप्रिय होतातच असे नव्हे. होनाजीचा कवनांचा छंदही काहीकांना पसंत नव्हता. पण कलावंतीण गुणवती ही मात्र त्याच्या कवनांवर भारलेली असते. होनाजीने कवणे करावीत आणि यमुना-गुणवती या मायलेकींनी ती बाळाच्या साहाय्याने पेश करून `वजनदारां’ना खूश करणे हा उत्तर पेशवाईतील परिपाठ होता. या गुणवतीची कीर्ती पुण्यात पंचक्रोशीत पसरली होती. त्यातूनच उदाजी बापकर हा युवा सरदार तिच्या अदाकारीवर भाळतो. तिच्या एकतर्फी प्रेमातच पडतो. पण गुणवतीचा जीव अडकलेला असतो होनाजीत आणि त्याच्या शाहिरीत. यातूनच होनाजी व बाळा यांचे उदाजीशी वैर उभे राहते. मोरशेट हा सुरुवातीला उदाजीच्या मागे असतो. पण आपली मर्यादा सांभाळून जेव्हा पेशवाई डबघाईला येते तेव्हा समशेरीच्या जोरावर ती सावरण्याऐवजी हा उमदा सरदार होनाजीचा काटा काढण्यावर भर देतो. एकीकडे प्रेम, दुसरीकडे शाहिरी यात हे द्वंद्व होते. कला ही कोणाची बटीक नसते, हे होनाजी उदाजीला ठासून सांगतो. अखेरीस तलवारीपेक्षा शाहिराची डफावरील थापच सरस ठरते. असा हा सारा `होनाजी बाळा’चा मामला. आहे.

याहो याहो रसिकवरा
द्या कान जरा, लावा नजरा
शाहीराचा घ्या मुजरा

मराठी जीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष शाहिरीत उमटले आहे, मराठी वाडःमयातील बावनकशी सोनं म्हणजे लावण्या व पोवाडे आहेत. मराठीशाहीच्या उदयाबरोबर शाहिरी काव्य जन्मले. या काव्यात मराठीशाहीचे प्रतिबिंब असून, वीर रसाची उधळण करणारे पोवा़डे व दिलखेचक अदाकारीच्या शृंगारिक लावणीने मराठी साहित्यात व मनांमध्ये वेगळेच स्थान निमार्ण केले. अशा शाहीर होनाजी बाळाच्या डफाच्या थापेवर व तुणतुण्याच्या तारेवर महाराष्ट्र नागासारखा डोलला  आहे. घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला या सात्विक, प्रसन्न भूपाळीप्रमाणेच होनाजी अमर झाला. 

तू पाक सूरत कामिना
तू पाक सूरत कामिना कि दाहि बोटी मीना, हातामध्ये वीणा घेऊनिया गाती
तुला गुणिजन अवघे चहाती

नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल
नवीनवती तू चंद्रकळा सवती, गायनामधे गुणिजन सविती
कंबर बारिकशी कुंद, मनामध्ये फुंद, मिजाजत धुंद खुले तव कांती
तुला गुणिजन अवघे चहाती

नाकी नथनी ग सर्जेदार, फुले अंगी जोहार ग फार
वनी जणु हे पळसतरु फुलले, गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गडे, अहो फाकडे, तुझी चहुकडे गुणाची हो ख्याती
तुला गुणिजन अवघे चहाती

अशा प्रकारची प्रभावी गीत रचना करणारा होनाजी हा एक प्रतिभावंत शाहीर होता.

No comments: